'गंमत गाणी' संपली... (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

ही संस्था बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तो योग्य की अयोग्य याबाबतची चर्चा आता प्रदीर्घ काळ सुरू राहणार असली, तरीही त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्‍न 'बालचित्रवाणी'कडील भल्यामोठ्या सांस्कृतिक संचिताचे काय होणार, हा आहे.

'मुलामुलांची मजेमजेची गंमत गाणी; आम्ही पाखरे आनंदाने गातो गंमत गाणी!' असे मजेचे शब्द सकाळी 11 च्या सुमारास कानावर पडले की 1980च्या दशकांत मुलेच नव्हे, तर घरी असलेले पालकही दूरचित्रवाणी संचापुढे येऊन बसत. तो काळ एकच चॅनेलचा टीव्ही घरात असण्याचा होता आणि त्या एकमेव चॅनेलवरून हे गाणे घेऊन 'बालचित्रवाणी' घराघरांत प्रवेश करत असे. त्याला आता नेमके सांगायचे तर 33 वर्षे लोटली.

दरम्यानच्या काळात तंत्रज्ञानाने उत्तुंग झेप घेतली आणि टीव्हीच्या शेकडो वाहिन्या अंगावर चाल करून आल्या. त्यामुळे जगच भारताच्या अंगणात येऊन ठेपले आणि मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच अवांतर सामान्यज्ञानाचे मनोरंजक पद्धतीने धडे देणारी 'बालचित्रवाणी' या चॅनेल्सच्या धबडग्यात कधी हरवून गेली, ते कळलेही नाही. त्यामुळेच ही संस्था बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तो योग्य की अयोग्य याबाबतची चर्चा आता प्रदीर्घ काळ सुरू राहणार असली, तरीही त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्‍न 'बालचित्रवाणी'कडील भल्यामोठ्या सांस्कृतिक संचिताचे काय होणार, हा आहे.

'बालचित्रवाणी' भरात असतानाचे तेथील साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरण हेवा करण्यासारखे होते. शांताबाई शेळक्‍यांपासून मंगेश पाडगावकरांपर्यंत आणि सरोजिनी बाबर यांच्यापासून तेव्हा नाट्य-चित्रपट क्षेत्रात काही वेगळे करू पाहणारे अतुल पेठे यांच्यासारख्यांचा तेथे राबता असे. या साऱ्या मान्यवरांच्या 'बालचित्रवाणी'वरील उपस्थितीमुळे केवळ मुले-मुलीच, नाही तर त्यांच्या पालकांनाही अतीव आनंद दिला आहे. 'बालचित्रवाणी'वरील कार्यक्रमांद्वारे मुलामुलींना काही बोधप्रद शिक्षण दिले जात असे; मात्र त्यासाठी 'खडू-फळ्या'ची घसीपिटी पद्धत बिलकूलच अवलंबिली जात नसे. खेळकर वातावरणात गोष्टी, गंमतगाणी, प्रश्‍नमंजूषा अशा विविध मार्गाने एकीकडे मनोरंजन करणारा आणि मनोरंजनातून ज्ञान-विज्ञानाचे धडे देणारी, अशी ही 'बालचित्रवाणी' होती. 'बालचित्रवाणी'वर कायमचा पडदा टाकताना, शिक्षणासाठी आवश्‍यक तंत्रज्ञान आता सहज उपलब्ध आहे, असे कारण सरकारने दिले आहे. मात्र, 'बालचित्रवाणी' ही केवळ तंत्रज्ञानाचे धडे देणारी संस्था नव्हती, तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचे एक संचित होते. त्यामुळेच हा ठेवा पुनःश्‍च एकवार सरकारला दूरदर्शनच्या माध्यमातून नव्या पिढीला उपलब्ध करून देता येईल. या संस्थेकडे या ठेव्याबरोबरच दोन स्टुडिओ, संगणक यंत्रणा, उच्च दर्जाचे कॅमेरे आदी अनेक गोष्टी आहेत. त्यांचा सुयोग्य वापर करून घेतला, तरच सरकारचा हा निर्णय रास्त ठरेल आणि नव्या पिढीलाही 'गंमत गाण्यां'ची मौज अनुभवता येईल.