शूर आम्ही सरदार...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

शस्त्रास्त्र प्रदर्शनात रमले पुणेकर; "ब्राह्मोस', "रॉकेट लॉन्चर', तोफेचे ठरतेय आकर्षण

शस्त्रास्त्र प्रदर्शनात रमले पुणेकर; "ब्राह्मोस', "रॉकेट लॉन्चर', तोफेचे ठरतेय आकर्षण
पुणे - देशाच्या वैज्ञानिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र, "डीआरडीओ'ने विकसित केलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे अन्‌ तोफा प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या किंवा बंदूक हातात घेऊन निरखून पाहायला मिळाल्याने आपोआपच "शूर आम्ही सरदार...' अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होत होती. इतकेच नव्हे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या योगदानाचे भानही प्रत्येकाच्या मनात जागे होत होते.

निमित्त होते राज्य सरकार, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित भारतीय विज्ञान संमेलनातील शस्त्र प्रदर्शनाचे! देशभरातील संशोधन संस्थांच्या कार्यासह देशातील पारंपरिक ज्ञानाची ओळख करून देणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते "व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे झाले. त्यानंतर शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे तर अनेक ज्येष्ठ नागरिकही शस्त्रे पाहण्यात रंगून गेली. शस्त्रे नेमकी कशी चालवली जातात, चालवताना कुठले भान बाळगायचे असते...असे नानाविध प्रश्‍नही मुले विचारताना दिसली.

ब्राह्मोस क्षेपणास्त्र, पिनाका मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर, "भारत' हॉवित्झर तोफ, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, तसेच भारतातील पारंपरिक व्यवसायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष सादरीकरण हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले. या वेळी "विज्ञान भारती'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय भटकर, महासचिव ए. जयकुमार, संघटनमंत्री जयंत सहस्रबुद्धे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेसचे संचालक डॉ. शेखर मांडे, "डीआरडीओ'च्या एसीई विभागाचे महासंचालक डॉ. पी. के. मेहता,
संमेलनाचे संयोजक मुकुंद देशपांडे उपस्थित होते. फर्ग्युसन महाविद्यालय येथे हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. 14) सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

भारताला पारंपरिक ज्ञानाचा मोठा वारसा लाभला आहे. आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाच्या संगमातून संशोधनाच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात.
- सुरेश प्रभू, केंद्रीय रेल्वेमंत्री