किंग्डम ऑफ नंदी! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

माणसाने घर करावे. माणसाने करिअर करावे. देशबिश स्थापन करणे अंमळ शौर्याचे काम आहे. त्यासाठी युद्धेबिद्धे करावी लागतात. ते आपल्यासारख्या (मराठी) माणसाला जरा अवघड पडत्ये. देशाच्या उठाठेवीपेक्षा देशीची उठाठेव पर्वडली!! तथापि, विनम्रतेने आम्ही आज येथे जाहीर करत आहो, की पहिल्या दोन गोष्टी आम्हाला उभ्या हयातीत जमल्या नसल्या, तरी तिसरी गोष्ट मात्र आम्ही जमविली आहे. होय, आम्ही(ही) आता राजे आहो!!

मंडईत जाताना रस्त्यात सस्त्या मटाराची गाडी लागावी आणि तंगडेतोड न करता आयती खरेदी होवोन जावी, तद्वत हे घडले. सहज म्हणोन फेसबुकात डोकावलो असता आम्हांस "किंग्डम ऑफ दीक्षित' अशी भिंत दिसली. आता तुम्ही विचाराल, कोण हे दीक्षित? तर हे गृहस्थ इंदौरचे असले तरी एका देशाचे राजे आहेत. इजिप्त आणि सुदान ह्या देशांमधील भूपट्ट्यात त्यांचे विशाल सार्वभौम राज्य पसरले आहे. नुकताच त्यांचा राज्याभिषेकदेखील झाला. त्या सोहळ्यासाठी एक ड्रायवर आणि दोन वाळवंटी पाली आवर्जून उपस्थित होत्या. तेथील एका वाळूच्या ढिगाऱ्यावर त्यांनी आपल्या वैभवशाली राज्याचा ध्वज फडकवला... फेसबुकावर हे सारे पाहात असताना आमच्या अंगावर रोमांच आले. बाहु फुरफुरले. नेत्रात नवभूमीचे स्वप्न साकळले. आम्ही तांतडीने कामास लागलो. कांदे चिरण्याच्या मिषाने आम्ही सुरी हाती घेतली. कांदे चिरताना डोळियांत पाणी येत्ये. मिटल्या डोळ्यांनी आम्ही कांदे कापताना अंगठ्यावरोन सुरी फिरवली व लागलीच तो अंगठा मुखात घालोन नवभूमीच्या नवप्रतिष्ठापनेची आण घेतली...

देश स्थापन करणे तुम्हाला अवघड वाटते का? नाही, ते तितकेसे अवघड नाही. त्याची एक सोपी प्रक्रिया असते. घरबसल्या तुम्ही ती करू शकता. ही प्रक्रिया अशी : गुगल अर्थवर जावोन जगाचा नकाशा उलगडावा. ह्या पृथ्वीवर अनेक वैराण प्रांत आहेत. त्यापैकी एक निवडून आपले राज्य म्हणोन घोषित करावे. ऐपत असल्यास तेथे जाऊन झेंडेबिंडे रोवोन यावेत. बाकी सारे काम इंटरनेटद्वारे होवोन जाते.
आमच्या देशाचे नाव किंग्डम ऑफ नंदी असे आहे. तेथे एकचालकानुवर्ती (सदर शब्द आम्ही कुठेतरी वाचला होता. अर्थ ठाऊक नाही. असो.) अशी राजवट आहे. आमच्या देशात प्राप्तिकरापासून संपूर्ण मुक्‍तता आहे. कां की आमच्या देशी प्राप्तीच नसल्याने करउत्पन्नाची गरजच नाही. "किंग्डम ऑफ दीक्षित' हे वाळवंटातच वसले असल्याने तेथे पाणी नाही. आमच्या देशात मात्र अधूनमधून पाणी लागते. (लागते म्हंजे लागतेच!!) झुरळ हा आमचा राष्ट्रीय प्राणी आहे. येथे (अधूनमधून) प्राशन करण्यात येणारे पेयदेखील "देशी' ह्याच नावाचे आहे. विशेष बाब म्हणजे आमच्या राज्यात कुठल्याही देशाचे चलन चालते. ते चलन असले म्हंजे मिळवली!! आमच्या राज्यात लोकसंख्यावाढीला भरपूर वाव आहे. तूर्त आम्ही एकटेच आहो!! आमच्या आवाहनास योग्य प्रतिसाद मिळाल्यास माशाल्ला आम्ही लोकसंख्येचा स्फोट घडवू, असा आमचा दृढ संकल्प आहे.

भौगोलिकदृष्ट्याही आमची किंग्डम सुरक्षित आहे. निसर्गमाने चहूबाजूंनी उंच अडथळे असून, एकाच चिंचोळ्या खिंडीतून प्रवेश करता येतो. त्या खिंडीत उभे केलेले अजस्र अडसर बंद केले, की आमच्या देशाच्या सरहद्दी बंदिस्त होतात. सार्वभौमत्व अबाधित राहाते.

आमचे देशांत( ही) स्वच्छतेला फार्फार महत्त्व आहे. किंबहुना, तोचि आमचा प्रखर राष्ट्रधर्म आहे. कारण... आमचे स्वच्छतागृह हाच आमचा देश आहे... कभी तो पधारो हमारे देश में!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com