पुणे विद्यापीठाचा झेंडा देशात फडकला 

पुणे विद्यापीठाचा झेंडा देशात फडकला 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्तेचा झेंडा देशात फडकला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील विद्यापीठांच्या राष्ट्रीय मानांकनाच्या (नॅशनल इन्स्टिट्यूशन रॅंकिंग फ्रेमवर्क) श्रेणीमध्ये शंभर विद्यापीठांच्या क्रमवारीत या विद्यापीठाला दहावे स्थान मिळाले आहे. याच श्रेणीत बंगळूरचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रथम क्रमांकावर, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दुसरे आणि बनारस हिंदू विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर आहे. 

राज्यातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये श्रेणीच्या क्रमवारीत एकही पारंपरिक विद्यापीठ नाही, त्यामुळे पुणे विद्यापीठ राज्यात अव्वल ठरले आहे. अभिमत विद्यापीठांनी मात्र या यादीत चांगले स्थान मिळविले आहे. विद्यापीठाला मिळालेल्या या यशाबद्दल डॉ. गाडे यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ""विद्यापीठाला नुकतीच नॅकची "ए प्लस' श्रेणी मिळाली आहे. त्यापेक्षाही राष्ट्रीय मानांकनाच्या श्रेणीत मिळालेले दहावे स्थान हे अधिक महत्त्वपूर्ण आहे.'' 

""गेल्या पाच वर्षांत विद्यापीठातील प्राध्यापक आणि प्रशासनाने विकास, संशोधनकार्यात वाढ यासाठी योजनाबद्धपणे प्रयत्न केले. त्या कष्टाचे हे फळ आहे. आता विद्यापीठ अशा एका स्तरावर आले, की तेथून आंतरराष्ट्रीय क्रमवारीपर्यंत सहजपणे झेप घेता येऊ शकेल. राज्यातील इतर पारंपरिक विद्यापीठे आणि पुणे विद्यापीठ यांच्यात मोठी दरी असल्याचे यातून दिसून येते. कारण राष्ट्रीय मानांकनात राज्यातील एकाही पारंपरिक विद्यापीठास पहिल्या शंभरात स्थान मिळालेले नाही. याचा नक्कीच गांभीर्याने विचार करावा लागेल,'' असे मत त्यांनी व्यक्त केले. 

महाविद्यालये आणि विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड म्हणाले, ""विद्यापीठाला गेल्या पाच वर्षांत साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यातून संशोधनकार्यावर भर देता आल्याने विद्यापीठाचा संशोधनाचा निर्देशांक म्हणजेच एच इंडेक्‍स वाढला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांबरोबर सहकार्य करार झाले. त्यांच्याकडून निधीदेखील मिळाला आहे. सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे.'' 

पुण्यातील महाविद्यालयांना स्थान 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्वसाधारण, विद्यापीठ, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, महाविद्यालये अशा प्रकारांत श्रेणीच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात पुण्यातील अभिमत विद्यापीठे आणि अनेक महाविद्यालयांना, तसेच कोल्हापूर, सांगलीतील काही संस्थांना स्थान मिळाले आहे. मानांकनाची ही स्पर्धा या वर्षी सर्वांसाठी प्रथमच सक्तीची करण्यात आली होती. गेल्या वर्षीपासून ही श्रेणी निश्‍चित करण्यास सुरवात झाली. मात्र, गेल्या वर्षी विद्यापीठाने त्यात भाग घेतला नव्हता. 

एनआयआरएफ कशासाठी? 
देशपातळीवर पहिल्या शंभरच्या सर्वसाधारण यादीत राज्यातील आठ शिक्षण संस्था, महाविद्यालये व अभियांत्रिकी प्रत्येकी दहा, फार्मसीच्या 15 शिक्षण संस्था आहेत. शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे हे वर्तमान चित्र आहे, "इंडिया-वन' या शैक्षणिक मानांकन यादीतील ! मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पाच श्रेणींच्या याद्या जाहीर करताना या दर्जेदार शिक्षण संस्थांना केंद्राकडून वाढीव अर्थसाह्य दिले जाईल, अशी घोषणा केली. येत्या 10 एप्रिलला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पाच श्रेणींतील प्रत्येकी 10 अग्रमानांकित शिक्षण संस्थांचा गौरव दिल्लीत करण्यात येईल. 

जगातील पहिल्या 200 दर्जेदार विद्यापीठांत भारतातील एकही विद्यापीठ नाही, या वस्तुस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने 2015 मध्ये राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन संरचना (एनआयआरएफ) जाहीर करण्याची घोषणा केली. त्यानुसार देशभरातील उच्चशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागवून मागच्या वर्षी पहिली यादी जाहीर झाली. या वर्षीच्या यादीत मूळ कल्पनेचा विस्तार करून सर्वसाधारण महाविद्यालयेही जोडण्यात आली. प्रत्येकाला भाग घेणे सक्तीचे केले. मूळ 20 निकषांमध्ये संबंधित शिक्षण संस्थांत शिक्षण घेतलेल्या किती तरुणांना रोजगार मिळाला व त्यांना रोजगार देणाऱ्या संस्थांचे त्यांच्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल काय मत आहे, यांसारखेही निकष जोडण्यात आले आहेत. यंदा 3300 संस्थांनी स्पर्धेत भाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com