वेळ "कॅसिनी'ला निरोप देण्याची

डॉ. प्रकाश तुपे
गुरुवार, 11 मे 2017

शनी व त्याच्या चंद्रांच्या अंतरंगाविषयी माहिती मिळविण्यासाठी हाती घेतलेली मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. गेली तेरा वर्षे शनीभोवती फिरताना "कॅसिनी' यानाने अनेक शोधांचा खजिना खुला केला आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून एक अंतराळयान खगोलशास्त्रात नवनवीन शोध लावत सतत चर्चेत आहे. "कॅसिनी' या यानाने शनी व त्याच्या चंद्रांच्या अंतरंगाविषयी मोलाची माहिती मिळविली आहे. आता या यानाचे आयुष्य संपत आल्याने त्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. हे यान शनीभोवती फिरत ठेवल्यास कालांतराने ते शनीच्या चंद्रावर कोसळण्याची शक्‍यता आहे. शनीच्या दोन चंद्रांवर जीवसृष्टीस पोषक वातावरण असल्याने, चुकूनमाकून हे यान त्या चंद्रांवर कोसळले, तर यानावरील पृथ्वीवरचे जंतू तेथे पडून तेथील वातावरण प्रदूषित होऊ शकेल. त्यामुळे शास्त्रज्ञांनी हे यान शनीच्या वातावरणात कोसळून नष्ट करण्याचा पर्याय निवडला आहे. शास्त्रज्ञांनी गेल्याच आठवड्यात यानास "मृत्यूच्या कक्षे'त ढकलले. आता "कॅसिनी' यान शनी व त्याच्या कड्याच्या मधल्या भागातून प्रवास करीत शनीभोवती फिरत आहे. एकूण 22 फेऱ्यानंतर "कॅसिनी' शनीच्या वातावरणाच्या वरच्या भागावर कोसळून नष्ट होईल.

कड्यांनी वेढलेल्या शनी ग्रहाविषयी सर्वसामान्यांप्रमाणेच शास्त्रज्ञांनाही आकर्षण वाटते. पृथ्वीवरच्या दुर्बिणीच्या निरीक्षणातून व "व्हायजेर' यानांनी शनीच्या जवळून जाताना घेतलेल्या धावत्या भेटीतून शनीविषयी काही माहिती शास्त्रज्ञांनी मिळवली होती. मात्र प्रत्यक्षात शनी व त्याच्या चंद्रांजवळ जाऊन दीर्घकाळ त्याचे निरीक्षण करण्यासाठी "कॅसिनी हायगेन' मोहिमेचा जन्म झाला. अमेरिकेची "नासा' ही अवकाश संशोधन संस्था, युरोपियन स्पेस एजन्सी व सुमारे 19 देशांनी या मोहिमेला सहकार्य दिले असून, 26 देशांचे शास्त्रज्ञ त्यात योगदान देत आहेत.
"कॅसिनी' यान 1.8 अब्ज डॉलर किंमतीचे असून, ते एखाद्या मिनी बसएवढे व 5800 किलो वजनाचे आहे. या यानावर 350 किलोची शोधकुपी बसविलेली असून, ती शनीच्या "टायटन' नावाच्या चंद्रावर उतरविली जाणार होती. "कॅसिनी' यान 15 ऑक्‍टोबर 1997 रोजी अमेरिकेतील केप कॅनव्हेरालमधून प्रक्षेपित केले गेले. "कॅसिनी'ला शनीपर्यंत पोचण्यास प्रचंड इंधन लागणार होते. मात्र कमी इंधनात हा प्रवास पूर्ण करण्यासाठी यान सरळ शनीकडे न पाठवता ते दोन वेळा शुक्र व एकदा पृथ्वीजवळ नेऊन अखेरीस गुरुजवळून गेले. या सर्व ग्रहगोलांच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत यानाने त्याचा वेग वाढवला. अखेरीस 3.5 अब्ज किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून "कॅसिनी' एक जुलै 2004 रोजी शनीच्या परिसरात पोचले. आता पुढील चार वर्षे यान शनीभोवती 76 वेळा व शनीच्या "टायटन' चंद्राभोवती 45 वेळा फिरून त्याची सखोल माहिती गोळा करणार होते.

"कॅसिनी हायगेन' मोहिमेची अतिशय महत्त्वाची कामगिरी म्हणजे "टायटन'वर शोधकुपी उतरविणे. या चंद्राभोवती वातावरण असल्याचा शोध पूर्वीच लावला गेला असल्याने या वातावरणातील विविध घटक, त्यांचे प्रमाण व "टायटन'च्या पृष्ठभागावरची स्थिती जाणून घेण्यासाठी "हायगेन' कुपी "टायटन'कडे 25 डिसेंबर 2004 रोजी पाठविली गेली. या कुपीने 14 जानेवारी 2005 रोजी "टायटन'च्या वातावरणात प्रवेश केला. "टायटन'वर उणे 17 अंश सेल्सिअस तापमान असून इथेन, मिथेनची तळी व गोठलेले दगडधोंडे यानाला दिसले. पृथ्वीप्रमाणेच "टायटन'वर भूगर्भीय व वातावरणातील विविध प्रक्रिया चालू असल्याचे निरीक्षण यानाने केले.

कॅसिनी मोहिमेला 2008 मध्ये पहिली मुदतवाढ मिळाली. पुढील अडीच वर्षे यान "टायटन' व "इनसीलाड्‌स' नावाच्या चंद्राची निरीक्षणे घेणार होते. "इनसीलाड्‌स' या छोट्या व बर्फाळ चंद्राच्या पोटात समुद्र असल्याचे निरीक्षण "कॅसिनी'ने नोंदविले. या चंद्राच्या पृष्ठभागावरून पाण्याचे शंभरावर फवारे उडताना "कॅसिनी'ने पाहिले. या फवाऱ्यात हायड्रोजन व सेंद्रिय पदार्थांचे कण असल्याचे दिसल्याने हा चंद्र जीवसृष्टीस पोषक असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते. "कॅसिनी'ला एकंदर तीनदा जीवनदान मिळाले व त्यामुळे जवळजवळ 13 वर्षे शनीचे व त्याच्या चंद्राचे सखोल निरीक्षण यानाला करता आले. या काळात शनीभोवतालचे नवीन चंद्र यानाने शोधले. तसेच शनीचे गुरुत्वाकर्षण चुंबकत्व अभ्यासून त्याचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नियोजित कामे पूर्ण झाल्याने व इंधन संपल्याने "कॅसिनी' मोहिमेचा अखेरचा टप्पा 23 एप्रिल रोजी सुरू झाला. यानाने "टायटन' चंद्राभोवतालची अखेरची फेरी मारून आपला वेग वाढवून दिशा बदलली. आता ते सुसाट वेगाने शनी व त्याच्या कड्यांच्या मधल्या भागाकडे झेपावले. हा भाग अवघा दोन हजार किलोमीटर रुंदीचा असून, "कॅसिनी' यान भारतीय वेळेप्रमाणे दुपारी 2.30 वाजता या भागात शिरले. शनी व कड्यांच्या मधली जागा पूर्णपणे मोकळी आढळल्याने शास्त्रज्ञ आश्‍चर्यचकीत झाले. आता साधारणपणे दर 8-15 दिवसांत एकदा यान शनी व त्याच्या कड्यांच्या मधल्या भागातून प्रवास करताना शनीकडे सरकत राहील. त्याच्या 22 फेऱ्यानंतर म्हणजे 15 सप्टेंबर रोजी "कॅसिनी' शनीवर कोसळून नष्ट होईल. या काळात शनीची कडी नक्की कशाची बनलेली आहेत, ती कशी तयार झाली व त्यांचे वय किती आहे याचा छडा लावला जाईल. याच निरीक्षणातून पुढे शनीच्या जन्माचे रहस्य सोडविण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करतील. एकंदरीत गेली 13 वर्षे शनीभोवती फिरताना "कॅसिनी' यानाने निरनिराळ्या शोधांचा खजिनाच खुला करून दिला आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या अखेरच्या घटकेच्या वेळीही शनीच्या कड्यांच्या अनुत्तरित प्रश्‍नावरही "कॅसिनी' प्रकाश टाकेल यात शंका नाही.

Web Title: article regarding cassini