कैद्यांनी तयार केलेल्या चपला होणार ‘एक्‍स्पोर्ट’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

येरवडा - कैद्यांचे ‘सुधारणा व पुनर्वसन’अंतर्गत राज्यातील मध्यवर्ती कारागृहात विविध उपक्रम सुरू आहेत. यामध्ये कैद्यांना विविध कौशल्यावर आधारित उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते. याचाच एक भाग म्हणून मुंबई येथील टेरगेस वर्क प्रा. लि. कंपनीच्या सहकार्याने येरवडा मध्यवर्ती कारागृहात चप्पलनिर्मिती युनिट सुरू केले आहे. येथील चपला लवकरच एक्‍स्पोर्ट होणार असल्याची माहिती ‘टेरगस’चे दिवेश शहा यांनी दिली.

राज्यातील कारागृहात कैद्यांची ‘सुधारणा व पुनर्वसन’अंतर्गत कारागृह प्रशासन कैद्यांना विविध उद्योगांत गुंतवून ठेवते; तर काही कैद्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे व्यवसायाभिमुख उद्योगांचे प्रशिक्षणही देते. ज्यामुळे कैदी कारागृहात असेपर्यंत काम करून त्यांना पगार मिळेल. त्यानंतर बाहेर पडल्यावर ते स्वतःचा उद्योग व्यवसाय करू शकतील, असा त्यामागचा हेतू असल्याची माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली.

काही वेळा कारागृहातील मर्यादित साधनांमुळे सर्वच कैद्यांना चांगले उद्योग देता येत नाहीत. त्यासाठी कारागृह महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांनी कारागृहातील कैद्यांच्या हातांना काही तरी काम द्या, असे आवाहन विविध कंपन्या व स्वयंसेवी संस्थांना केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून टेरगेस कंपनी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातील ४२ कैद्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून दर्जेदार चपलांची निर्मिती करून घेत आहे. या बदल्यात त्यांना कारागृहाच्या नियमाप्रमाणे कुशल कारागीर म्हणून प्रतिदिन ६१ रुपये मजुरी मिळत आहे. आठवड्यातील सहा दिवस कारागृहात एखाद्या कंपनीप्रमाणे काम सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.
शहा म्हणाले, ‘‘कैद्यांनी बनविलेल्या चपला उत्तम असून, त्या एक्‍स्पोर्ट दर्जाच्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी चांगले ब्रॅंडिंग करणार आहे. या चपला लवकरच एक्‍पोर्ट करणार आहे.’’

मोटार इंजिनच्या वायरिंगचेही काम 
मिडास महिंद्रा कंपनीकडून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील ३५ कैद्यांना बोलेरो मोटारीच्या इंजिनच्या वायरिंगचे काम मिळाले आहे. अशा विविध कामांत कैदी मग्न असल्यामुळे कारागृहातील कारखान्यात फेरफटका मारल्यास एखाद्या कंपनीत आल्यासारखे वाटते. अशी आधुनिक कौशल्ये आत्मसात केल्यास कैद्यांना बाहेर पडताच विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते, असे यू. टी. पवार यांनी सांगितले.