नृत्याविष्कारातून घडले कथकचे विविधांगी दर्शन

Various philosophies of Kathak from dance drama
Various philosophies of Kathak from dance drama

पुणे : लालित्यपूर्ण पदन्यासाने मंत्रमुग्ध करणाऱ्या नृत्याविष्काराद्वारे कथकचे विविधांगी दर्शन रसिकांना शुक्रवारी घडले. आषाढातील सांजवेळी रंगलेल्या या हृद्य मैफलीने पुणेकरांची मने जिंकली. "नृत्यभारती'च्या चारही पिढीतील विद्यार्थ्यांनी कथक रचनांची गुरुदक्षिणा गुरू रोहिणी भाटे यांच्या स्मृतीस विनम्रपणे अर्पण करत कृतज्ञता व्यक्त केली. निमित्त होते नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेनिमित आयोजित "वेध साधनेचा' मैफलीचे. गेली 71 वर्षे अखंडित सुरू असलेल्या अभिजात कथक परंपरेचा प्रवास यातून रसिकांसमोर उलगडला. 

मैफलीचा प्रारंभ भाटे यांच्या शिष्या मनीषा अभय, आभा वांबुरकर, आसावरी पाटणकर यांच्या सादरीकरणाने झाला. तबलावादक पं. अरविंदकुमार आजाद यांनी रचलेल्या गुरुवंदनेवर लयबद्ध नृत्याविष्कार करत कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सुकृती डान्स अकॅडमीच्या मनीषा अभय व त्यांच्या शिष्यांनी चौतालातील रचना प्रस्तुत केली. पखवाजवादक गोविंद भिलारे यांच्या साथीने रंगत वाढली. त्यांनी पेश केलेले "यति परण' याला दाद मिळाली. आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी कथकच्या असीम शैलीचे दर्शन घडविले. त्यांनी सादर केलेल्या "चैतन्य' या संवेदनशील कलाकृतीने रसिकांना अंतर्मुख केले. 

"सज धज सजन मिलन चली' ही "अभिसारिका नायिका' आभा वांबुरकर यांनी साभिनय व पद्‌न्यासातून रसिकांसमोर उलगडली. त्यानंतर राग सागर रचना शिष्यांनी सादर करत पहिल्या सत्राची सांगता केली. दीक्षा कथक डान्स अकॅडमीच्या वांबुरकर व त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या शिववंदनेने दुसऱ्या सत्राची सुरवात झाली. त्यांचे "रूप धमार' सादरीकरण सर्वांना भावले.

कॅलिडोस्कोप हा यमन रागातील तराणा व निसर्गाच्या बदलत्या रूपाचे वर्णन करणाऱ्या ऋतुगान या अजरामर रचनेचेही सादरीकरण झाले. शिष्या अमला शेखर यांनी काव्यमय नृत्यातून भाटे यांच्या व्यक्तिमत्त्वातले अव्यक्त पैलू उलगडले. अजय पराड, अर्पिता वैशंपायन, गोविंद भिलारे आणि नील अवचट यांनी संगीत साथ दिली. आभा औटी यांनी सूत्रसंचालन केले. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com