दोन हजार पुलांचे "स्ट्रक्‍चरल ऑडिट'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

पुणे - पुणे विभागातील लहान-मोठ्या 2 हजार 190 पुलांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून "स्ट्रक्‍चरल ऑडिट‘ करण्यात येणार आहे. त्यापैकी ब्रिटिशकालीन 162 पुलांचाही समावेश आहे. दरम्यान, अवैध वाळूउपशामुळे काही पुलांना धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी दिली.

महाड दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर किडे यांनी पुणे विभागातील पुलांची माहिती दिली. बेकायदा वाळूउपशामुळे सातारा जिल्ह्यातील कृष्णा- कोरेगाव पुलाचा पाया उखडल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने सर्व ब्रिटिशकालीन पुलांचे "स्ट्रक्‍चरल ऑडिट‘ करण्याचा आदेश दिला आहे. परंतु, 1960-70 दरम्यान अनेक पुलांची उभारणी झाली, त्यातील काहींना तडेही गेले आहेत. त्यामुळे या पुलांचेही "स्ट्रक्‍चरल ऑडिट‘ होणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

वाळूउपसा होणाऱ्या ठिकाणच्या पुलांना तसेच रस्त्यांनाही सर्वाधिक धोका पोचत आहे. पुलाच्या आजूबाजूचीही वाळू उपसली जात असल्याने अनेक ठिकाणी पुलाचा पाया उघडा पडत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची क्षमता 10 ते 12 टन वजन सहन करण्याची असते. मात्र, बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांकडून 35 ते 40 टनांची वाहने रस्त्यावरून नेली जातात, त्यामुळेही रस्ते खराब होत असल्याचे किडे यांनी सांगितले. 

सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यामध्ये दरड कोसळल्यामुळे काही रस्ते बंद केले आहेत; तर पावसाचे पाणी वाढल्याने सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तीन आणि सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक पूल वाहतुकीसाठी बंद केल्याचेही किडे यांनी सांगितले.