आपल्या आहारात हवंय कोलिन

डॉ. अनिल लचके (विज्ञानाचे अभ्यासक)
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोलिन या रसायनाला कोणी व्हिटॅमिन मानो अथवा न मानो; पण त्याची उपयुक्तता लक्षात घेता, आहारातून कोलिनयुक्त खाद्यपदार्थ यज्ञकर्म म्हणून तरी जरूर सेवन करायला हवेत

आहार चौरस असावा, असं आपल्याला शालेय जीवनापासून वयस्कर होईपर्यंत आवर्जून सांगितलं जातं. प्रथिनं, कर्बोदकं, मेदाम्लं, जीवनसत्त्वं, खनिजद्रव्यं, तंतुमय पदार्थ आदी जेवणात असायला पाहिजेत, हे आता आपल्याला चांगलंच माहिती झालंय. सध्या अँटिऑक्‍सिडंटसाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या काही खाद्यपदार्थांचा उल्लेख अनेक ठिकाणी होत असतो. उदाहरणार्थ- टोमॅटोमध्ये असलेलं लायकोपेन महत्त्वाचं आहे. शरीरात "फ्री-रॅडिकल' नामक अपायकारक रसायनं तयार होतात, त्यांना निष्प्रभ करण्यासाठी अँटिऑक्‍सिडंट म्हणून लायकोपेन प्रभावी आहेच. हा घटक पपई, कलिंगड, (रंगीत) ढब्बू मिरचीमध्येही असतो. गाजरातील कॅरेटोनॉइडवर्गीय रेणूंसारखा भरणा लायकोपेनमध्ये आहे. पण, त्यात गुणात्मक फरक असल्यामुळे लायकोपेन काही प्रकारच्या कर्करोगाच्या "ठिणगी'ला अवरोध तर करतंच, शिवाय अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षणही करतं. तसेच, विशिष्ट हृदयविकारही दूर ठेवतं. लायकोपेन अत्यंत आरोग्यदायी आहे आणि तरीही या घटकाला व्हिटॅमिनचा दर्जा मिळालेला नाही. असाच एक घटक सध्या जाणकारांच्या चर्चेमध्ये आहे, त्याचं नावं आहे - "कोलिन'.
कोलिन हा काही खाद्यपदार्थांमधील नवीन घटक शोधून काढलाय असं नाही.

ऍडॉल्फ स्ट्रेकर यांना बैल आणि डुक्कर यांच्या पित्ताशयातून काढलेल्या रसात एक रसायन सापडलं. ग्रीक भाषेत पित्तरसाला "कोले' म्हणतात, त्यामुळे स्ट्रेकर यांनी 1862मध्ये त्याला कोलिन असं नाव दिलं. त्याची रासायनिक संरचना लक्षात घेऊन ऑस्कर लीब्राईश यांनी तीन वर्षांतच तसाच पदार्थ प्रयोगशाळा पद्धतीने तयार केला. त्यानंतर सव्वाशे वर्षं बरंच संशोधन झालं. कोलिन हे आहारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं, हे मान्य झालं. पण, तरीही त्याला व्हिटॅमिनचा दर्जा मिळाला नाही. तथापि, अमेरिकेत "फूड अँड न्यूट्रिशन बोर्ड' आहे, त्यांनी कोलिनचं महत्त्व जाणून त्याला आहारातील एक "अत्यावश्‍यक घटक' असा दर्जा दिला. महिला आपल्या शरीरात एस्ट्रोजेन हॉर्मोनचा उपयोग करून कोलिन तयार करू शकतात. पुरुषांना मात्र कोलिन बनवता येणं कठीण असतं. जे काही बनतं, ते कमी पडतं. विशेषतः वाढीच्या वयातील तरुणांना ते जास्त मिळायला पाहिजे. याचा अर्थ सर्वांनाच आहारातून पुरेसं कोलिन मिळवणं गरजेचं आहे. पुढारलेल्या देशांतील लोकांनादेखील गरजेएवढं कोलिन मिळतंच, असं नाही.

गर्भवती महिलांना आहारातून मिळणाऱ्या कोलिनची गरज जास्त असते, कारण गर्भाच्या मेंदूची वाढ आणि विकास होत असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतरही काही वर्षं मेंदूची वाढ होत असते. यासाठी बालकांना पुरेसं कोलिन सुरवातीची काही वर्षं मिळणं आवश्‍यक आहे. स्वीडनमधील मुलांच्या शाळेत एक संशोधन करण्यात आलं होतं. ज्या मुलांच्या शरीरात कोलिन योग्य पातळीवर होतं, त्यांचा तुलनात्मक दृष्टीने अभ्यास चांगला चालला होता. त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. पण, कोलिनचं कार्य इतकं मर्यादित नाही! शरीरातील प्रत्येक पेशीच्या आवरणाची (मेम्ब्रेनची) जडणघडण उत्तम प्रकारे करण्यासाठी कोलिनचा सहभाग असतो. यामुळे पेशींचं एकमेकांशी असलेलं संतुलन योग्य पद्धतीने होतं. परिणामी मेंदूशी संबंधित आणि परस्परांशी संबंधित अनेक प्रकारच्या संदेशांची देवाणघेवाण उत्तम प्रकारे होत राहते. यकृतामधील मेदाम्लं विविध इंद्रियांकडे पोचवण्याच्या कार्यातही कोलिनचा सहभाग असतो.

होमोसिस्टीन नामक एक अपायकारक रसायन रक्तात वाढू शकतं. रक्तवाहिन्यांमधून वाहताना ते आतील पृष्ठभागावर इजा करतं आणि तेथे मेदाम्लं साचतात. यामुळे हृदयविकार बळावतो. नायसिन (बी- 3) किंवा फॉलिक आम्लसारख्या काही बी व्हिटॅमिनसह कोलिन रक्तवाहिन्यांमधील साचलेल्या मेदाम्लांचा निचरा करतं. असेटाईल कोलिन नावाचं एक रसायन. मानवासह अनेक प्राणिमात्रांमध्ये "न्यूरोट्रान्समीटर' म्हणून कार्य करतं. त्याचं कार्य म्हणजे मज्जातंतूंपासून स्नायूंपर्यंत आणि तेथून परत मज्जातंतूंपर्यंत विविध संदेशांची देवाणघेवाण करणं. हा रेणू "शिकणं' आणि "स्मृती' (लक्षात ठेवणं) या दोन महत्त्वाच्या क्रियांमध्ये भाग घेतो. असेटाईल कोलिन हा घटक शंभर वर्षांपूर्वी (1915) इंग्लंडच्या लॉवि डेल यांनी शोधून काढला न्यूरोट्रान्समीटर म्हणून हेन्री ऑटो (जर्मनी) यांनी त्याचं संशोधन केलं. जैवशास्त्रज्ञांनी शोधून काढलेला हा पहिलाच न्यूरोट्रान्समीटर असल्यामुळे या शोधाबद्दल डेल आणि ऑटो यांना 1936 मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं. कोलिनची करामत लक्षात घेतली, तर हा घटक आहारात असलाच पाहिजे, असं कोणालाही वाटेल. कोलिन हा घटक काही प्रमाणात शरीरात तयार होतो; पण तो कमी पडल्यामुळे आहारातून पोटात जायला पाहिजे. महिलांना प्रतिदिन 350 मिलिग्रॅम आणि पुरुषांना 550 मिलिग्रॅम कोलिनची गरज असते. सुदैवानं भारतीयांच्या आहारातील काही पदार्थांमध्ये कोलिन आहे. त्यामध्ये शाकाहारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचे पदार्थ म्हणजे कोबी, कॉलिफ्लॉवर, हिरवा मटार, डबल बी, ब्रॉकेली, पालक, मश्रूम, भुईमुगाच्या शेंगा, मका, दूध, दही, बदाम, काजू वगैरे आहेत. या खेरीज प्रत्येक अंड्यामध्ये 110 मिलिग्रॅम कोलिन असतं. मासे आणि कोळंबीमध्येही चांगल्या प्रमाणात कोलिन आहे. थोडक्‍यात सांगायचं झालं, तर कोलिनला कोणी व्हिटॅमिन मानो अथवा न मानो, आपण उदरभरण करताना आहारातून कोलिनयुक्त खाद्यपदार्थ यज्ञकर्म म्हणून तरी जरूर सेवन करावेत!