‘दंगली’नंतरचा कॉमेडी शो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

यादव घराण्यातील सत्तासंघर्षामुळे समाजवादी पक्षात फूट पडणार, हे आता स्पष्ट झाले आहे. घराण्यांतर्गत का असेना, सत्तेवरील पकड ढिली होत असेल तर प्रस्थापित नेता किती कासावीस होतो, हे मुलायमसिंहांच्या वर्तनावरून दिसते आहे.

यादव घराण्यातील सत्तासंघर्षामुळे समाजवादी पक्षात फूट पडणार, हे आता स्पष्ट झाले आहे. घराण्यांतर्गत का असेना, सत्तेवरील पकड ढिली होत असेल तर प्रस्थापित नेता किती कासावीस होतो, हे मुलायमसिंहांच्या वर्तनावरून दिसते आहे.

उत्तर प्रदेशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षात सुरू झालेल्या ‘दंगली’ने आता हास्यास्पद स्वरूप धारण केले आहे. पिताश्री मुलायमसिंह यादव आणि चिरंजीव अखिलेश यादव यांच्यातून गेले काही महिने विस्तवही जात नव्हता आणि त्याचीच परिणती अखेर गेल्या शनिवारी पिताश्रींनी अखिलेश आणि चुलतबंधू तसेच अखिलेश यांचे मार्गदर्शक रामगोपाल यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात झाली. मात्र, नंतरच्या २४ तासांतच मुलायमसिंह यांच्यावर तो आदेश मागे घेण्याची मानहानीकारक वेळ आली! त्यानंतर काही तासांतच अखिलेश यांनी पिताश्रींना आणखी एक धोबीपछाड देत, तुफानी गर्दीच्या मेळाव्यात मुलायमसिंह यांचे ‘नेताजी’पदही हिरावून घेतले आणि समाजवादी पक्षात फूट पडल्याचे स्पष्ट झाले. तेव्हाच आता अखेरची ‘दंगल’ ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ‘सायकल’ या पक्षाच्या चिन्हावर कब्जा करण्यासाठी होणार, असे चित्र उभे राहिले होते.

अपेक्षेप्रमाणेच मुलायमसिंह यांनी या संपूर्ण कटाचे सूत्रधार अमरसिंह यांच्यासमवेत निवडणूक आयोगाचा उंबरठाही सोमवारी ओलांडला. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा पांढऱ्या शेल्यात हात बांधून शरणागती पत्करायची वेळ त्यांच्यावर आल्याचे मंगळवारी त्यांनी चिरंजीवांबरोबर केलेल्या खलबतानंतर सामोरे आले! खरे तर पुत्राला पक्षातून बाहेर काढल्यावर झालेल्या शक्‍तिप्रदर्शनात चिरंजीवांनीच बाजी मारली, तेव्हाच मुलायमसिंह यांची ‘नेताजीगिरी’ सर्वार्थाने संपुष्टात आली होती. तरीही सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही, या वाक्‍प्रचाराची प्रचिती त्यांनी ‘सायकल’वर आपणच स्वार होणार, अशा राणा भीमदेवी थाटात घोषणा करून दिल्या होत्या.

त्यामुळे आपलेच हसू होत आहे, याची तसूभरही कल्पना या मुरब्बी नेत्याला येऊ नये, ही राजकीय प्रवासाच्या अखेरच्या पर्वात झालेली त्यांची शोकांतिकाच आहे.

राजकीय पक्षात घराणेशाही उभी केली की काय होते, याची ढीगभर उदाहरणे देशभर दिसली आहेत; पण घराणेशाहीतही पुढच्या पिढीत सत्ता संक्रमित होताना प्रस्थापित नेता कसा कासावीस होतो, हे उत्तर प्रदेशात दिसते आहे.

अखिलेश यांची प्रतिमा व विकासाच्या मार्गावरून जाणाऱ्या त्यांच्या कामगिरीच्या आधारेच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला पुन्हा आशा आहे. मात्र, मुलायमसिंह यांना पुनःश्‍च एकवार पक्ष आणि सत्तेवर पकड ठेवण्याची हाव सुटली. गेले काही महिने या पक्षात सुरू असलेल्या ‘दंगली’मागील मुख्य कारण हेच आहे. आता आझम खान यांच्या मध्यस्थीनंतर मुलायमसिंहांना वास्तवाचे भान आल्याचे पुन्हा दिसत असले तरी, अमरसिंह यांच्यासारख्या कळीच्या नारदावर ते विसंबून आहेत, तोपावेतो उद्या काय घडेल, ते सांगता येणे कठीण आहे. या ‘दंगली’मागील कळीचा मुद्दा विधानसभेचे उमेदवार कोणी निश्‍चित करावयाचे, हाच होता आणि मुलायमसिंहांचे सल्लागार व बंधू शिवपाल यादव यांनी उमेदवारांची भलीमोठी यादी जाहीर केल्यानेच संघर्षाची पहिली ठिणगी पडली होती.

त्यामुळे आता पिता-पुत्रांमध्ये पुन्हा समझोता झालाच, तर त्यात उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार हे अखिलेश यांच्याकडेच येतील, यात शंका नाही. त्याशिवाय आणखी एक लाखमोलाचा प्रश्‍न हा काँग्रेसबरोबरच्या आघाडीचा आहे. अखिलेश यांना ही आघाडी हवी आहे. केंद्रातील डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार अमेरिकेशी होऊ घातलेल्या अणुकराराच्या वेळी टांगणीवर लागले असताना, ते वाचवण्याचे काम मुलायमसिंह यांनीच आपल्या खासदारांच्या जोरावर केले होते. मात्र, आता ते या आघाडीच्या विरोधात का आहेत, हा प्रश्‍नच आहे आणि त्यामुळेच त्यामागे काही अन्य हेतू तर गुंतलेले नाहीत ना, अशी शंका घ्यायला जागा आहे.

आता इतक्‍या जोरदार ‘दंगली’नंतर समाजवादी पक्षाची ‘व्होट बॅंक’ म्हणजेच मुस्लिम आणि यादव समाज हे पक्षाबरोबर राहतील की नाही, असा प्रश्‍न आहे. मात्र, अखिलेश यांना आमदार, पदाधिकाऱ्यांचे लाभलेले समर्थन पाहता आणि मुख्य म्हणजे मुलायमसिंह यांनी केलेल्या ‘कॉमेडी शो’नंतरही या प्रश्‍नाचे उत्तर होकारार्थी राहील यासाठी पक्षाला बरेच काम करावे लागेल. भाजपने तेथे सत्तेसाठी सारे काही करायचे ठरवले असल्याचे स्पष्ट दिसते. मायावतींचा बसप पुन्हा एकदा सत्तेसाठी जोरदार प्रयत्न करतो आहे. या स्थितीत दुभंगलेल्या ‘सप’समोरचे आव्हान तर मोठे आहे, मात्र या भांडणाचा लाभ अखिलेश यांची आव्हान स्वीकारणारा नेता, अशी प्रतिमा तयार करण्यात झाला आहे. निवडणुका अधिकाधिक व्यक्तिकेंद्री होत असताना अखिलेश यांचे हे ब्रॅंडिंगच कदाचित ‘सप’ला लाभाचे ठरू शकते. लोकसभा निवडणुकीत इतरांना ‘तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार सांगा’, असे आव्हान देणाऱ्या भाजपकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नाही. अखिलेश, मायावती आणि भाजपच्या बाजूने खुद्द नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यातच आखाडा सजण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसला स्वतंत्र दखल घ्यावी, असे फारसे स्थान अजून तयार करता आलेले नाही. राजकारणात पिढीच्या संघर्षात बहुदा पुढची पिढीच बाजी मारते आणि यादवकुळात सध्या हेच घडते आहे. अर्थात, इतक्‍या ‘दंगली’नंतर आता खरोखरच पिता-पुत्र एकत्र आले तरी मुलायमसिंह यांचे हसू झाले ते झालेच!

Web Title: comedy show after riot