महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळेल - मुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

पुणे - तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीच्या माध्यमातून महिलांना नेतृत्वविकासाची संधी मिळणार आहे, तसेच महिला सक्षमीकरणालाही बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया महिला बालकल्याण आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. राज्यभरातील तनिष्का उमेदवारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून ‘सकाळ’च्या बीड येथील प्रतिनिधीकडून तनिष्का व्यासपीठाच्या उपक्रमाची, येत्या १५, १६ ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीची माहिती घेतली. नेहमीच्या निवडणुकीपेक्षा वेगळ्या असणाऱ्या, महिलांच्या अपेक्षा, मते जाणून घेणाऱ्या या उपक्रमाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांची, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारी जणू लोकचळवळ उभी राहिली आहे. ग्रामविकासाचे अनेक उपक्रम तनिष्कांनी साकार केले, याची कल्पना आहे. आता निवडणूक म्हणजे या लोकचळवळीचा पुढचा टप्पा ठरावा.’’ महिलांना लोकशाही व्यवस्थेची, मूल्यांची, प्रशासनाच्या कामकाजाची ओळख होईल. त्यातून महिलांचे सक्षमीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘महिला, बालकल्याण, ग्रामविकासाच्या तसेच लोकोपयोगी अनेक सरकारी योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्यात तनिष्का सदस्यांनी सहभागी व्हावे.

ग्रामविकासात महिला मोलाची भूमिका बजावू शकतात. तनिष्कांनी त्यासाठी पुढे यावे.’’