मतदार नोंदणी ‘हायजॅक’

ज्ञानेश सावंत - @ssdnyanesh
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

पुणे - महापालिकेच्या नव्या प्रभागांमध्ये हक्काची ‘व्होट बॅंक’ उभारण्यासाठी इच्छुक सरसावले असून, महापालिकेची मतदार नोंदणी मोहीम इच्छुकांनीच ‘हायजॅक’ केल्याचे दिसून येत आहे. नव्या रचनेतील प्रभागांमधील नागरिकांना मतदार नोंदणी आणि दुरुस्तीचे आवाहन करीत इच्छुक घरोघरी पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनसंपर्क कार्यालये, राजकीय पक्षांच्या कचेऱ्या आणि बाजारपेठांमध्ये मतदार नोंदणीची यंत्रणा त्यांनी उभारली आहे.

पुणे - महापालिकेच्या नव्या प्रभागांमध्ये हक्काची ‘व्होट बॅंक’ उभारण्यासाठी इच्छुक सरसावले असून, महापालिकेची मतदार नोंदणी मोहीम इच्छुकांनीच ‘हायजॅक’ केल्याचे दिसून येत आहे. नव्या रचनेतील प्रभागांमधील नागरिकांना मतदार नोंदणी आणि दुरुस्तीचे आवाहन करीत इच्छुक घरोघरी पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनसंपर्क कार्यालये, राजकीय पक्षांच्या कचेऱ्या आणि बाजारपेठांमध्ये मतदार नोंदणीची यंत्रणा त्यांनी उभारली आहे.

प्रभागांमध्ये नवे मतदार तयार करून त्यांना आपले करण्याच्या उद्देशाने गल्लीबोळासह चौका-चौकांमध्ये मतदार नोंदणीसाठी आवश्‍यक कागदपत्रांची माहिती देणारे फलक उभारले आहेत. नोंदणीचे ठिकाण, तेथील सेवा-सुविधांची माहितीही देण्यात येत आहे. मतदारांना नोंदणी आणि दुरुस्तीचे अर्ज उपलब्ध करून ते जागेवरच भरून देण्याची व्यवस्थाही या केंद्रांवर केली आहे. यानिमित्ताने नव्या मतदारांना जोडण्याचा इच्छुकांचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदार नावनोंदणी आणि दुरुस्तीची मोहीम सुरू आहे. अधिकाधिक मतदार नोंदणीसाठी महापालिकेच्या पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी इच्छुकही यानिमित्त प्रयत्न करीत आहेत. नव्या प्रभागांच्या हद्दी जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्यात सुमारे ७५ ते ८० हजार मतदारांपर्यंत पोचण्याचे आव्हान इच्छुकांसमोर आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत असून, प्रभागांच्या पातळीवर इच्छुकही मतदार नोंदणी करून घेत आहेत.

प्रभागातील जनसंपर्क कार्यालये आणि कचेऱ्यांत मतदार नोंदणी सुरू आहे. 
नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नोंदणी केंद्रांवर कार्यकर्तेही नेमले आहेत. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

मतदार नोंदणीसाठी आवश्‍यक कागदपत्रांची माहिती देणारे फलक. 
नोंदणीचे ठिकाण, तेथील सेवा-सुविधांची माहितीही देण्यात येत आहे. 
मतदारांना नोंदणी आणि दुरुस्तीचे अर्ज उपलब्ध करून ते जागेवरच भरून देण्याची व्यवस्था.

मतदार नावनोंदणी व दुरुस्ती 14 ऑक्‍टोबरपर्यंत

अर्ज स्वीकारण्याची ठिकाणे

महापालिकेची १५ क्षेत्रीय कार्यालये

शाळा, महाविद्यालये ५५ ठिकाणे

नागरिकांचा प्रतिसाद
नव्याने नाव नोंदणी करतानाच नाव आणि पत्त्यात बदल करण्याची सोय आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह युवक-युवतींची नोंदणी होत आहे. या ठिकाणी त्यांना बसण्याची व्यवस्था केली आहे. अर्ज भरून देण्याबरोबर ते गोळा करून संबंधित यंत्रणेकडे देण्याची व्यवस्था केली आहे, असे पदाधिकाऱ्याने सांगितले.

पदाधिकाऱ्यांकडून आग्रह
राजकीय पक्षांकडून मतदार नोंदणी करून घेतली जात असली तरी दहापेक्षा अधिक अर्ज न स्वीकारण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिला आहे. मात्र, राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज येत असल्याने ते स्वीकारताना प्रशासनासमोर अडचणी येत आहेत. तरीही अर्ज स्वीकारण्याचा आग्रह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून होत असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.