स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

पुणे - शहरात स्वाइन फ्लूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे मंगळवारी कळविण्यात आली. या रोगाने शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत 28 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 105 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचेही सांगण्यात आले. 

शहरात गेल्या महिन्याभरापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून रुग्णांना उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्यामुळे शहरात स्वाइन फ्लूने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याची नोंद होत आहे. प्रत्यक्षात शहरातील 10 रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाला आहे, तर उपचारांसाठी आलेले 18 रुग्ण शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती खात्यातर्फे देण्यात आली. 

स्वाइन फ्लू झालेल्या 19 रुग्णांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे, तर 16 रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असल्याची सद्यःस्थिती आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये शहरात 168 रुग्णांना स्वाइन फ्लू झाला. मात्र, त्यापैकी शंभराहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.