काही (न सुटलेली) कोडी! (ढिंगटांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सांप्रतकाळी महाराष्ट्रदेशी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, फारा दिवसांनी लाटाबिटांची भानगड नसून नुसते वाऱ्यांवर भागत्ये आहे. तरीही मतदारराजा मात्र कावून गेला आहे. नेमेचि येणाऱ्या निवडणुकांमुळे मतदारांच्या दैनंदिन नित्यक्रमात अडथळे येत आहेत. एका उमेदवारास हुकवून पुढे सटकले, तर कोपऱ्यावर हात जोडून दुसरा उभा असतो. त्याला नमस्कार करून चार पावले चालावे, तर सदऱ्याची बाही ओढून आणखी एक उमेदवार उभाच्या उभा!! असे किती दिवस चालणार?

सांप्रतकाळी महाराष्ट्रदेशी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, फारा दिवसांनी लाटाबिटांची भानगड नसून नुसते वाऱ्यांवर भागत्ये आहे. तरीही मतदारराजा मात्र कावून गेला आहे. नेमेचि येणाऱ्या निवडणुकांमुळे मतदारांच्या दैनंदिन नित्यक्रमात अडथळे येत आहेत. एका उमेदवारास हुकवून पुढे सटकले, तर कोपऱ्यावर हात जोडून दुसरा उभा असतो. त्याला नमस्कार करून चार पावले चालावे, तर सदऱ्याची बाही ओढून आणखी एक उमेदवार उभाच्या उभा!! असे किती दिवस चालणार?
परवाची गोष्ट. दाराची घंटी वाजली. दुपारच्या टायमाला कोण उलथले? असा जाहीर सवाल करत आम्ही चडफडत वामकुक्षीतून उठलो. आता रविवारची आमची वामकुक्षी अंमळ लांबत्ये, ही गोष्ट खरी आहे.

""आहात का घरी? हहह!,'' उमेदवार "अ' दारात. आता घरी नसतो तर ह्यास दार कोणी उघडले असते? काही तरी विचारायचे उगाच!! जाऊ दे!!
""या, या!'' आम्ही तसे सौजन्यशील आहो.
""साहेब, आपल्याला मत द्या बरं का! हहह!!,'' उमेदवार "अ' हस्तिदंती करतो.
""हो हो, म्हंजे काय... व्वा!! तुम्हाला नाही तर कोणाला? हॅहॅ!!'' आम्ही.
""फक्‍त मलाच नाही, ह्या तिघांच्याही नावापुढचं बटण दाबा! हहह!!'' शेजारी टपून बसलेल्या अन्य तिघांकडे बोट दाखवून "अ' म्हणाले. "ब', "क' आणि "ड' उमेदवारांनी लागलीच हात जोडून "हीहीही' केले. एकाने झपाट्याने आमच्या गळ्यात उपरणे टाकले. एकाने टोपी घातली. "वैणी हायेत का घरात?'' एकीने चवकशी केली. एकाने चपळाईने हातात एक चोपडे कोंबले. "एकच निर्धार, फुल्या फुल्या पक्षाचे चार' असे घोषवाक्‍य. चार जणांचे फक्‍कड फोटो. ह्या चौघांना मत दिल्याशिवाय आख्ख्या प्रभागाला मोक्ष नाही, हे आम्हाला बघताक्षणी कळून चुकले.
""आमचं मत तुम्हालाच हो. त्यात काय सांगायचंय? हॅहॅहॅ!!'' आम्ही दिलासा दिला. चौघांबरोबर आलेल्या पाचव्या माणसाने आमच्याकडे बघत हातातल्या डायरीत काहीतरी नोंद केली.
...एक माणूस आला तर आम्ही चहा विचारतो. (किमान विचारतो तरी!) चौघांना कसा विचारणार? (आख्ख्या पाव लिटर दुधात दिवसभरात होऊन होऊन किती चहा होणार?) असो. हे असे टोळक्‍या-टोळक्‍याने आले तर कसे होणार? पुढील खिंड कशी लढवावी, ह्याचा डावपेच लढवतानाच चौघांनीही पुन्हा एकदा नमस्कार ठोकला.
""आणखी चार बिल्डिंगी करायच्या आहेत. येतो! हहह!!'' उमेदवार "अ' नक्‍की निवडून येणार, ह्याची आम्हाला खात्री पटली.

निवडणुकांच्या निमित्ताने आम्हाला मतदार म्हणून काही प्रश्‍न पडले असून, त्याची उत्तरे मात्र अद्यापि मिळालेली नाहीत. ते प्रश्‍न असे :
1. पूर्वी एक पार्टीमागे एक उमेदवार निवडण्याची सोय होती. पण तोही "कां निवडून दिला?' असे नंतर वाटत असे. एक झेपतां झेपत नसताना आता चार-चार उमेदवार कां निवडून द्यायचे?
2. प्रभागाची चिंता आम्हा चौघांनाच अधिक आहे असे प्रत्येक चौकडी कां समजत्ये?
3. एकदम चार जण खांद्यावर उपरणे घालून दारात उभे राहिले तर सामान्य माणसाच्या पोटात गोळा येणार नाही का? आमच्या एका शेजाऱ्याने दार उघडल्यावर कडबा, बांबू आणि मडक्‍याची चौकशी केल्याची चाळीत चर्चा आहे. असो.
4. मानेभोवतीचे उपरणे अचानक डोकीला गुंडाळून हे चौघे "उचला रे' असे तर म्हणणार नाहीत ना?
5. चार जणांच्या टोळक्‍याला "आम्ही तुम्हाला मत देणार नाही' असे सांगण्याची हिंमत कुठल्या मतदारात असते?
6. एकाच्या जागी चार-चार जण निवडून द्यायचे, ही पैशाची बचत मानायची की उधळपट्टी?
7. पुढली सर्व वर्षे ह्या चाऱ्ही उमेदवारांपैकी कोणीही तोंड दाखवणार नाही, हे माहीत असूनसुद्धा त्यांना मते कां द्यावीत?
8. चार-चारच्या गठ्ठ्यातच मतदान करावे, असा गैरसमज पसरत चालला आहे. कुठल्याही चारांना मते देता येतील हे खरे आहे का?
...जाऊ दे. आमचे प्रश्‍न संपणार नाहीत... आणि निवडणुकाही! तेव्हा लगे रहो!!