'वाहन 4.0' प्रणालीला गती देण्यासाठी संघटनांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरू केलेल्या "वाहन 4.0' या संगणक प्रणालीला इंटरनेट सेवतील कमतरतेची अडचण येत आहे. त्यामुळे या संगणकप्रणालीच्या माध्यमातून कामे मार्गी लागण्याऐवजी उलट त्रासच वाढला आहे. यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आरटीओमध्ये इंटरनेटचा अतिरिक्त प्लॅन घेण्यासाठी वाहतूक संघटना आणि आरटीओतील एजंटांच्या संघटनेने पुढाकार घेतला असून, दरमहा प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचा मानस व्यक्त केला आहे.

आरटीओमध्ये दोन महिन्यांपूर्वी ही संगणकप्रणाली सुरू करण्यात आली. मात्र, कर्मचाऱ्यांना असणारे अपुरे ज्ञान, प्रणालीमध्ये उद्‌भवणाऱ्या अडचणी आणि इंटरनेटच्या समस्येमुळे आरटीओतील कामांना विलंब होत आहे. अनेकदा इंटरनेट बंद पडल्यानंतर पारंपरिक पद्धतीने काम करावे लागते. त्यामुळे नागरिकांना एका कामासाठी तासन्‌ तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

आरटीओ कार्यालयाच्या कामाचा व्याप विचारात घेता आरटीओमध्ये शंभर एमबीपीएस वेगाने चालणारे इंटरनेट कनेक्‍शन आवश्‍यक आहे. मात्र, येथील इंटरनेटचा वेग दहा एमबीपीएसपेक्षा पुढे जात नाही. याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी अतिरिक्त इंटरनेटच्या व्यवस्थेसाठी परिवहन आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला असून अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

"आरटीओ'मध्ये सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. इंटरनेटचा वेग कमी असेल किंवा सातत्याने बंद पडत असेल, तर कोणतेही काम वेळेत होऊ शकत नाही. प्रशासनाला त्यांच्या पातळीवर इंटरनेटचा वेग वाढविता येत नसले. तर, दरमहा प्रत्येकी दहा हजार रुपये देऊन इंटरनेटचा वेग वाढविण्याची तयारी वाहतूक संघटना आणि आरटीओतील एजंट संघटनांनी दर्शविली असून तशी चर्चाही आरटीओ प्रशासनाशी केली आहे.
- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक संघटना

Web Title: vehicle 4.0 process