कचरावेचकांचे काम बंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

जानेवारी २०१७ पर्यंत कामाचा ठेका होता. स्थायी समितीकडे वाढीव मुदतीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. अद्याप कामाचा आदेश न दिल्याने तीन महिन्याचे बिल अदा केले नाही. त्यामुळे कामगारांचे वेतन देऊ शकलो नाही. 
- प्रकाश लोखंडे, व्यवस्थापक, सावित्री महिला स्वयंरोजगार संस्था

पिंपरी - कंत्राटदाराची कामाची मुदत संपली असल्याने महापालिकेने अद्याप बिल अदा केलेले नाही. त्यामुळे ‘ड’ प्रभागातील कचरावेचक तब्बल तीन महिन्यांपासून पगाराविनाच काम करीत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तीन महिन्यांचा थकीत पगार लवकर मिळावा, या मागणीसाठी ‘ड’ प्रभागातील कचरावेचक महिलांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन केले. 

‘ड’ प्रभागातील ९४ कचरावेचक, ७ सुपरवायझर, ५४ वाहनचालकांचा जानेवारी ते मार्च या महिन्यांचे वेतन थकले आहे. ते लवकर द्यावे, यासाठी आज सकाळी पार्किंगजवळच कामगारांनी वाहने थांबवून दीड तास काम बंद आंदोलन केले. क्षेत्रीय अधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी भेट देऊन ‘कामगारांना मंगळवारपर्यंत दीड महिन्याचा पगार देण्यात येईल. त्यानंतर दहा दिवसांत उर्वरित पगार होईल,’ असे आश्‍वासन दिले.

कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीच्या सोनाली कुंजीर म्हणाल्या, ‘‘दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत पगार होणे अपेक्षित आहे. कामगारांना वेठीस धरू नये. पालिका आणि कंत्राटदार यांच्यातील समन्वयातील अभावामुळे कचरावेचक कामगारांवर उपासमारीची वेळ येते.’’ कचरावेचक लक्ष्मी आंग्रे म्हणाल्या, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सण तोंडावर आहे. सणासुदीला तरी आमचा पगार करावा.’’ जयश्री शिंदे म्हणाल्या, ‘‘अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या मंगळवारपर्यंत पगार झाला पाहिजे. तीन महिन्यांपासून पगार हातात मिळाला नाही.’’

Web Title: Work stop movement