अकराव्या मजल्यावरून पडून कामगार महिलेचा मृत्यू

Worker woman dies after falling from the eleventh floor
Worker woman dies after falling from the eleventh floor

पुणे (औंध) : अकराव्या मजल्यावरून पडून सफाई कामगार महिला मृत्युमुखी पडल्याची घटना सोमेश्वरवाडी पाषाण येथील शिवरंजन टाॅवर इमारतीत आज सकाळी घडली. राधा शाबा भडकवाड (वय 28 वर्षे रा. इंदिरा गांधी वसाहत,औंध) असे महिलेचे नाव असून, ती एका खाजगी कंत्राटदाराकडे सफाई कामगार म्हणून काम करत होती.

आज सकाळी अकराव्या मजल्यावरील जिन्याजवळ साफसफाई करत असताना ती खाली पडली. डोक्याला व चेहऱ्याकडील भागाला जोराचा मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर जिन्याजवळ काम करताना ती पोर्चमधून खाली पडल्याची माहिती कंत्राटदार बापू गायकवाड यांनी दिली.

मयत राधाच्या हाताला दोरी बांधलेली होती व खाली पडल्यानंतरही हाताला गुंडाळलेली असल्याने या घटनेत तिचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत दोरी हाताला नसून जमिनीवर आधीच पडलेली होती व राधा नेमकी दोरीजवळ पडल्याने गैरसमज झाल्याचे सांगितले. काल रात्री (मंगळवारी) तिच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने रात्रभर थकलेली राधा सकाळी कामावर जायला तयार नव्हती. परंतु कंत्राटदाराने जबरदस्तीने कामावर बोलावून घेतल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले.

मृत राधा ही घरात एकटीच कमावणारी आहे. पतीला दारूचे व्यसन असल्याने घरातील सर्व जबाबदारी तिच्यावर होती. तिच्या पश्चात पती, अकरा वर्षांची  मुलगी, अनुक्रमे आठ व सहा वर्षाची दोन मुले असून आईचे छत्र हरपल्याने मुले पोरकी झाली आहेत. 

आई गेल्याची जाणीवही या मुलांना नव्हती, एवढी ती मुले अजाण आहेत. आईच्या मृत्यूनंतर मुलांना वडिलांचाही आधार मिळणे अशक्य असल्याने त्यांच्या भविष्याची जबाबदारी कंत्राटदाराने घ्यावी अशी मागणी शेजारी, नातेवाईक व कुटुंबियांनी केली आहे. जोपर्यंत आम्हाला मुलांच्या भविष्याची जबाबदारी घेण्याबद्दल लेखी स्वरूपात आश्वासन दिले जात नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कुटुंबियांनी घेतला होता.

राधाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच मुलांच्या भविष्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन द्यावे, अशी मागणी कुटुंबियांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com