आवाज कमी कर डीजे तुला..!

संभाजी पाटील
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

सण, उत्सव, परंपरा यांच्या नावाखाली "सेलिब्रेशन‘च्या नवनव्या कल्पना सध्या रूढ होऊ पाहत आहेत. आपण केलेल्या कोणत्याही कृतीपासून इतरांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, ही किमान अपेक्षा आहे. कायदाही तेच सांगतो; पण परंपरा आणि उत्सवांच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या अशा सामूहिक कृतींकडे दुर्लक्ष केले जाते. 

सण, उत्सव, परंपरा यांच्या नावाखाली "सेलिब्रेशन‘च्या नवनव्या कल्पना सध्या रूढ होऊ पाहत आहेत. आपण केलेल्या कोणत्याही कृतीपासून इतरांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, ही किमान अपेक्षा आहे. कायदाही तेच सांगतो; पण परंपरा आणि उत्सवांच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या अशा सामूहिक कृतींकडे दुर्लक्ष केले जाते. 

कोजागरी पौर्णिमेपासून शहरात ज्या मिरवणुका निघत आहेत, त्यातून हेच दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत शहराच्या विविध भागांत, उपनगरांमध्ये "डीजे‘ लावून त्यासमोर यथेच्छ नाचून जी काही "परंपरा‘ जपण्याचा आणि "उत्सव‘ साजरा करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो खरोखरीच अनाकलनीय आहे. काही वर्षांपूर्वी शहरात नवरात्रीच्या काळात तोरण मिरवणुका निघत होत्या. गल्लीबोळांसह अगदी महाविद्यालयांमध्येही या मिरवणुका काढल्या जात. त्यासाठी दमदाटी करून वर्गणीही वसूल केली जात होती. या मिरवणुकांमध्ये शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला. मिरवणुकांमध्ये हाणामारी व गुंडांचा शिरकाव वाढला. खुनाचे प्रकारची घडले. त्यामुळे पुणे पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून या मिरवणुकांवर बंदी घातल्याने भांडणे तर टळलीच; पण गुन्हेगारीलाही आळा बसला. 

पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे पुणेकरांनी मनापासून स्वागत केले. असे असताना यंदा अचानक कोजागरी पौर्णिमेपासून शहरात मिरवणुका निघू लागल्या आहेत. त्यांचे भयंकर स्वरूप पुन्हा एका कायदा-सुव्यवस्था आणि अमर्याद ध्वनिप्रदूषणाला आमंत्रण देणारे ठरले आहे. 

या मिरवणुकांमध्ये जी "साउंड सिस्टिम‘ वापरली जाते ती विलक्षण क्षमतेची आहे. अवघा परिसर कर्णकर्कश आवाजाने हादरून टाकला जातो. त्याला काही लाख रुपये मोजून "डीजे‘ची जोड दिली जाते. या "डीजे‘ला आवाज वाढविण्याची "शपथ‘ घालून जे काही केले जाते, ते कोणत्याही उत्सवाच्या मर्यादेत बसणारे नाही. या आवाजामुळे आम्हाला प्रचंड त्रास होत आहे, आमची लहान मुले कानात बोटे घालून भेदरून बसली आहेत, पोलिस काही करीत नाहीत, तुम्ही काही तरी करा, असे कितीतरी दूरध्वनी "सकाळ‘ कार्यालयात आले. अनेक ठिकाणी रात्री दहानंतरही "डीजे‘चा धिंगाणा सुरू होता, त्याला कोणीही अडवले नाही, ही सर्वांत गंभीर बाब आहे. रविवारी कात्रज परिसरातून निघालेल्या एका मिरवणुकीत "शांताबाई‘च्या गाण्यासोबत नाचणाऱ्यांचा उत्साह वाढावा, यासाठी चक्क बिअरच्या बाटलीतील फेस नाचणाऱ्यांच्या अंगावर उधळला जात होता, याला काय म्हणायचे? 
न्यायालयाच्या आदेशानंतर ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. 

दिवसा 55 डेसिबलपेक्षा जास्त आणि रात्री 45 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असता कामा नये, असे बंधन कायद्यानेच घातले आहे. हे बंधन मोडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करू शकतात. असे असताना कोणतीही परवानगी न घेता बिनधास्त मिरवणुका निघतात आणि त्याकडे पोलिस दुर्लक्ष करीत असतील, तर नियम मोडणाऱ्यांऐवढेच तेही दोषी आहेत. पुण्यात वाहतुकीची होणारी कोंडी पाहता रस्ता "जाम‘ करणाऱ्या मिरवणुका परवडणार नाहीत, त्याहीपेक्षा यातून जे वाद वाढणार आहेत, त्यांना आवर घालणे कठीण होईल. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन "आवाज कमी कर डीजे...‘ म्हणण्याची वेळ आली आहे.