आमचे खगोल संशोधन! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 15 जुलै 2017

आमचे संशोधन हे बरेचसे गुप्त स्वरूपाचे असल्याने ही बाब फक्‍त आम्ही आणि "ॐ नाइटस्टार बार एण्ड रेस्टोरंट' ह्या अवकाश संशोधन केंद्राचे सर्वेसर्वा डॉ. धर्माण्णा शेट्‌टी ह्यांनाच ठाऊक आहे. डॉ. धर्माण्णा ह्यांनी सदर संशोधनासाठी आम्हाला त्यांची प्रयोगशाळा सायंकाळी 7 ते उत्तररात्रीपर्यंत उपलब्ध करून दिली, ह्याखातर आम्ही त्यांचे (अक्षरश:) ऋणात आहो!

काही थोर (पक्षी : पुण्याच्या) शास्त्रज्ञांनी अवकाशातील सुदूर दीर्घिकासमूहांचा शोध लावला असून तिचे नामकरण "सरस्वती' असे केल्याचे वृत्त वाचकांच्या वाचनात आले असेलच. सदर कामगिरीबद्‌दल आम्ही आमच्या सर्व खगोल संशोधकांचे हार्दिक अभिनंदन करतो, तसेच ज्यांच्यामुळे हा शोध लावण्यात अपरंपार मदत झाली त्या थोर ब्रह्मांडनायक श्रीश्री नमोजी ह्यांनाही शतप्रतिशत वंदन करितो. ते होते, म्हणून भारतीय वैज्ञानिकांनी मंगळाच्या राशीस यान पाठवले व शंभराहून अधिक उपग्रह एकगठ्‌ठा अवकाशात धाडण्याचा पराक्रम केला. श्रीश्री नमोजींचे पाठबळ नसते, तर ह्या खगोल वैज्ञानिकांना "सरस्वती' सोडा, गच्चीवरील कबुतरदेखील धड दिसले नसते, ह्याबद्‌दल आमच्या मनात बालंबाल खातरी आहे. असो.

भारतीय खगोलतज्ज्ञांच्या ह्या शोधामुळे अखिल ब्रह्मांडाचा ठाव घेण्यास मदत होणार असून भविष्यात त्याची चांगली फळे दिसून येतील. मुदलात वसुंधरेपासून चिक्‍कार लांब असलेल्या ठिकाणाचा सात-बारा भारताच्या नावे झाला, हे काय कमी आहे? हौसिंगचा प्रश्‍न त्यामुळे कायमचा सुटणार असून "सरस्वती' दीर्घिकासमूहात येत्या काळात "एसआरए' (पक्षी : सरस्वती रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी) योजना राबवण्याचा विचार सरकार गंभीरपणे करीत आहे, एवढे सांगितले तरी पुरे! पुन्हा असो.

सदरील दीर्घिकासमूह मीन राशीत किंवा तिच्या आसपास कुठेतरी आहे, असे कळते. मीन राशीत एवढा मोठा दीर्घिकासमूह कसा सांपडला, ह्याचा आम्हास प्रथमत: अचंबा वाटला. हल्लीच्या दिवसात मुदलात मीन (पक्षी : मासे!) दिसणे कठीण झाले आहे! (ताटात सुके मीन येतात!!) फारा दिवसात सुरमय किंवा पापलेटाचे दर्श न घडलेल्या "आयुका'च्या खगोल वैज्ञानिकांना मीन राशीकडे डोळे भरून पाहात असताना बगलेतील ह्या "सरस्वती'चा शोध लागला असणार, असा आमचा अंदाज आहे. नाहीतर हल्ली कोण मीन राशीकडे पाहात बसेल? बाजारात औषधाला मीन नाही!! पुन्हा असोच.

तथापि, आम्हांस विचाराल तर अश्‍या संशोधनात आम्ही पूर्वीपासूनच निष्णात असून सदर दीर्घिकेचा अंदाज आम्ही सुमारे वीसेक प्रकाशवर्षांपूर्वीच व्यक्‍त केला होता, हे येथे (नम्रपणे) नमूद करणे भाग आहे. ब्रह्मांडातील विविध तेजोमेघ, दीर्घिका, आकाशगंगा, तारासमूह, तसेच धूमकेतू ह्यांचा मागोवा घेण्याचा अभ्यास आम्ही प्राचीन काळापासून करीत आलो आहो. परंतु, आमचे संशोधन हे बरेचसे गुप्त स्वरूपाचे असल्याने ही बाब फक्‍त आम्ही आणि "ॐ नाइटस्टार बार एण्ड रेस्टोरंट' ह्या अवकाश संशोधन केंद्राचे सर्वेसर्वा डॉ. धर्माण्णा शेट्‌टी ह्यांनाच ठाऊक आहे. डॉ. धर्माण्णा ह्यांनी सदर संशोधनासाठी आम्हाला त्यांची प्रयोगशाळा सायंकाळी 7 ते उत्तररात्रीपर्यंत उपलब्ध करून दिली, ह्याखातर आम्ही त्यांचे (अक्षरश:) ऋणात आहो! सदर तारामंडळांना आम्ही बीएन 420, बीएन 302 अशी शास्त्रीय नावेदेखील दिली असून ती भारतीय पीनल कोडातील क्रमांकावर आधारित आहेत. पण तेही एक असोच.

सरतेशेवटी दीर्घिका कश्‍या शोधाव्यात? ह्या विषयी थोडेसे :

तसे पाहू गेल्यास दीर्घिका शोधणे ही फार कठीण गोष्ट आहे व ती अनेक वर्षांच्या तपश्‍चर्येनंतरच साध्य होते. खगोल वैज्ञानिकांचा मार्ग अवलंबला तर त्यात बिलकुल शाश्‍वती नाही. वर्षानुवर्षे दुर्बिणीला डोळा लावून आभाळात बघत बसायला इथे कोणाला टाइम आहे? आम्ही त्यासाठी नवाच मार्ग शोधला असून तो खराखुरा शॉर्टकट आहे. सायंकाळी जय्यत तयार व्हावे. आरशासमोर उभे राहावे, आणि समोरील इसमास ठणकावून विचारावे : कब है...कब है गटारी? गटारी कब है रे...हह...हह...हहहह..हाहाहाहा!!