भाजपच्या नव्या चेहऱ्यांकडून मातब्बर पराभूत

- ज्ञानेश्‍वर बिजले
शनिवार, 11 मार्च 2017

प्रभाग १० - बावधन-कोथरूड डेपो

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृहनेत्याच्या नेतृत्वाखालील पॅनेल, तसेच मनसेच्या गटनेत्यांसह तीन नगरसेवक असलेले पॅनेल यांना प्रभाग क्रमांक दहा (बावधन-कोथरूड डेपो) मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविणाऱ्या चार नव्या चेहऱ्यांनी पराभूत केले. झालेल्या मतदानापैकी जवळपास निम्मी मते मिळवत भाजपच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

प्रभाग १० - बावधन-कोथरूड डेपो

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृहनेत्याच्या नेतृत्वाखालील पॅनेल, तसेच मनसेच्या गटनेत्यांसह तीन नगरसेवक असलेले पॅनेल यांना प्रभाग क्रमांक दहा (बावधन-कोथरूड डेपो) मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविणाऱ्या चार नव्या चेहऱ्यांनी पराभूत केले. झालेल्या मतदानापैकी जवळपास निम्मी मते मिळवत भाजपच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

भाजपचे उमेदवार किरण दगडे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील सभागृहनेते बंडू केमसे आणि महापालिकेतील मनसेचे गटनेते किशोर शिंदे यांना पराभूत करत ‘जायंट किलर’ ठरले. या प्रभागात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांच्याबरोबरच शिवसेनाही लढतीत उतरली होती. भाजप वगळता अन्य पक्षांमध्ये आजी-माजी नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाईक असल्याने येथे चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा प्रचाराच्या वेळी व्यक्त करण्यात येत होती; मात्र भाजपच्या सर्व फेऱ्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेत विजय मिळविला.

या प्रभागात जुन्या प्रभागापैकी केमसे आणि मनसेच्या नगरसेविका पुष्पा कनोजिया यांचा पूर्ण प्रभाग, तसेच मनसेच्या नगरसेविका जयश्री मारणे आणि किशोर शिंदे यांच्या प्रभागाचा काही भाग समाविष्ट करण्यात आला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली. त्यात या प्रभागातील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे काँग्रेसने मान्य केले. त्यामुळे या प्रभागात काँग्रेसचे उमेदवारच नव्हते. मनसेचे माजी नगरसेवक राजा गोरडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता; मात्र उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यांच्या पत्नी अंजली गोरडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली.
केमसे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याने, तसेच अन्य उमेदवारांमुळे राष्ट्रवादीचे पॅनेल भक्कम झाले होते. मनसेच्या तिन्ही नगरसेवकांना उमेदवारी मिळाली. त्यांचा या प्रभागात संपर्क असल्याने त्यांनीही लढतीत आव्हान उभे केले होते. अशा स्थितीतही भाजपच्या उमेदवारांनी एकत्रितरीत्या प्रचार करत विरोधकांवर मात केली.

भाजपचे उमेदवार दिलीप वेडे पाटील आणि दगडे पाटील हे बावधन भागातील. वेडे पाटील यांनी दहा वर्षे सरपंच म्हणून काम केले आहे. गणेश वरपे या भागात भाजपचे पंधरा वर्षे काम करत असून, वस्ती भागात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यांच्या पत्नी अल्पना वरपे यांना उमेदवारी मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ॲड. अशोक प्रभुणे यांची कन्या डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. भाजपचे हे चारही उमेदवार एकत्रितपणे प्रचारात उतरले. त्यांच्या मतांमध्येही केवळ एक ते दीड हजार मतांचा फरक राहिला. त्याचा फायदा त्यांना झाला आणि चौघेही विजयी झाले.

दिलीप वेडे पाटील यांनी साडेबारा हजारांचे मताधिक्‍य मिळवत राष्ट्रवादीचे कुणाल वेडे यांचा पराभव केला. किरण दगडे पाटील यांनी सात हजार २४१ मतांचे अधिक्‍य मिळवत केमसे यांच्याविरुद्ध विजय मिळविला. या गटात मनसेचे किशोर शिंदे तिसऱ्या क्रमांकावर होते. महिलांसाठीच्या ‘ब’ गटात डॉ. श्रद्धा प्रभुणे यांनी नगरसेविका मारणे यांचा दहा हजार ८५४ मताधिक्‍याने, तर ‘क’ गटात भाजपच्या अल्पना वरपे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार साधना डाकले यांचा अकरा हजार २३३ मताधिक्‍याने पराभव केला. ‘क’ गटात मनसेच्या नगरसेविका पुष्पा कनोजिया तिसऱ्या क्रमांकावर होत्या.

Web Title: wealthy candidate defeated by BJP new candidate