अनपेक्षित उमेदवारांमुळे लढतीत चुरस

अनपेक्षित उमेदवारांमुळे लढतीत चुरस

पुणे - उमेदवारीवरूनच गाजावाजा झालेली अन्‌ अनेक राजकीय संदर्भ असलेली नागरिकांच्या मागास वर्गातील लढत कसबा पेठ- सोमवार पेठ प्रभागात (क्र. १६) होत आहे. भारतीय जनता पक्षाकडून गणेश बिडकर, काँग्रेस पुरस्कृत रवींद्र धंगेकर, मनसेचे राहुल तिकोणे, शिवसेनेचे जोतिबा शिर्के, ‘एमआयएम’चे फैय्याज कुरेशी, तर काँग्रेसचे बंडखोर मुख्तार शेख यांच्यात बहुरंगी सामना रंगणार आहे. पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक करिश्‍म्यावर या लढतीचा निकाल अवलंबून असेल. तसेच, येथे मतविभागणी कशी होणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. 

बिडकर, धंगेकर या प्रभागात विद्यमान नगरसेवक असून, नगरसेविका संगीता तिकोणे व त्यांचे पती राहुल येथून अनुक्रमे महिला सर्वसाधारण आणि नागरिकांच्या मागास गटातून निवडणूक लढवित आहेत. या प्रभागात ६२ हजार ५५४ मतदार आहेत. मुस्लिम समाजाची सुमारे ११ हजार, दलित समाजाची सुमारे १५ हजार, तर मराठा समाजाची सुमारे १० हजार मते या प्रभागात आहेत. त्याशिवाय भोई, कुंभार, तांबट या गावगाड्यातील कारू-नारू म्हणजेच आताचा ओबीसी समाज, तसेच ब्राह्मण आदी समाज घटकांचेही मतदान लक्षणीय आहे. धंगेकर या प्रभागातील विद्यमान नगरसेवक असून मनसेतून ते भाजपमध्ये जाणार, अशी निवडणुकीपूर्वी चर्चा होती. प्रत्यक्षात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उमेदवारी अर्जातील त्रुटींमुळे त्यांना आता काँग्रेसने पुरस्कृत केले आहे. बिडकरही विद्यमान नगरसेवक आहेत. बिडकर- धंगेकर हे दोघेही मागास गटातून निवडणूक लढवत असून, या गटातील या लढतीकडे शहराचे लक्ष लागले आहे. तिकोणे कुटुंबात नगरसेवकपद असल्यामुळे राहुल यांना अपेक्षा आहेत. एमआयएमही फैय्याज कुरेशींद्वारे रिंगणात उतरल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. त्यातच काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मुख्तार शेख यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. सर्वच समाजघटकांची संख्या येथे मोठी असल्यामुळे मतदारांचा कल  कोणालाही गृहित धरता येणार नाही. बिडकर- धंगेकर यांच्यातील भांडणे, हाणामाऱ्यांची चर्चा शहरभर झाली आहे. सुरवातीला एकतर्फी वाटणारी लढत आता बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे चुरशीची झाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि धंगेकर यांच्यातील राजकीय वितुष्ट सर्वश्रुत आहे, त्यामुळे बापट यांचे या प्रभागावर विशेष लक्ष आहे; तर येथील मतदार आपला वाटत असल्यामुळे आणि धंगेकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसच्या नेत्यांचीही या प्रभागावर नजर आहे. भाजप, काँग्रेसची चारही गटांतील उमेदवारी टिकली नाही; मात्र शिवसेना आणि मनसे चारही गटांतून लढत देण्यास यशस्वी ठरले आहेत.  

हा प्रभाग काँग्रेसने चारही गटांत लढविण्याचे जाहीर केले होते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने येथे उमेदवार उभे केलेले नाहीत. अनुसूचित जातीच्या महिला गटात काँग्रेसने वैशाली रेड्डी यांना पुरस्कृत केले असून, सर्वसाधारण महिला गटात सुजाता शेट्टी आणि खुल्या गटात नितीन परतानी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने सर्वसाधारण महिला गटात वैष्णवी सोनवणे आणि खुल्या गटात योगेश समेळ यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे अनुक्रमे पल्लवी जावळे, ज्योतिबा शिर्के, सुदर्शना त्रिगुणाईत, रवींद्र चव्हाण उमेदवार असून, मनसेकडून मनीषा सरोदे, राहुल तिकोणे, संगीता तिकोणे आणि प्रकाश वाबळे उमेदवार आहेत. याच प्रभागात खुल्या गटात मनसेकडून गेल्या वेळेस जिंकलेले नगरसेवक अजय तायडे यांनी बंडखोरी केली आहे, तर जया शेट्टी यांनी अखिल भारतीय सेनेकडून अर्ज भरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com