सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

""काळ्या दगडावरली रेघ! बुलेट ट्रेनची वीटदेखील आम्ही रचू देणार नाही! समजलं?'' साहेबांनी कठोर आवाजात सांगितले. नाहीतरी बुलेट ट्रेनच्या बांधकामात जपानी लोक वीट वापरतच नाहीत, असे आम्ही सुचवणार होतो, पण जीभ वळेना

दसऱ्याचे दिशी शिलंगणाचे सोने मन:पूत लुटून आम्ही सारे कडवट शिवसैनिक संतुष्ट मनाने शिवतीर्थावरोन परतत असताना ते नाट्य घडले. त्याचे जाहाले असे की-

पाठीमागच्या (जरा खालील) बाजूस लागलेला चिखल झटकत आम्ही मैदानातून उठलो, आणि उच्छाव सोडून निघालो. तीर्थाच्या काठावरच वसले आहे

"कृष्णभुवन'...तेथे प्रत्येक्ष राजराजेश्‍वरांचा अधिवास आहे. मंदिरावरोन जाताना नकळत हात छातीशी जातो, तद्वत आमचे जाहाले. पाहातो तो काय! "कृष्णभुवन' इमारतीच्या तळमजल्यावरच, एका कांचेच्या खोलीत आम्हांस ती तेज:पुंज मूर्त दिसली.

अहाहा, काय ते दृश्‍य वर्णावे? पिवळ्यारंजन तेजस्वी प्रकाशात, ती गोजिरी मूर्त हाती काही कागद घेवोन बहुधा सुरम्य चित्रे रेखाटत होती. चेहऱ्यावर कैवल्याचे भाव होते. जणू ब्रह्मांडाच्या निर्मितीत साक्षात परब्रह्म गुंग जाहाले आहे...निव्वळ मुखदर्शन हेळामात्रे आमचे हृदय हेलावले. डोळे ओलावले आणि मन पालावलें...
नकळत आम्ही रस्त्यावरोनच वरडलो, ""साहेब, बाहेर या! साहेब, साहेब, बाहेर या!!''

साहेब थबकले! (की हबकले? इतिहासास ठावकें!!) काही काळ अचानक अदृश्‍य जाहाले. आम्ही पुन्हा वरडलो, ""साहेब, साहेब, बाहेर या!'' कालांतराने सोफ्याचें मागुती एक मुंडके दिसो लागले. पाठुपाठ एक रुबाबदार चष्मा. एक राजस हात. त्या हातात रंगाचा ब्रश. थोडकी भीड चेपल्याने किंवा आम्हां भक्‍तांचा धांवा ऐकोन साहेब खोलीत उभे राहिले. नेमक्‍या त्याच वेळेला त्यांच्या मस्तकाचे मागील बाजूचा दिवा लागल्याने त्यांना तेजोवलय प्राप्त जाहले. ते दृश्‍य पाहोन आम्हां मावळ्यांच्या डोळ्यांची धणी फिटली.

सावध पावले टांकीत साहेब कांचेचे दार ढकलोन बाहेर आले.

""कायॅय?,'' आपल्या सुप्रसिद्ध खर्जात त्यांनी विचारले.

""आम्ही कटकांतील लोक. सिलंगणाचे सोने लुटोन गावकुसांत परतत आहो! वाटेवर आपले राऊळ दिसले, दर्शनाची असोशी रोखता न ये! सबब, धावा केलां! क्षमस्व!!'' विनम्रतेने आम्ही म्हणालो.

""शिलंगण तुमचं, आम्हाला कशाला बोलावतां?'' रेल्वे इंजिनासारखा दीर्घ सुस्कारा सोडत साहेब अंमळसे नाराजीनेच म्हणाले.

""तुमचे आमचे आसे काहीही नाही, साहेब! कसेही असलां तरी आपण भावकीतलेच! दर्शनास प्रत्यवाये कायें म्हणोन? आपण खोलीबाहेर आलां, हीच कृपा!!,'' सर्वांचे वतीने आम्ही भाव व्यक्‍त केले. खाली वाकोन पुनश्‍च मुजरा केला.

""आम्हाला वाटलं की आइस्क्रीम खायला बोलावताहात! म्हणून आलो! जा आता!!'' साहेबांनी खुलासा केला. आमचेंकडे आइस्क्रीम नव्हते. आम्ही आपट्याची पाने त्यांस अदबीने दिली. "अरे, अशी झाडं ओरबाडू नका रे' अशी पर्यावरणवादी दटावणी ऐकोन घेतली.

""...मग काय म्हणाले तुमचे शिलंगणवाले नेते?'' अशी छद्मी पृच्छा त्यांनी केल्यावर आम्ही सारा वृत्तांतच घडाघडा ऐकवला.

""काय सांगू तुम्हास साहेब..."बुलेट ट्रेनचा फुकटचा नागोबा आम्हाला नको', असं नुसतं म्हणाले आमचे नेते आणि टाळ्यांचा नुसता कडकडाट हो साहेब!,'' भारावलेल्या आवाजात आम्ही सांगितले.

""हुं:...आम्ही दुपारीच हे सगळं बोललो होतो...'' साहेबांनी सांगितले. तेही खरेच होते.

""बुलेट ट्रेनबद्दल आपलाही निर्णय अंतिम समजावयाचा का?'' आम्ही खडा टाकून पाहिला.

""काळ्या दगडावरली रेघ! बुलेट ट्रेनची वीटदेखील आम्ही रचू देणार नाही! समजलं?'' साहेबांनी कठोर आवाजात सांगितले. नाहीतरी बुलेट ट्रेनच्या बांधकामात जपानी लोक वीट वापरतच नाहीत, असे आम्ही सुचवणार होतो, पण जीभ वळेना.

""येतो, साहेब! लोकल ट्रेनला गर्दी होईल! त्याआधी गेलेले बरे!!'' आम्ही त्यांची परमानकी मागितली.

""जपून जा रे बाबांनो! हल्ली गाड्यांना फार गर्दी राहाते म्हणे!! तेवढं आमच्या वीटेचं लक्षात ठेवा! निघा!!'' साहेब म्हणाले. तेवढ्यात आम्ही त्यांना दुसरा प्रश्‍न विचारला, जो कधीच विचारावयास नको होता.

कारण त्यानंतर आम्ही थेट इस्पितळाच्या खाटेवरच शुद्धीवर आलो.

आम्ही फक्‍त त्यांना येवढेच विचारले होते की ""लोकल ट्रेनचे शेवटचे तिकीट तुम्ही कुठल्या साली काढले होते, साहेब?'' असो!

Web Title: dhing tang article