भाषा हे आपले पर्यावरण - डॉ. सदानंद मोरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

पुणे - 'भाषा आपण सहज वापरतो; पण तिचे महत्त्व कधीच जाणत नाही. भाषा हे आपले पर्यावरण आहे आणि माणसाच्या अस्तित्वाचे घर आहे. मग आपण तिला गृहीत का धरतो? भाषेविषयी आपण जागृत बनले पाहिजे. तिचे अस्तित्व धोक्‍यात आणण्यापेक्षा तिला जगवण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे,'' असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

"भाषा संस्थे'ने आयोजिलेल्या "कथायात्रा महोत्सवा'च्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), बालसाहित्यिका प्रा. डॉ. ऍलिडा ऍलिसन, प्रशासकीय अधिकारी संगीता बहादूर, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी आणि संस्थेच्या संस्थापिका स्वाती राजे उपस्थित होते. राजे यांच्या "फुगा' आणि "न ऐकलेली गोष्ट' या पुस्तकांचे प्रकाशन या वेळी झाले. अस्मिता ठाकूर आणि सहकाऱ्यांनी "सरितकथा' या कथक बॅलेने महोत्सवाची सुरवात झाली. त्यांनी "नदी' या संकल्पनेवर हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली; तर शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांच्या सुमधुर गायनाला मनोज पंड्या यांच्या गिटारची साथ मिळाली. गायन आणि गिटारची ही अनोखी जुगलबंदी "मल्हार धून' फ्यूजनमधून ऐकता आली.

डॉ. मोरे म्हणाले, 'भाषेच्या अस्तित्वासाठी लढण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी भाषा संवर्धन क्षेत्रात आतापासूनच काम होणे गरजेचे आहे. यासाठी लहानग्यांना कथेच्या विश्‍वाशी जोडले पाहिजे. त्यातून येणारी पिढी भाषेशी सहज जोडली जाईल.''

गोखले यांनी मनोगत व्यक्त केले. उज्ज्वला बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
"पाणी' या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव बालगंधर्व रंगमंदिरात रविवारपर्यंत (ता. 18) रंगणार आहे.

छायाचित्र प्रदर्शन
"भाषा संस्था' आणि "फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे'तर्फे छायाचित्र प्रदर्शन आयोजिले आहे. मुंबईतील "जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'चे प्रमुख डॉ. संतोष क्षीरसागर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. "जल' ही या छायाचित्र प्रदर्शनाची संकल्पना असून, त्यात अमरावतीच्या रणजित जमोदे आणि पुण्याच्या दीप्ती अलोने यांनी पारितोषिक मिळवले. प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत पाहता येईल.