मतदार शिवसेनेच्या पाठीशी 

मतदार शिवसेनेच्या पाठीशी 

पुणे - ""राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार, कॉंग्रेसचा नाकर्तेपणा आणि भाजपचा खोटारडेपणा शिवसेनेनेच चव्हाट्यावर आणला आहे. पुण्यातील मतदार खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील,'' असा विश्‍वास शिवसेनेच्या वतीने आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

शहर शिवसेनेच्या वतीने महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहरप्रमुख विनायक निम्हण, राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेते शशिकांत सुतार, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अशोक हरणावळ, सचिन तावरे, रामभाऊ पारिख, निर्मला केंढे, राधिका हरिश्‍चंद्रे, रमेश बोडके आदी उपस्थित होते. 

विनायक राऊत म्हणाले, ""शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युती तोडण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भगवा झंझावात निर्माण झाला आहे. आता भाजपला भविष्य नाही. केवळ शिवसेनाच आपल्या मदतीला धावून येऊ शकते, हा विश्‍वास प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.'' 

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ""जाहीर प्रचाराबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही उमेदवारांनी शिवसेनेचा वचननामा लोकांपर्यंत पोचविला पाहिजे. चारही उमेदवारांनी एकत्र प्रचार करावा. नोटाबंदीने भाजपविरोधात निर्माण झालेला राग मतपेटीतून व्यक्त करण्यासाठी नागरिकांना आवाहन करा.'' 

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ""आपल्या प्रभागातील प्रश्‍नांसंदर्भात नागरिकांशी चर्चा करा आणि शिवसेनाच त्यांचे प्रश्‍न सोडवू शकते, याबद्दल लोकांमध्ये विश्‍वास निर्माण करा.'' विजय शिवतारे म्हणाले, ""सूक्ष्म नियोजनातून प्रचार केला, की विजय हमखास मिळतो, हे मी अनुभवले आहे.'' 

उद्धव ठाकरे-पटेल भेट टाळण्याचा प्रयत्न 
मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हार्दिक पटेल येत आहे, हे कळल्यावर त्याचे विमान दीड तास आकाशात घिरट्या घालत ठेवण्यात आले. वैमानिकाने इंधन संपत असल्याचा मेसेज पाठविला. मुंबई विमानतळाबाहेर असलेल्या शिवसैनिकांनी एटीएसला इशारा दिला. तेव्हा ते विमान खाली उतरविण्यात आले. असा दळभद्री प्रयत्न भाजपवाल्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या माध्यमातून अशा प्रकारे हिटलरशाही नांदत आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com