रक्तविरहित लढाई (अग्रलेख)

cyber attack : war without violence
cyber attack : war without violence

तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात, रक्ताचा एकही थेंब न सांडता युद्ध लढले जाऊ शकते. इंटरनेट हे युद्धमैदान आणि इंटरनेटला जोडलेली सर्व उपकरणे त्याची शस्त्रास्त्रे. एकविसाव्या शतकात महायुद्ध झालेच तर ते पहिल्यांदा सायबरयुद्धच असेल आणि ते लढले जाईल प्रत्येक घराघरांतून! 

माहिती-तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी; परंतु त्याबरोबरच विघातक, विध्वंसक वृत्तींनाही कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडविण्याची क्षमताही प्राप्त झाली. वॉन्नक्राय या रॅन्समवेअर व्हायरसने जगभर जो धुमाकूळ घातला, त्याने याचाच प्रत्यय आला. गोपनीय माहिती चोरण्यापासून ते संपूर्ण व्यवस्थेलाच खीळ घालण्यापर्यंत अनेक उपद्रवी, घातपाती कारवाया सायबर हल्ल्याच्या माध्यमातून केल्या जातात. त्यामुळे एखाद्या देशाची, संस्थेची किंवा समुदायाची हानी घडविणे प्रत्यक्ष हल्ला न करताही कसे शक्‍य आहे, याचीच आठवण शुक्रवारच्या घटनेने दिली. त्यामुळेच सायबर विश्‍वाचे नागरिक होत असतानाच या दुनियेचे नियम, अटी, जोखमीही माहिती करून घेणे आवश्‍यक झाले आहे. सुरक्षिततेचे उपायही अंगवळणी पाडून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शुक्रवारच्या हल्ल्याने नेमकी हानी कशी आणि किती झाली, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. येत्या काही दिवसांत ते कळेल. परंतु ही काही अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. 2010मध्ये इराणच्या नातान्झ येथील अणुऊर्जा प्रकल्पातल्या युरेनियम समृद्ध करणाऱ्या यंत्रसामग्रीत बिघाड होऊ लागले. त्याचा फटका इराणच्या अणू कार्यक्रमाला बसला. "स्टक्‍सनेट' या मालवेअरमुळे हे बिघाड झाल्याचे नंतर निष्पन्न झाले. या मागे अमेरिका वा इस्राईलचा हात असल्याची शंका व्यक्त केली गेली. जून 2013मध्ये अमेरिकेचा नागरिक एडवर्ड स्नोडेनने सायबर स्पेसवर पाळत ठेवून, अमेरिकेसह अनेक देशांची गोपनीय माहिती उघड केल्याने खळबळ माजली. याच वर्षी याहूची एक अब्जांहून अधिक "खाती' हॅक झाली आणि आता मे 2017 मध्ये शंभरहून अधिक देशांत "रॅन्समवेअर' या मालवेअरद्वारे 75 हजारांहून अधिक यंत्रणांवर हल्ले झाले आहेत. सर्वांत मोठा फटका रशियाला बसला आहे. अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीत रशियातील सायबर हल्लेखोरांनी हस्तक्षेप केल्याचे उदाहरण ताजेच असताना खुद्द रशियाला अशा कारवायांचा परिणाम भोगावा लागणे, हा काव्यगत न्याय म्हणायला हरकत नाही. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या "लष्करे तैयबा' आणि "जमात उद दावा'सारख्या दहशतवादी संघटनांनी 2012पासून "सायबर टेररिस्ट सेल' सुरू केला आहे. या प्रातिनिधिक घटना सायबर युद्धाचेच ताजे स्वरूप आहे. शंभरहून अधिक देशात झालेला "मालवेअर'चा हल्लाही काय होऊ शकते याचीच चुणूक दाखविणारा आहे. "रॅन्समवेअर'च्या माध्यमातून दररोज किमान चार हजार हल्ले होत असल्याची विविध संगणक कंपन्यांची आकडेवारी आहे. 

अशा परिस्थितीत सायबर विश्‍वातील नागरिकांचे, व्यवसायांचे, संस्थांचे, विभागांचे संरक्षण ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. या विश्‍वाशी संबंधित जोखमींचा विचार केला, तर सर्वांगीण सुरक्षा धोरणाची गरज स्पष्टपणे जाणवते. तांत्रिक क्षमता व तंत्रज्ञान, योग्य, सक्षम व प्रशिक्षित मनुष्यबळ याचा संगम यांची गरज उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्‍यक आहे. आपण स्मार्टफोनवर जेव्हा एखादे ऍप घेतो तेव्हा त्या फोनमधील सर्व माहिती वाचण्याची व शेअर करण्याची परवानगी ऍपच्या विकसकाला देतो. ही माहिती जर विघातक शक्तींच्या हाती लागली तर किती किती अनर्थ होऊ शकतो, याचा विचार न केलेलाच बरा. जमीन, पाणी, हवा आणि अवकाश या चार मितींमधील हल्ल्यांचाच विचार करून आतापर्यंतची युद्ध धोरणे आखली गेली. ही पारंपरिक युद्धाची संकल्पना आता सायबर हल्ल्यांमुळे पूर्णपणे बदलून गेली आहे. एखाद्या देशातील अंतर्गत व्यवस्था मोडकळीस आणणे अशा हल्ल्यांमुळे शक्‍य आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मोठी घरे, कार्यालये यांतील सर्व यंत्रणांवर नियंत्रण मिळविले, तर प्रत्यक्ष युद्धापेक्षा मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा हल्ल्यांपासून संरक्षणासाठी नवी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मोठे आव्हान आहे. एखादा हल्ला प्रत्यक्षात उतरल्यास त्याच्याबरोबर दोन हात करण्याची क्षमता असलेली बारा महिने चोवीस तास कार्यरत असलेली मध्यवर्ती यंत्रणा उभारणे हे खरे आव्हान आता भारतासह अनेक देशांसमोर आहे. सायबर विश्‍वातील गुन्हेगारी जगताचा बीमोड करण्यासाठी मोठी फौज हवी. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकालात "सायबर आर्मी' उभी करण्यासाठी मोठी तरतूद केली होती. भारतातदेखील सायबर गुन्हेगारांवर हल्लाबोल करण्यासाठी आर्थिक गुंतवणुकीबरोबर बौद्धिक गुंतवणूकही अनिवार्य आहे. 

एखादा रोग होऊ नये म्हणून लस टोचली जाते, आपले घर सुरक्षित राहावे म्हणून कड्या-कुलपे लावतो, तशीच सायबर जगतातील सुरक्षाही महत्त्वाची आहे. कुलूप लावल्यावर चोऱ्या होणारच नाहीत असे नाही; पण गुन्हेगाराला गुन्हा करणे सहज शक्‍य होणार नाही, याची तरी आपण व्यवस्था करतो. सायबर विश्‍वाचा या ना त्या कारणाने आधार घेणारे आपण सारेच सायबर सुरक्षेविषयी गाफिल असून, आपण बदललो नाही, तर हे सायबर युद्ध आपल्याला घराघरांत लढावे लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com