भिगवण - रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडल्यामुळे वाहन चालकांची कसरत 

प्रशांत चवरे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

भिगवण (पुणे) : भिगवण राशीन रोडवरील खानोटा (ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम दोन वर्षापासुन सुरु आहे. मागील सहा महिन्यांपासुन भुसंपादनामधील अडचणीमुळे पुलाचे काम ऱखडल्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या भुसंपादनासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवुन उड्डाणपुलाचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी वाहन चालकांकडुन व या भागातील नागरिकांकडुन होत आहे.

भिगवण (पुणे) : भिगवण राशीन रोडवरील खानोटा (ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम दोन वर्षापासुन सुरु आहे. मागील सहा महिन्यांपासुन भुसंपादनामधील अडचणीमुळे पुलाचे काम ऱखडल्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या भुसंपादनासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवुन उड्डाणपुलाचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी वाहन चालकांकडुन व या भागातील नागरिकांकडुन होत आहे.

भिगवण राशीन रस्त्यावर रेल्वे मार्गामुळे सातत्याने होत असलेली वाहतुक कोंडी व वाहन चालकांना वाया जात असलेला वेळ वाचविण्यासाठी २०१६ मध्ये उड्डाणपुलाच्या कामास मंजुरी देण्यात आली. उड्डाणपुलाच्या कामासाठी भुसंपादनासह सुमारे २२ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. डिसेंबर २०१६ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. त्यानंतर सुमारे वर्षभर उड्डाणपुलासाठी स्तंभ उभे करणे, पर्यायी रस्ता निर्माण करणे आदी कामे सुरुळीत सुरु होती.

परंतु त्यानंतर जेव्हा भुसंपादनाचा विषय समोर आला तेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम मागील सहा महिन्यांपासुन ऱखडले आहे. सध्या मुख्य रस्त्यावर आर.सी.सी. स्तंभ उभारण्यात आले असुन वाहनांसाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. पर्यायी रस्त्याची योग्यवेळी दुरुस्ती न केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. या ठिकाणी रेल्वे गाड्यांची मोठी वर्दळ असल्यामुळे मोठी वाहतुक कोंडी होती. त्यातच खराब झालेल्या रस्त्यावर रेल्वे रुळापर्यत वाहन जाईपर्यंत अनेकदा परत रेल्वे गेट बंद होत असल्याचेही चित्र आहे. येथील शेतकरी व खानोटा(ता.दौंड)चे माजी सरपंच अशोक गायकवाड म्हणाले, संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मोबादला मिळाल्यानंतर कामास हरकत नाही.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे भिगवण शाखा अभियंता आर.डी. जाधव यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोन वर्षापुर्वी खानोटा (ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. भुसंपादनातील अडचणीमुळे मागील काही दिवसांपासुन हे काम बंद आहे. या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याची काही प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याबाबत ठेकेदारास रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची सुचना करण्यात आली आहे. भुसंपादनाबाबत शेतकरी व दौंड पुरंदरचे उपविभागीय प्रांताधिकारी यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या भुसंपादनाविषयीच्या अडचणी दुर करुन शेतकऱ्यांच्या सहमतीने तातडीने हे काम सुरु करण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: work in progress of railway flyover problem to citizens