व्हिजन कुणाचे? (ढिंग टांग)

19dec16-dhing-tang
19dec16-dhing-tang

श्रीमान नानासाहेब यांसी,
तुम्हांस मित्र म्हणावे की शत्रू? महाराष्ट्राच्या (म्हंजे आमच्या) समोर हा येकमेव ज्वलंत सवाल आहे. शत्रू म्हणावे तर घरी येवोन कोळंबीचे भुजणे खाऊन जाता. मित्र म्हणावे तर दगलबाजी करता! ‘कमळाबाई अत्यंत बेभरवश्‍याची, सबब येथ सोयरिक नको’ ऐसे आम्हांस सगळे सांगत होते, परंतु जिव्हाळाच तो... उतार घेईल, तैसा जातो. तैसेचि घडत्ये आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव. जगदंब जगदंब.

शनिवारी नागपूर प्रांती पत्रकारड्यांशी बोलताना आपण बोलोन गेलात की ‘‘आमचे व्हिजन अन्योन्यांस पटले, तरच येकीचे राजकारण खेळू. अन्यथा आमचे मार्ग मोकळे आहेती!’’ काय हे, नानासाहेब, काय हे? हे काय बोलोन गेलात? आपले उद्‌गार ऐकोन दिल फाटोन गेला. कान किटोन गेला. मस्तक फुटोन गेले...येकंदरित मुंबईचा संग्राम आपणांस येकमेकांशी लढावा लागणार अशी चिन्हे आहेत. हे बरे समजोन असा, की आपल्या व्हिजनला कोण विचारतो? त्याची कवण किंमत? पैशास पासरी!! आपली व्हिजन आपल्याकडेच असो द्यावी. मुंबईकडे वाकड्या डोळियांनी पाहणाऱ्या व्हिजनला संपविल्याशिवाय हा उधोजी स्वस्थ बसणार नाही. पंचवीस वर्षांचे मैत्र पाहिलेत, आता ह्या उधोजीची तलवार पाहा!!

आता मुंबई पालिकेच्या रणांगणातच भेटू. हत्तीवरोन आलात तर घोड्यावरोन परत जाल! घोड्यावरोन आलात, तर पायी परत जाल!! पायीच आलात तर अनवाणी परताल आणि अनवाणी आलात तर...जाऊ दे. शिवसेना आग आहे, आग! अंगावर आलात तर जळून खाक व्हाल!!

वि. सू. : हे पत्र, पत्र नसोन नोटीस आहे, ऐसे गृहीत धरावे. बाकी श्रींची इच्छा!! जगदंब जगदंब.

आपला, उधोजी.
* * *

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, 
शतप्रतिशत प्रणाम. काल रात्रीच नागपूरहून आलो. अधिवेशन आणि प्रवास दोन्ही उत्तम झाले. नागपूरला यंदा अजिबात थंडी नव्हती. येताना (नेहमीप्रमाणे) तुमच्यासाठी संत्रा बर्फी आणली आहे. (कार्डावर घेतली!!) ‘मातोश्री’वर स्वत: येऊन देण्याचे ठरवतो आहे. बघू या कसे जमते ते! कारण मागल्या वेळी पाठवलेली संत्रा बर्फी तुम्हाला मिळालेली नाही, असे कळले. मी माणूस पाठवला होता, पण त्याने म्हणे ‘मातोश्री’च्या दरवाजात उभ्या असलेल्या एका उंच माणसाच्या हातात बर्फीचा बॉक्‍स दिलान! नार्वेकरांचा मिलिंदा असणार!! मी कपाळावर हात मारून घेतला. जाऊ दे. ह्यावेळी स्वत: येईन आणि देईन. असो.

आत्ताच तुमच्या सांडणीस्वाराने पत्र आणून दिले. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. नागपूरला ‘सुयोग’ ह्या पत्रकारांच्या तळावर गप्पा मारायला मुख्यमंत्र्याला (एकदा तरी) जावेच लागते. तसा गेलो होतो. तिथे मी इतकेच म्हणालो की, ‘‘आमचं व्हिजन आमच्या मित्राला पटलं तरच पुढची बोलणी करता येतील.’’ ह्यात काय चुकले?

व्हिजन आणि तुमचे व्हिजन ह्यात काही फरक आहे का? गेल्या वेळी मी ‘मातोश्री’वर आलो होतो, तेव्हा सुरमईच्या एकच उरलेल्या तुकडीवर आपल्या दोघांचाही डोळा नव्हता का? आठवा!! उगीच डोक्‍यात राख घालू नये. ‘आपले व्हिजन एकच आहे’ असे जाहीर करून युती करून टाकू. तेच आपल्या हिताचे आहे. बाकी सर्व क्षेम. भेटीअंती बोलूच. 

आपला, नाना.
* * *
प्रिय मित्रवर्य नानासाहेब, सप्रेम नमस्कार,
मिलिंदाला जाब विचारला. म्हटले, ‘आमची संत्रा बर्फी कुठाय?’ तर त्याने संपली अशी खूण केली! तुमच्या नव्या बॉक्‍सची वाट पाहत आहे. सध्या बाजारात मासे चांगले मिळत आहेत, पण काय उपयोग? क्‍याश नाही!! स्वत: जाळे घेऊन मासे पागायला जायची पाळी आली आहे!! येत्या शनिवारी जाईन म्हणतो. जाऊ दे.

माझ्या मनात गैरसमज नाही. तुमचे आणि माझे व्हिजन एकच आहे, हे वाचून समाधान वाटले. या, मुंबई आपलीच आहे!! 

जय महाराष्ट्र. 
आपला,
 उधोजी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com