अपहरणकर्त्यांकडून रोकड घेणारे दोन पोलिस निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पुणे - खासगी कंपनीच्या सरव्यवस्थापकासह ड्रायव्हरचे अपहरण करणाऱ्यांकडूनच दोन लाख 40 हजार रुपयांची रोकड घेणाऱ्या दोन पोलिसांना अखेर पोलिस प्रशासनाने निलंबित केले. या प्रकरणातील अपहरण करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

पुणे - खासगी कंपनीच्या सरव्यवस्थापकासह ड्रायव्हरचे अपहरण करणाऱ्यांकडूनच दोन लाख 40 हजार रुपयांची रोकड घेणाऱ्या दोन पोलिसांना अखेर पोलिस प्रशासनाने निलंबित केले. या प्रकरणातील अपहरण करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

अशोक जकप्पा मसाळ व सुरेश सोमलिंग बनसोडे अशी निलंबन केलेल्या पोलिसांची नावे आहेत. दोघेही भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. याप्रकरणी राहुल मनोहर कटमवार (वय 37, रा. सेरेन काउंटी, सिंहगड रस्ता) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. कटमवार हे बी. टी. कवडे रस्त्यावरील टोटल एन्व्हायर्न्मेंट या खासगी कंपनीमध्ये सरव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. ते 22 मे रोजी सायंकाळी काम संपवून कंपनीच्या गाडीमधून घरी निघालेले असताना चार जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते. 

अशी मिळवली रक्‍कम 
अपहरणकर्त्यांच्या मागणीनुसार कटमवार यांनी कुटुंबीय व कार्यालयातील सहकाऱ्यांकडून ड्रायव्हरमार्फत 14 लाख 30 हजार रुपयांची रक्कम त्यांना दिली होती. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी त्यांना शहरात विविध ठिकाणी फिरवून रात्री कात्रज येथे आणले. त्यांची कार रस्त्याच्याकडेला थांबलेली असतानाच तेथे गस्तीवर असलेले बीट मार्शल मसाळ व बनसोडे आले. त्यांनी कारभोवती थांबलेल्यांना हटकले, त्यांच्या कारची तपासणीही केली. त्या वेळी त्यांना कारमध्ये पैशाची बॅग आढळून आली. त्याबाबत विचारणा केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी ते पैसे जमिनीचे असल्याचे सांगून त्यातील दोन लाख 40 हजार रुपयांची बॅग पोलिसांना दिली. दरम्यान, हे अपहरण नाट्य ओळखण्याऐवजी पोलिसांनी पैशांची बॅग घेऊन तेथून काढता पाय घेतला. 

दरम्यान, कटमवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यामध्ये चार अपहरणकर्त्यांसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांचीही नावे घेतली होती. त्यावरून परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी बेशिस्त व बेजबाबदार वर्तनप्रकरणी मसाळ व बनसोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी पोलिस ठाण्याला याबाबतचा आदेश अद्याप प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट केले. 

रोकड केली जप्त 
या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. मात्र, अपहरणकर्त्यांकडील खंडणीच्या पैशातून दोन लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम नेणाऱ्या बीट मार्शलचा पोलिसांनी तत्काळ तपास घेतला. त्यामध्ये मसाळ व बनसोडे यांनी पैसे घेतल्याचे कबूल केले. दोघांनी कात्रज येथील लॉकरमध्ये पैसे ठेवले होते. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी पंचांच्या उपस्थितीत रोकड जप्त केली.

Web Title: Two police suspended