पुण्याचा 'कचरा' पेटवला 'राष्ट्रवादी'नेच : शिवतारेंचा आरोप

टीम ई सकाळ
शनिवार, 6 मे 2017

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मी आज ग्रामस्थांशी चर्चेसाठी गेलो. गेल्या एकविस दिवसांपासून कचरा प्रश्‍नी आंदोलन सुरू आहे. ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा झाली. परंतु काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण ग्रामस्थांच्या आंदोलनात सामील झाल्या. दोन्ही खासदार एकीकडे कचऱ्याच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेमध्ये सामील होतात, आणि दुसरीकडे शहरात येऊन कचरा उचला यासाठी आंदोलन करतात, हा दोन्ही खासदारांचा दुटप्पीपणा आहे.

पुणे : पुण्यात गेले तीन आठवडे सुरू असलेल्या कचऱयाच्या प्रश्नात आज (शनिवार) राजकारण शिरले. फुरसुंगी आणि उरळी देवाची येथे कचरा डेपोंच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार वंदना चव्हाण यांची फूस असल्याचा जाहीर आरोप जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

शिवतारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी विधानभवनात आज कचऱयाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱयांची बैठक घेतली. 

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मी आज ग्रामस्थांशी चर्चेसाठी गेलो. गेल्या एकविस दिवसांपासून कचरा प्रश्‍नी आंदोलन सुरू आहे. ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा झाली. परंतु काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण ग्रामस्थांच्या आंदोलनात सामील झाल्या. दोन्ही खासदार एकीकडे कचऱ्याच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेमध्ये सामील होतात, आणि दुसरीकडे शहरात येऊन कचरा उचला यासाठी आंदोलन करतात, हा दोन्ही खासदारांचा दुटप्पीपणा आहे. पक्षीय राजकारण बंद करून सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढला पाहिजे. त्यांची आंदोलकांना फूस आहे हे उघड आहे. त्यामुळे राजकारण करून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्यांना पुणेकर धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.'' 

दरम्यान, राष्ट्रवादीने या आरोपाचा इन्कार केला. 'शिवतारे यांच्या विधानसभा मतदारसंघातील हा प्रश्न आहे. तो त्यांना सोडवता येत नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत,' असा दावा राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नगरसेवक तुपे यांनी केला.