दिशा! (ढिंग टांग)

दिशा! (ढिंग टांग)

‘‘महाराजांचे गड-किल्ले हीच खरी स्मारकं. त्यांची डागडुजी दिली सोडून... लेकाचे समुद्रात पुतळे उभारताहेत! लानत आहे...,’’ राजे अरबी समुद्रासारखे खवळले होते. अशा खवळलेल्या समुद्रात पुतळा उभारण्याची कोणाची शामत आहे? राजियांचा रुद्रावतार परिचयाचा असल्याने उपस्थित मनसैनिकांनी ताबडतोब आपापल्या माना कॉलरीत म्यान केल्या. 

‘‘स्मारकं करताहेत स्मारकं. तिथं करणार काय?...भेळ खाणार?’’ सात्त्विक संतापानं राजियांनी बोटांचा पाचुंदा ओठांवर आपटत जळजळीत सवाल केला. फारा दिवसात बरीशी भेळ खाल्ली काही, ह्या जाणिवेने काही मनसैनिकांच्या जिभांना पाणी सुटले. 

‘‘अरे, गडकिल्ल्यांची डागडुजी करा. पडके बुरुज पुन्हा बांधा! ती खरी स्मारकं... हे काय?’’ राजियांनी हाताचा पंजा हवेत नाचवत हेटाळणी केली. काही बेसावध मनसैनिकांना ती भेळपुरीची प्लेट वाटल्याने त्यांनी नकळत हात पुढे केले.

‘‘आणि खर्च किती? साडेतीन हजार कोट रुपये? येवढे पैसे तरी आहेत का तुमच्या खिश्‍यात?’’ राजांनी तुच्छतेने सवाल केला. हे मात्र खरे होते. इथे एटीएममधून एकावेळी दोन हजार निघताना मुश्‍किल... साडेतीन हजार कोट कुठून आणणार? उग्गाच आपले काही तरी ह्या कमळवाल्यांचे...ह्या:!!
‘‘ते कमळवाले एक नंबरचे थापाडे... आणि हे आमचे मावळे गेले त्यांच्या मागे मागे! हात तुमची!!’’ राजांनी उगीचच ‘त्या’ मावळ्यांना एक तिरछी ठेवून दिली.

‘‘ते कमळवाले काहीही भूलथापा देतात आणि ह्यांना भुरळ पडते... अरे, महाराष्ट्रधर्म नावाची काही गोष्ट आहे की नाही?’’ राजांचा आवाज शंकर महादेवनपेक्षा चढू लागला होता. बराच वेळ त्यांचे हे ‘सूर निरागस हो’चे आळवणे चालूच होते. शंकर महादेवन निव्वळ ‘सूर’वर अर्धा घंटा आरामात काढू शकतो. ‘निरागस हो’ कंप्लीट होईपर्यंत मैफल आटोपत्ये. त्यातलाच प्रकार. असो.

‘‘वाघ कसला? मेंढी आहे, मेंढी... हुरळली मेंढी गेली लांडग्याच्या मागे! हु:!!’’ स्मारकवाद्यांना राजांनी असे काही फैलावर घेतले की विचारता सोय नाही. फक्‍त हे सगळे ते आपल्याला कां सांगताहेत? हे मनसैनिकांना अज्जिबात कळेना. मेंढी म्हटल्यावर काही जणांच्या डोक्‍यातील सत्तेचे विचार गेले, सत्तीचे आले!! 

‘‘कवडीचं काम करायचं नाही... निव्वळ बाता मारायच्या. ह्याला काय अर्थय?’’ राजे डाफरले. काही मनसैनिकांनी ‘चुक चुक’ असे आवाज करत रुकार भरला.

‘‘सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गडकोट हीच खरी आमची विरासत आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर नांदणारी औषधी वनस्पतींची राने ही खरी आमची संपत्ती आहे. त्याचं जतन करा म्हणावं. पुतळे काय कोणीही उभारील! ही काय कल्पकता आहे? छॅट!!’’ बोलताना राजांना थोडका खोकला आला.

‘‘आम्ही इथं नाशकात औषधी वनस्पतींचं जंगल उभं केलं... हे बघा!’’ समोरच्या हिरव्या वनराजीकडे बोट दाखवत राजे अभिमानाने म्हणाले. मनसैनिकांनी चटकन तेथे पाहिले. नुसती झाडेझुडपे दिसत होती. तेथील झाडाझाडांवर आता पुढील हंगामात च्यवनप्राशाचे डबे लटकतील. झुडपाझुडपांवर गुग्गुळांचे गुच्छ डोलतील. आसमंतात नागरमोथ्याचा सुगंध दर्वळेल, अशा स्वप्नात राजे काही काळ बुडाले.  

‘‘ह्याला म्हंटात कल्पक नेतृत्व... कळलं?’’ तुळशीची चार पाने तोंडात टाकत राजे म्हणाले, ‘‘चांगली कल्पक कामं केली की रयत खुशहाल राहाते. मुंबईत आम्ही आमची खरीखुरी कल्पकता दाखवणार आहोत! बघाच!!’’
मनसैनिकांचे कुतूहल वाढले. 

‘‘चला, कामाला लागा! घोडामैदान दूर नव्हे! फेब्रुवारीत मुंबई काबीज करायची आहे!!’’ राजियांच्या ह्या आश्‍वासक उद्‌गारांनी मनसैनिकांना उत्साहाचे भरतें आले. चला, आता पुन्हा एकवार सुलतानढवा!! मनसैनिकांना स्फुरण चढले. आता राजांनी मनावर घेतले असावे!! चलो, देर आए, दुरुस्त आहे...

सगळीकडून गलका झाला. ‘‘सांगा, सांगा, राजे, नेमके करायचे काय?’’
राजांनी आणखी थोडी तुळशीची पाने तोंडात टाकली, म्हणाले-
‘‘काही नाही! आपल्या इंजिनाची दिशा तेवढी उजवीकडून डावीकडे करा! मग बघाच चमत्कार!!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com