आज ठरणार महापौर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवडचे महापौर निवडण्यासाठी मुंबईत बुधवारी बोलावलेली बैठक आता गुरुवारी (ता. ९) होणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दिवसाचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक नागपूरला रवाना झाल्याने बुधवारची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापौरपदाच्या शर्यतीत शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संतोष लोंढे यांच्याबरोबर आता शीतल शिंदे, संदीप वाघेरे यांचीही नावे चर्चेत आल्याने उत्सुकता आणखी ताणली असून, चुरस वाढली आहे.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत असून, शहरातील पक्षाचे काही पदाधिकारीही मुंबईत आज सकाळी दाखल झाले होते. आज संध्याकाळी महापौर निवडीसाठी मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत कोअर समितीची बैठक होणार होती; परंतु मुख्यमंत्र्यांना तातडीने नागपूरला जावे लागल्याने आजची बैठक रद्द करण्यात आली. आता ही बैठक गुरुवारी सकाळी होणार आहे. दुपारी एक पूर्वी नियोजित महापौरांचे नाव निश्‍चित झालेले असेल. महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज उद्याच दाखल केले जाणार असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सकाळी नियोजित महापौर ठरलेले असतील.

चुरस आणखी वाढली
भाजपचा पहिला महापौर कोण होणार? याची उत्सुकता बैठक लांबल्याने आणखी वाढली आहे. सर्वांत आघाडीवर शत्रुघ्न काटे यांचे नाव असून, त्यापाठोपाठ नामदेव ढाके, संतोष लोंढे यांची नावे चर्चेत आहेत. पण, या शर्यतीत आता शीतल शिंदे व पिंपरी गावातील नगरसेवक संदीप वाघेरे यांचेही नाव चर्चेत आल्याने महापौरपदाची चुरस आणखी वाढली आहे.

विषय समित्यांचीही उत्सुकता
महापौरांच्या निवडीबरोबरच उपमहापौरांची निवड, स्थायी समितीचे सदस्य व विषय समित्यांच्या सदस्यांची निवड एकाच सभेत केली जाणार आहे. मात्र, सदस्य निवडण्यासाठी अगोदर विविध पक्षांच्या गटनेत्यांची निवड होणे अपेक्षित आहे. स्थायी समिती, विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक अशा चार समित्यांच्या सदस्यांची नावे गटनेते कळवीत असतात. त्यामुळे सर्व पक्षांचे गटनेते अगोदर ठरणे आवश्‍यक आहे.

उमेदवारी अर्ज तीनपासून स्वीकारणार
महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी (ता. ९) दुपारी ३ ते ५ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नगरसचिव उल्हास जगताप यांच्या दालनात हे अर्ज दाखल केले जातील. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाचाच अर्ज दाखल झाला, तर दोघांचीही निवड बिनविरोध निश्‍चित होईल. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा १४ मार्च रोजी आयोजित सभेत केली जाईल. याच सभेत स्थायी समिती व विषय समित्यांचे सदस्य निश्‍चित होतील. स्वीकृत सदस्यांची निवड नियमाप्रमाणे एक महिन्यानंतर म्हणजेच एप्रिल महिन्यात केली जाणार असल्याचे नगरसचिव जगताप यांनी सांगितले.