उद्धव ठाकरे यांचे पुण्याकडे दुर्लक्ष !

उमेश घोंगडे
मंगळवार, 17 जानेवारी 2017

पुणे: मुंबई महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व ताकद एकवटली असली तरी पुण्याकडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याची भावना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद या तीन महत्त्वाच्या सत्ताकेंद्रासाठी निवडणुका होत आहेत.

पुणे: मुंबई महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व ताकद एकवटली असली तरी पुण्याकडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याची भावना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद या तीन महत्त्वाच्या सत्ताकेंद्रासाठी निवडणुका होत आहेत.

राज्यात सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजपाने पुणे शहर जिल्ह्यावरही गेल्या सहा महिन्यापासून चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. अन्य पक्षातून महत्त्वाचे उमेदवार धूमधडाक्‍यात भाजपमध्ये आणण्याची मोहीम भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राबविली. मग शिवसेनेच्या गोटात सहा महिन्यापासून शांतता कशासाठी असा प्रश्‍न राजकीय निरीक्षकांना पडतो. भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले हे सहा महिन्यापासून अहोरात्र शत प्रतिशत भाजपाचा मंत्र जपत असताना शिवसेनेच्या गोटात सन्नाटा कशामुळे आहे हे कार्यकर्त्यांना समजेनासे झालेय.

लाल दिवा काढणार का?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 ते 1999 या काळात युतीचे सरकार असताना मंत्र्यांवर वचक ठेवला होता. या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मंत्र्यांना जिल्ह्याची जबाबदारी दिली जाई आणि पराभव झाल्यास मंत्र्यांचा लाल दिवा काढून घेण्याचा दमही बाळासाहेबांनी दिलेला असे. उद्धव ठाकरेंचा मंत्र्यांवर अंकुश राहिलेला नाही हे नगरपालिका निवडणुकांत शिवसेना मंत्र्यांच्या व आमदारांच्या कामावरून स्पष्ट झाले आहे. पूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुखच काय शाखाप्रमुखही मंत्र्यांना जाब विचारायचे. संघटन हे शिवसेनेचे बळ होते. शिवसेनेच्या जिवावर मंत्री झालेले नेते पुण्यात पक्ष वाढावा म्हणून भाजपाच्या मंत्र्यासारखी सर्व "शक्ती' का पणाला लावत नाहीत असे कार्यकर्ते कुजबूजू लागले आहेत. भाजपचे मुख्यमंत्री व सर्वमंत्री नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांसाठी भरमसाट "बळ' खर्ची घालत असताना शिवसेनेचे मंत्री "निर्बळ'का? शिवसेनेचे मंत्री कार्यकर्त्यांना "अर्थ"पूर्ण पाठबळ देत नाहीत ,याविषयीही शिवसेना कार्यकर्त्यांत तुलनात्मक चर्चा आहे.

जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी मेट्रो उद्‌घाटनाच्या निमित्ताने आव्हान देण्याची भाषा केली तेव्हा शिवसेना कार्यकर्त्यांना बरे वाटले होते. शिवतारेंनी खरा शिवसेनेचा बाणा दाखवला अशी चर्चा होती. पण जागावाटपाच्या चर्चेत शिवतारेंनी एकदम घूमजाव करून बापटांच्या समोर नांगी टाकल्याने कार्यकर्ते चकित झाले आहे.

पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला उद्धव ठाकरेंना वेळ नाही मात्र त्यांनी पुणे जिल्ह्याची जबाबदारी अन्य कोणा नेत्याकडे पूर्णपणे सोपविलेली नाही. विजय शिवतारे, खा. शिवाजीराव अढळराव पाटील, शहरप्रमुख विनायक निम्हण आणि खासदार श्रीरंग बारणे यांना अधिकार आणि जबाबदारी पूर्णपणे द्यायला हवी. तसेच अपयशासाठी जबाबदारही धरायला हवे.

संपर्क प्रमुख शूटिंगमध्ये !
शिवसेनेने पुण्यासाठी संपर्कप्रमुख म्हणून नेमलेले डॉ. अमोल कोल्हे हे चांगले चित्रपट कलावंत आहेत. माणूसही चांगला आहे. पण त्यांना पुण्याच्या राजकारणाची बाराखडीही अजून पाठ नाही. शिवाय राजकारण करावे की अभिनय करावे या संभ्रमातून ते अजूनही बाहेर पडले नसल्याने कार्यकर्ते या "हॅम्लेट'ला साकडे घालून दमले आहेत. अमोल कोल्हेंचे चित्रपटाचे शूटिंग जेथे असेल तेथे शिवसेनेच्या इच्छुकांना जाऊन बसावे लागते. तेथे शॉट ओके झाला की कार्यकर्ते त्यांच्याशी बोलायला धावतात तोच पुढचा शॉटचा इशारा होतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळात असे कलावंत फक्त प्रचारात कामी येत. यांच्या पुढे मागे आम्ही हिंडत बसलो तर वॉर्डात कधी जाणार? असे शिवसेनेत तीस वर्षे घालविलेल्या एका स्थानिक कार्यकर्त्याने न राहवून बोलून दाखविले.

भाजपचे नेते पुणे शहरातील युतीबाबत मौन राखतात आणि जिल्ह्यात मात्र युती करायचीच असे म्हणतात. युती करायचीच तर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा अशी तिन्ही ठिकाणी का नाही? जिल्हा परिषदेत भाजपचे फक्त तीन सदस्य आहेत. तेही मावळ तालुक्‍यात! फक्त जिल्हा परिषदेत युती झाली आणि शहरात "स्वबळा'वर मैत्रीपूर्ण लढत झाली तर शिवसेनेची अवस्था युद्धात जिंकले पण तहात हरले अशीच होईल.

Web Title: Uddhav Thackeray ignored Pune