वैविध्यपूर्ण डायऱ्यांचा खजिना खुला 

नवीन वर्षासाठी आलेल्या डायरी पाहताना नागरिक.
नवीन वर्षासाठी आलेल्या डायरी पाहताना नागरिक.

पुणे - यशाची गुरुकिल्ली सांगणारी "थीम' डायरी, गृहिणींच्या कामाची नोंद ठेवणारी "वुमेन्स डायरी', महिन्याच्या कामाचा आढावा नोंदविता येणारी "मंथली प्लॅनर डायरी' अन्‌ भेट देता येणारी "गिफ्ट सेट डायरी' अशा वैविध्यपूर्ण डायऱ्यांचा (रोजनिशी) खजिना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, असे असले तरी मोबाईलमध्ये असलेल्या "ई-डायरी', "ई-नोट' आणि "डिजिटल कॅलेंडर'कडे (दिनदर्शिका) तरुणांचा कल वाढला आहे. 

दैनंदिन व्यवहार मोबाईलच्या ई-डायरीमध्ये नोंदविण्यावर तरुणाई भर देत आहे. त्यात नोटाबंदीमुळे डायरी आणि कॅलेंडरचा खप 40 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे वितरक सांगतात. डायऱ्या आणि कॅलेंडरच्या जोडीला गॅझेट्‌सचे नवनवीन पर्यायही बाजारात आले असून, "फोर जी' मोबाईल आणि टॅबला सर्वाधिक मागणी आहे. 

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठांमध्ये नवीन डायऱ्या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी डायऱ्यांची मागणी होत आहे. नवीन प्रकारचे इलेक्‍ट्रॉनिक घड्याळ, थीम, प्लॅनर्स आणि ऑर्गनायझर्सच्या डायऱ्यांना मागणी आहे. 

यंदा बाजारात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये कॅलेंडर आणि डायऱ्या उपलब्ध आहेत. त्यात निसर्गचित्रांपासून ते ग्लॅमरस चित्रांपर्यंतच्या डायऱ्यांचा समावेश आहे. अभियंते, व्यवस्थापक, डॉक्‍टर, व्यावसायिक, गृहिणी, युवती अशा घटकांसाठी डायऱ्या उपलब्ध आहेत. यंदा "थीम डायरी'ला सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय मंथली पॉकेट प्लॅनर, ऑर्गनायझर, टेबल डायरी, कॉर्पोरेट डायरी, कर्मशियल डायरी, इंजिनिअरिंग डायरी, एक्‍झिक्‍युटिव्ह डायरी यासह टेबल कॅलेंडर आणि वॉल कॅलेंडरचे वेगवेगळे प्रकार बाजारात दिसून येतील. इंजिनिअरिंगपासून ते कृषी क्षेत्रापर्यंत सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डायऱ्या उपलब्ध आहेत. लेदर डायऱ्यांमधील नवीन प्रकारांसह पेन, कॅलक्‍युलेटर आणि नोंदवही असलेल्या "डिजिटल डायरी'लाही मागणी आहे. प्लॅनर्स आणि ऑर्गनायझर्सलाही कॉर्पोरेट जगताकडून पसंती आहे. तसेच फुले, वनराई, निसर्ग, व्यक्तिचित्रे आणि धार्मिक डायऱ्यांनी बाजारपेठ सजली आहे. पॉकेट डायरीला तरुणांकडून पसंती मिळत आहे. 

याबाबत व्यावसायिक किशोर टिपणीस म्हणाले, ""टेबलावर ठेवता येणारे, भिंतीवर अडकवता येणारे आणि कार्यालयीन वापरासाठी असलेल्या छोट्या कॅलेंडरला मागणी आहे. कॅलेंडरची किंमत 20 रुपयांपासून सुरू होते, तर डायऱ्यांची किंमत 50 ते 500 रुपयांपर्यंत आहे. यंदा नोटाबंदीचा परिणाम नवीन वर्षाच्या खरेदीवरही जाणवत आहे. डायऱ्या आणि कॅलेंडरचा खप 40 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे.'' 

सागर गायकवाड म्हणाले, ""ब्रॅण्डेड कंपन्यांच्या डायऱ्यांना मागणी आहे. कॉर्पोरेट कंपन्यांकडून भेट देण्यासाठी कॉर्पोरेट डायऱ्यांची ऑर्डर येत आहे. बटण डायरी, लॉक डायरी, नॅचरल पेपरमधील डायऱ्यांनाही मागणी आहे. कंपनी, छोटी कार्यालये, विविध संस्थांमध्ये छोट्या रोजनिशी आणि दिनदर्शिका लोकांना भेट देण्यासाठी पसंती दिली जात आहे. निसर्गचित्रे, हिरवाई, ऐतिहासिक स्थळे, कलात्मक चित्रे असलेल्या डायऱ्याही उपलब्ध आहेत. मराठी डायरीमध्ये "पुणे दैनंदिनी' उपलब्ध आहे.'' 

गॅझेट्‌सला सर्वाधिक मागणी 
डायरी आणि कॅलेंडरशिवाय गॅझेट्‌समध्येही नवीन प्रकार पाहायला मिळतील. ब्लूट्यूथ हेडफोन, वॅच्युअल रिऍलिटी गॅझेट्‌स, स्मार्ट वॉचेस, पोर्टेबल चार्जर, यूएसबी अशा विविध इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट्‌ससह फोर जी मोबाईल आणि टॅबलेट पाहता येतील. कंपन्यांनी लॅपटॉपमध्ये नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. त्यामुळेच यंदा नवीन वर्षासाठी गॅझेट्‌सला सर्वाधिक मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com