पुणे : भाडेवाढीने पाच हजार व्यापारी अस्वस्थ

शहरील ३४ मंडईतील गाळेधारकांचा भाडे कमी करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा
pune manadai
pune manadaisakal

पुणे : रेडीरेकनरच्या मूल्यांकनुसार महापालिकेने केलेल्या भाडेवाढीचा फटका शहर, उपनगरांतील एकूण ३४ मंडईतील सुमारे पाच हजार व्यापाऱ्यांना बसला आहे. ही भाडेवाढ दहा ते दोनशेपट झाली असल्यामुळे आणि गेल्या दोन वर्षांची थकबाकी भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने नोटीसा दिल्या आहेत. त्यामुळे मंडईतील गाळ्यावर उपजीविका अवलंबून असणारे हजारो व्यापारी अडचणीत आले आहेत.

शहरात वेगवेगळ्या भागात एकूण ३४ मंडई आहेत. सर्वाधिक १५९० गाळे महात्मा फुले मंडईत आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर मंगळवार पेठ जुना बाजार येथईल मंडईत २१७ गाळे आहेत. इतर ३२ मंडईमध्ये दहापासून १०० पर्यंत गाळे आहेत. त्यातील काही गाळे पक्क्या आणि कच्या स्वरुपाचे आहेत. त्यानुसार त्यांच्याकडून मासिक, सहामाही आणि वार्षिक भाडे घेतले जाते. या पूर्वी २५० ते ९०० रुपयांपर्यंत त्यांचे मासिक भाडे होते.

मात्र, आता नवीन भाडेवाढ पालिकेच्या जागावाटप नियमावलीनुसार आणि रेडीरेकनरनुसार केली आहे. त्यामुळे पक्के बांधकाम असलेल्या गाळ्यांचे भाडे ७ हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत झाले आहे. ओट्यावरील गाळेधारकाना १ ते ७ हजार अशी भाडेवाढ झाली आहे. या गाळेधारकांनी करार करावा तसेच गेल्या दोन वर्षांचे भाडे सुधारित दराने भरावे, यासाठी महापालिकेने त्यांना नोटीसा दिल्या आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांवर हजारो ते लाखो रुपये भरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पायाभूत सुविधांची वानवा

  • बऱ्याच मंडईत विजेची सोय नाही .

  • मंडईत प्रचंड अस्वच्छता

  • पाण्याची कमतरता

  • गाळ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

  • स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता, संख्या तोकडी

मंडईतील गाळ्यांचे नवे भाडे हे रेडी रेकनरच्या मूल्यांकनानुसार ठरवलेले आहेत. या पुढे याच दराने त्यांना भाडे भरावे लागेल.

माधव जगताप ( अतिक्रमण विभाग प्रमुख, महापालिका )

- या मंडईमध्ये पुरेशा सविधा नाहीत. वीज नसल्यामुळे आम्हाला बाहेर बसून भाज्या विकाव्या लागतात मग आम्ही कशासाठी भाववाढ द्यायचीदेयची .

विनायक कदम (महात्मा कोतवाल भाजी मंडई कसबा पेठ .)

- गेली दोन वर्षे कोरोनामुळे आम्ही खाण्यास महाग होतो. कोणतेही उत्पन्न साधन नव्हते. गेल्या दोन वर्षांचे भाडे कमी करण्याऐवजी महापालिका वाढीव दराने भाडे मागत आहे. हा कोणता न्याय आहे ?

नासिर शेख (मंगळवार पेठ जुना बाजार )

भाडेवाढ किती करावी, याचा तरी महापालिकेने विचार केला पाहिजे. आमचे हातावर पोट आहे. महिन्याची जेवढी उलाढाल नाही तेवढे भाडे आमच्याकडून अधिकाऱ्यांना वसूल करायचे आहे.

उर्मिला जाधव (रास्ता पेठ भाजी मंडई )

अजित पवार यांचे आश्वासन !

भाडेवाढ कमी करावी म्हणून महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांनी पालकमंत्री अजित पवार यांची शनिवारी भेट घेतली. त्यावेळी दोन वर्षांचे भाडे जुन्या दराने घेतले जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. नव्या भाडेवाढीबाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याशी चर्चा करू. महापालिका प्रशासनाने नोटीसा दिल्या म्हणजे भाडेवाढ लागू होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी नगरसेविका रूपाटील पाटील ठोंबरे यांच्या नेतृत्त्वाखाली मंडईतील गाळेधारक अध्यक्ष राजाभाऊ कासुरडे तसेच शारदा शिवरकर, कांचन दोडे, शरद मोरे, किशोर कदम, अजित कुडचे, शैलेश दोडगे, किरण कुर्ले, राबिना शेख यांच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली. कोरोनाच्या काळातील भाडे माफ करण्याऐवजी महापालिका प्रशासन भाडेवाढ लादत आहे, असे शिष्टमंडळाने पालकमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com