हिसाब किताब! (ढिंग टांग!)

ढिंग टांग
ढिंग टांग

ब्यांक व्यवस्थापक,
लेना ब्यांक, लाल कोठी शाखा,
सुलभ पुलाच्या तोंडाशी (पश्‍चिम टोंक),
दुबळेवाडी मार्ग, (अर्थात) पुणे!

विषय : ब्यांक व्यवहार आर्जंटमध्ये कंप्लीट मराठीत करण्याविषयी लेटर.

जय महाराष्ट्र! महाराष्ट्राचे सुपुत्र आणि नवनिर्माणाचे प्रणेते व आमचे लाडके नेते श्रीमान चुलतराजसाहेब ह्यांनी महाराष्ट्रातील सर्व ब्यांकांनी आपापले व्यवहार कंप्लीट मराठी भाशेत करण्याचा आदेश काढला आहे. आपणाला माहीत असेलच, पण नसेल तर प्रॉब्लेम आहे, हेच सांगण्यासाठी सदर लेटर लिहीत आहे. हल्लीच्या काळी ब्यांका वाट्टेल ती नावे ठेवत असतात. आमच्या वळखीच्या एका कार्यकर्त्याने एकदा ""आयचीआयचीआय ब्यांक कुठे आहे?'' असा आड्रेस विचारला असता त्याला "गाली कायकू देता है रे *** ** *?' असे ऐकून घेत मार खाऊन परत यावे लागल्याचे कळते!! इंग्रजी आक्षरे एकापाठुपाठ लावली की ब्यांकेचे नाव आटोमॅटिक तयार होते का? एसीबीसी, एचडीबीडी ह्या शॉर्टफार्ममधल्या शिव्या आहेत की ब्यांकेची नावे? ह्यापुढे हे चालणार नाही. स्वच्छ मराठी नाव ठेवावे! तशा प्रकारचे आदेश आमच्या साहेबांनी काढले असून, आरबीआय गवर्नरलाही लेटर गेले आहे. गवर्नर एका लेटरमध्ये सरळ आला, तुमच्यासारख्या म्यानेजरसाठी आम्ही बास आहोत!
हल्ली ब्यांकांच्या सामान्य खातेदारांना ब्यांकेतून पैसे काढणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. गेल्या आठ नव्हेंबरनंतर तर ब्यांकेत जाण्याच्या कल्पनेनेच पोटात गोळा येतो. उधाहरणार्थ, एका खातेदाराला स्वत:च्या खात्यातून रुपये धा हजार काढावयाचे होते. त्याने रीतसर स्लीप भरून टोकन नंबर घेतला व तो वाट पाहू लागला. नंबर आल्यावर क्‍याशरने पिंजऱ्यातून रोखून बघितले, आणि भुवई उडवून ""क्‍या मंगता है?'' असे विचारले. त्यावर खातेदाराने "पैसे' असे उत्तर दिले.

(खातेदार काय मागणार?) पण क्‍याशरने त्याला "क्‍यूं?' असे विचारले. त्याचे उत्तर देणे कठीण होते, कां की उधारी थकली असून, रक्‍कम भरल्याशिवाय किराणा मिळणार नाही, असे दुकानदाराने सांगितल्याचे क्‍याशरला कसे खुलासेवार सांगणार? सबब खातेदार निमूटपणाने परत आला!! तो खातेदार म्हंजे दुसरे तिसरे कोणीही नसून मीच होतो व ब्यांकही तुमचीच होती! (आता तुम्हाला बघतोच!) ब्यांकेतील कर्मचाऱ्यांसाठी आमच्या काही सूचना आहेत.

त्या खालीलप्रमाणे :
1) धनादेशावर (चेक म्हणायचं नाय आता!) मराठीत सही केली असता "सहीत फरक आहे' असे सांगून धनादेश परत पाठवला तर पोकळ बांबूचे फटके मिळतील!
2) "एफडी म्याचुअर झाली की डायरेक्‍ट अकौंटमध्ये अमौंट क्रेडिट होईल' हे वाक्‍य मराठी आहे की इंग्रजी? कृपया खुलासा करावा. खुलाशावर पुढील कार्यवाही ठरेल!
3) "भुगतान' हा शब्द हिंदी असला तरी भलताच ग्रामीण वाटतो. सबब त्यावर बंदी घालावी. किंबहुना, हिंदीमधील सूचनांचे फलकही हलवावेत, हे ठीक राहील.
4) प्रत्येक मराठी खातेदारास ब्यांकेत आल्या आल्या कोकम सरबत देण्याची पद्धत सुरू करावी. पैसे भरण्यासाठी आलेल्या मराठी खासदारास सरबताचा दुसरा गिलास देण्यात यावा, तसेच मुदतठेव ठेवणाऱ्या मराठी खातेदारास बटाटेवडा नजर करावा. (टीप : मुदतठेवी ठेवणारे मराठी खातेदार फार दुर्मिळ झाले आहेत, ह्याची नोंद घ्यावी!)
5) अमराठी खातेदारांशीही मराठीतच व्यवहार करावा. (टीप : ही सगळ्यात इंपॉर्टंट टीप आहे!!)

...आमच्या साहेबांनी सर्व ब्यांक चालकांना आपल्या (मराठीतील) सहीनिशी लेटर पाठवले असून, कार्यवाहीसाठी त्यांनी आम्हा कार्यकर्त्यांना कंप्लीट अधिकार दिले आहेत. (कंप्लीट हां!) तेव्हा, आपल्या ब्यांकेच्या लाल कोठी शाखेत येत्या आठ दिवसांत सगळे व्यवहार मराठीत होणे आवश्‍यक आहे. तसे न केल्यास आपल्या शाखेच्या फ्रंट साइटला असलेले काचेचा दरवाजा टोपलीत उचलून न्यावा लागंल, आणि कानाच्या आसपास गरमगरम वाटंल, ह्याची खात्री बाळगावी. कळावे. आपला. एक (लोकल) नवनिर्माण सैनिक.
ता. क. : ब्यांकला ब्यांक न म्हणता यापुढे पेढी म्हणावे! जय महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com