मनातला पाऊस (पहाटपावलं)

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 18 मे 2017

लोभाची मुसळधार सुरू झाली, की ती माणसाला कुठल्याही थराला घेऊन जाते! परस्परांवर कुरघोडी करण्याचे दाट मळभ मनात दाटून आले, की कोसळणाऱ्या धुवाधार कृष्णकृत्यांतून किती तरी आयुष्यांची धूळधाण होते!

"मोसमी पावसानं अंदमान-निकोबार बेटं व्यापली' या बातमीचे शब्दही जणू ओले थेंब होऊन मनाच्या शिवारात उतरू लागले आहेत. पाऊसचिन्हांची कृष्णरंगी पावलं आकाशात उमटू लागली आहेत. वाऱ्याच्या झोक्‍यांनी दुथडी प्रवाहाच्या ओढीची गती पकडली आहे. झाडांच्या पाना-फांद्यांतून नृत्यमुद्रांचे विविधाकार दिसू लागले आहेत. आर्त हाकांचे मंत्र पावश्‍यांनी उच्चारावेत; आणि त्यांचं गारूड व्हावं, तशी सारी रानं आपले सुभग बाहू उंचावून जणू पावसाच्या आगमनाची स्तोत्रमंडलं गाऊ लागली आहेत. मातीच्या बारीक कणांचे ढीग मुठींतून जमिनीवर ठेवून द्यावेत, तशी नक्षी ठिकठिकाणी दिसू लागली आहे. मुंग्यांच्या ओळी त्याभोवती फिरू लागल्या आहेत. हळद-कुंकू वाहून या पाऊसपावलांचं स्वागत होत आहे. "नभ उतरून आल्या'च्या कहाण्या गावागावांतून वाहू लागल्या आहेत. मजलदरमजल करीत पावसानं एकेक प्रदेश भिजवून टाकले आहेत. उन्हाळ्यात दुपारभर वाऱ्याबरोबर भिरभिरणारं पानगळीचं अस्तित्व जमिनीवरील ओलीनं घट्ट पकडून ठेवलं आहे. दाट झाडीचे पसरलेले विस्तीर्ण तळ त्या नक्षीनं खुलले आहेत. रांगोळीवर शुभसूचक कुंकुमतिलक असावेत, तशी रंगीबेरंगी फुलं आपापल्या जागा पकडून बसली आहेत. एकूण काय, कोकीळस्वरांचा पाठलाग करीत पावसाचं आगमन होतं आहे. पाहता पाहता सृष्टीचं रूप बदलून गेलं आहे.
अधीर झालेल्या पावसानं काही भागांत मोसमाआधीच उडी मारली आहे. धसमुसळेपणानं कुठं कुठं नुकसान केलं आहे. पावसाला अशा आवेगाचंच पिसं जडलेलं असतं की काय, कोणास ठाऊक! कधी तो सुतासारखा सरळ असतो; तर कधी होत्याचं नव्हतं करण्याइतपत बेबंद होतो. पावसानं शेतं फुलतात; आणि त्याच्या अतिरेकानं ती उद्‌ध्वस्तही होतात. पावसाचा हा अवखळपणा आधी ओळखता येत नाही. त्याला आवरही घालता येत नाही. अनेक निकषांचा अभ्यास करून संशोधक पावसाच्या लहरी स्वभावाचा अंदाज करीत आहेत. त्याचं काही सूत्र यथावकाश त्यांच्या हाती येईलही; पण आपल्या मनात कोसळणाऱ्या भावनांच्या अवकाळी पावसाचं काय? त्याला शिस्त लावणं आपल्याला अशक्‍य आहे?

मनात रागाचं वादळ फिरू लागलं, की ते केवढा मोठा विध्वंस करतं! लोभाची मुसळधार सुरू झाली, की ती माणसाला कुठल्याही थराला घेऊन जाते! परस्परांवर कुरघोडी करण्याचे दाट मळभ मनात दाटून आले, की कोसळणाऱ्या धुवाधार कृष्णकृत्यांतून किती तरी आयुष्यांची धूळधाण होते! फसवणूक करण्याच्या इराद्यांची चक्रीवादळं कित्येकांच्या आकांक्षांचा अंधार करून जातात. माणूस म्हणून असलेल्या या विकारांच्या आडदांड पावसाला आपण कधीच काबूत ठेवू शकणार नाही? मनातल्या पावसाची ही रौद्र रूपं वेळीच ओळखायला हवीत; आणि प्रयत्नपूर्वक ती सावरायलाही हवीत. उष्मा वाढला, की त्या प्रमाणात पाऊसमानही वाढते. तापमानातील चढ-उतार हे निसर्गचक्र आहे; पण आपण तर आपल्या मनाचा पारा योग्य पातळीवर ठेवू शकतो. मनःशांतीचे उपाय त्यासाठीच आहेत. आपापले निकष निश्‍चित करून मनातल्या पावसाचा ठोकताळा आपण करायला हवा.
- मग काय म्हणतो आहे तुमचा अंदाज?
...........................................................................................................................................................