बस खरेदीच्या निर्णयाला आज मंजुरी मिळणार?

pmc
pmc

पुणे - बाजारपेठेतून अल्पव्याजदरात उपलब्ध होणाऱ्या वित्त पुरवठ्याच्या माध्यमातून 800 बसची खरेदी करणे, भाडेतत्त्वावरील 550 बसच्या कंत्राटाला मंजुरी देणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी होणार आहेत. तर, क्‍लीनर पदाची कमी केलेली पात्रता वाढविणार का आणि पासच्या रकमेबाबत घातलेला घोळ संचालक मंडळ दूर करणार का, याकडेही पीएमपी प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, यासाठी पीएमपीमार्फत 1550 बस घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्याअंतर्गत आर्थिक दायत्व स्वीकारण्यास पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने एका ठरावाद्वारे जबाबदारी स्वीकारली आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्याबाबतचा ठराव अद्याप मंजूर केलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर संचालक मंडळाच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत बस खरेदीच्या निविदांना मंजुरी देण्याचा आणि भाडेतत्त्वावर एसी बस घेण्यासाठी कंत्राटाला मंजुरी देण्याचा ठराव आहे. तसेच पीएमपीच्या मुख्य इमारतीला कै. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे नाव देण्याच्या ठरावावरही शुक्रवारी निर्णय होणार आहे. दरम्यान, बस खरेदी आणि भाडेतत्त्वावरील बसचा शुक्रवारी निर्णय झाला, तर जानेवारीपासून सहा महिन्यांत शहरात टप्प्याटप्प्याने नव्या बस येऊ शकतील, असे महापालिका आयुक्त आणि पीएमपीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार यांनी सांगितले. पीएमपीच्या संचालक मंडळात दोन्ही महापालिकांतील महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, आयुक्त, संचालक आदींचा समावेश आहे.

क्‍लीनर भरतीसंबंधी फेरविचार?
पीएमपीमध्ये पुढील महिन्यात 900 क्‍लीनरची भरती होणार आहे. संचालक मंडळाने सात दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत क्‍लीनर पदाची पात्रता "आयटीआय' प्रशिक्षितवरून सातवी पास, अशी केली आहे. बसचे तंत्रज्ञान आधुनिक होत असताना, शैक्षणिक पात्रता कमी कशी केली जाऊ शकते, त्याविरोधात स्वयंसेवी संस्थांनी टीकेची झोड उठविली आहे. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांनीही संचालक मंडळाच्या निर्णयाला विरोध करून घरचा आहेर दिला आहे. पात्रता कमी करण्याची गरज नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

दैनंदिन पाससंबंधी काय होणार?
शहर आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील प्रवाशांनाही दैनंदिन प्रवासाचा पास 50 रुपयांत देण्याचा ठराव संचालक मंडळाने मंजूर केला आहे. त्यालाही पीएमपी प्रशासनाने विरोध केला आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी 50 रुपयांत पास देण्यास हरकत नाही. मात्र, जिल्ह्यातील प्रवाशांचे प्रवासाचे अंतर 40 किलोमीटरपर्यंत असल्यामुळे त्यांच्यासाठी 70 रुपयेच पासची किंमत असावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. क्‍लीनर भरती आणि पासची रक्कम, हे दोन्ही निर्णय निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घेतले गेल्यामुळे ते रद्द करण्याची गरज असल्याचे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याबाबतही संचालक मंडळ काय निर्णय घेणार, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com