युतीपोटी मती गेली..! 

युतीपोटी मती गेली..! 

श्रीमान नानासाहेब फडणवीस यांस, 
शतप्रतिशत नमस्कार. 

आपल्या आदेशानुसार खाली सही करणार कलगीवाले पथकप्रमुख श्रीमान शेलारमामा (आणि अन्य दोघे) ह्यांनी तुरेवाले ऊर्फ मित्रपक्षाच्या पथकाशी तारीख १६ माहे जानेवारी साल २०१७ रोजी संभाव्य युतीबाबत प्राथमिक चर्चा केली. ठरल्याप्रमाणे बोलणी निष्फळ ठरल्यामुळे यशस्वी ठरली, हे सांगावयास आनंद होतो. सदर बैठकीचा रिपोर्ट येथे देत आहो.

सदरील चर्चा सुमारे ८८ मिनिटे चालली. (त्यातील ४४ मिनिटे चहाची वाट पाहण्यात गेली.) चहा आल्यानंतर शेलारमामा ह्यांनी खाकरून बैठकीला सुरवात केली. शेलारमामा खाकरल्याबरोब्बर तुरेवाल्यांनी चेवात येऊन थेट भालेच उपसले. त्यापैकी रवींदराजी मिर्लेकर नावाच्या तुरेवाल्या शिलेदाराने धनुष्यबाण उपसून काढला. परंतु धनुष्याची दोरी ढिली पडल्याने बाण खालीच गळून पडला. बाण डाव्या बाजूला गळून पडल्याने युतीला कौल मिळाल्याचे स्पष्ट झाले. उजव्या बाजूला पडल्यास शेपरेट लढावे, असा निर्णय झाला.

शेलारमामा नुसते खाकरले तर इतके रामायण घडले. ते बोलले तर काय होईल, असा प्रश्‍न उपस्थित झाला. मग पहिले कोण बोलणार, ह्या मुद्द्यावर आधी चर्चा झाली. ह्या चर्चेत फक्‍त शेलारमामाच बोलले. कुठल्याही चर्चेत तेच पहिल्यांदा, मध्यात आणि शेवटी बोलतात!! विनोदवीर तावडेजी ह्यांनी चहा मागवण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली. सदर बैठक पक्षप्रमुख रावबाजी दानवेजी ह्यांच्या बंगल्यावर पार पडली. विनोदवीरांनी मागवलेला चहा ४४ मिनिटांनी येईल, ह्याची चोख व्यवस्था त्यांनी केली. 

अखेर स्वत: मा. नानासाहेब आणि तुरेवाल्यांचा शिरपेच जे की मा. उधोजीसाहेब हे एकत्रित भोजन घेऊन फायनल डिसिजन घेतील, ह्यावर सर्वांचे एकमत होऊन बैठक संपली. 

नानासाहेब, आम्ही केला तो टाइमपास. आपण कराल ते राजकारण! इति. आपले विनीत. शेलारमामा आणि मंडळी (कलगीवाले)
* * *

आदरणीय मावळेहृदयसम्राट श्री. रा. रा. उधोजीसाहेब यांसी लाख लाख दंडवत आणि मानाचा मुजरा. आपला बोल, म्हंजे देवावरचे फूल. खाली पडतां उपेगाचे नाही. हे ध्यानीमनी धरोन तुरेवाल्यांची पहिली नामजाद तुकडी रावबाजी दानवे ह्यांचे गढीवर सोमवारी चाल करोन गेली. गढीभोवती खासा बंदोबस्त होता. परंतु आम्हां तुरेवाल्यांचा आवेश पाहोन कलगीवाल्यांनी नांगी टाकिली, ती अखेरपर्यंत. 

युद्धाआधीचा तह ऐसे ह्या ऐतिहासिक भेटीचे वर्णन बखरकारांस करावे लागणार, ही काळ्या फत्तरावरची रेघ. बोलणी करण्यास बैठकीची व्यवस्था नेमस्त होती. गेल्या गेल्या धोरणीपणाने कलगीवाल्यांचे एक शिलेदार विनोदवीर ह्यांनी चहा मागविण्याची चाल रचिली. आम्ही घड्याळातील वेळ पाहोन ‘चहा नको’ ऐसे म्हटले. सायंकाळी चहा मागविणे म्हंजे आतिथ्यावरील खर्च टाळणे! 

वास्तविक रावबाजी दानवे त्यांचे म्होरके... परंतु ते नुसतेच मोबाइल घेवोन बैसलेले. सारी सूत्रे शेलारमामांच्या हाती!! मधोमध समोरील आसनावर खुद्द शेलारमामा बसलेले. नजरेत कपट, मुखावर हास्य!! मर्दमावळ्यांचा खराखुरा गनीम तो हाच!! त्यास पाहोन छातीचे बंद तटतटा तुटले. हात वारंवार शस्त्राकडे जात होता, परंतु स्वत:स आवर घातला. म्हटले, साहेबकामी विघ्न नको!! चहाच्या पहिल्या कपात मक्षिका पडावी, ऐसे नको!! परंतु तेवढ्यात शेलारमामा खाकरले.

...त्यासरशी आम्ही भाले काढले. रवींदराजी ह्यांनी तर तीरकमठाच सर्सावला. परंतु कलगीवाल्यांच्या आयुष्याची दोरी बळकट होती, म्हणोन धनुष्याची दोरी सैल पडली. अखेर पाऊण कलाकाने आलेला (गार) चहा पिऊन आम्ही करार केला की खुद्द तुरेवाल्यांचे प्रमुख श्रीमान उधोजीसाहेब हे स्वत:च सुरमई फ्राय, कोलंबीचे कालवण ह्यासमवेत कलगीवाल्या श्रीमंत नानासाहेबांशी फायनल बोलणी करतील. तो शब्द अखेरचा. 

साहेब, आम्ही केला तो टाइमपास, आपण कराल ते राजकारण! इति. आपले आज्ञाधारक. सरखेल अनिलाजी देसाई आणि अन्य मावळे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com