मंत्रशक्‍ती : एक गूढकथा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सुखाने कालक्रमणा करीत असताना अचानक एके रात्री राजा देवेंद्रसेनाची झोप उडाली. त्याचे झाले असे की...

आटपाट नगर होते. तेथे एक देवेंद्रसेन नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत असे. त्या काळी सगळीकडेच चक्रवर्ती राजे होते. आटपाट नगरात पूर्वी सम्राट पृथ्वीराज नावाचा राजा राज्यावर होता. परंतु त्यास ऐनवेळी थरथरायटिस नावाचा रोग झाल्याने तलवार हाती धरणे अशक्‍य झाले. परिणामी, राजा देवेंद्रसेनाने त्याचे लीलया पारिपत्य करून राज्य बळकावले. राजा पृथ्वीराज सारे काही सोडून वनांत निघून कुटी बांधून राहू लागला...

सुखाने कालक्रमणा करीत असताना अचानक एके रात्री राजा देवेंद्रसेनाची झोप उडाली. त्याचे झाले असे की... पहाटेच्या सुमारास देवेंद्रसेनास स्वप्न पडले. ज्याअर्थी त्यास स्वप्न पडले, त्याअर्थी तो झोपलेला होता हे उघड आहे. स्वप्नात त्यास एक गडद रंगाची बाटली दिसली. ती बाटली स्वयेच डुगडुगत होती. देवेंद्रसेनाने बाटली फेकून देण्यासाठी उचलली असता आतून आवाज आला : "आवशीक खाव... मी येतंय! मी येतंय!!''
देवेंद्रसेन दचक दचक दचकला. बाटलीत भूत असून ते बाहेर येऊ पाहत असल्याचे पाहून तो हादरला व जागा झाला. जागे झाल्यावर देवेंद्रसेनाने आसपास पाहिले आणि तो पुन्हा हादरला. कारण स्वप्नातली बाटली खरोखरीच त्याच्या मेजावर डुगडुगत होती.

...त्याने ती बाटली उचलली आणि शेजारील गुर्जरभूमीतील अहमदानगरीतील सुप्रसिद्ध मांत्रिक बाबा अमित अली शहा ह्यांस गाठले. बाबा शहा ह्यांनी गंभीर मुद्रेने "किस्सा क्‍या है?'' असे विचारले. देवेंद्रसेनाने बाटली दाखवली. ती बाटली उचलून बाबा शहा हे त्यावरील लेबल पाहात असताना आवाज आला : "आवशीक खाव... मी येतंय! मी येतंय!!'' बाबा शहा ह्यांनी घाबरून बाटली खालीच ठेवली.
"कौन हो तुम?'' मोरपंखाचा झाडू हापटून बाबा शहा ह्यांनी त्या आवाजाच्या धन्यास विचारले.
"शिरा पडो तुज्या तोंडार...माका इच्यारतंस? माका तुज्या वांगडाक घे, मगे बग, मी कोण ह ते! समाजलां?'' बाटलीतून आवाज आला.
"ये बाटल तुमकू किधरसे मिला?'' असे बाबा शहा ह्यांनी (दाढी खाजवत) देवेंद्रसेनास विचारले.
राजा देवेंद्रसेनाने अखेर कबूल केले ते हे : सम्राट पृथ्वीराजाने राजवाडा खाली केल्यानंतर अडगळीच्या खोलीत बरेच सामान सापडले, त्यात ही बाटलीही होती. सदर अडगळ भंगारवाल्यास विकून त्याची दोन कलिंगडे आणून खाल्ली. परंतु राज्याचे महसूल प्रमुख सरदार चंद्रसेन कोल्हापूरकर ह्यांनी भंगारवाल्याकडून ही बाटली जप्त करून आणली व राजवाड्यात ठेवली. सदर बाटली ही जादूची असल्याचे सरदारगृहस्थांचे म्हणणे होते. त्यांच्या म्हणण्याला बळी पडून बाटली सरकारजमा करण्यात आली. परंतु ह्या बाटलीतून हे असले काही तरी ऐकू येत्ये. कधी कधी (बाटली उलटी धरली की) कानातील केस जळतील, अशा शिव्याही ऐकू येतात.

बाबा अमित अली शहा सोचमध्ये पडले. (खुलासा : सोच म्हणजे विचार...) काय करावे? एकदाचे बूच उघडून आतील असंतुष्ट आत्म्यास मोक्ष मिळवून द्यावा? की ही बंद बाटली पुन्हा तूर्त वनवासी झालेल्या पृथ्वीराजांस नेऊन द्यावी?
"माजी सम्राट पृथ्वीराजांनी बाटली स्वीकारण्यास नकार दिला असून, हल्ली ते कमंडलूच वापरतात!'' अशी माहिती राजा देवेंद्रसेनाने पुरविल्याने तो विषय निकालात निघाला.
बाबा अमित अली शहा ह्यांनी आयडिया केली. त्यांनी तांतडीने बाटलीचे बूच उघडले. त्यासरशी "आवशीक खाऽऽव...'अशी किंकाळी मारत बाटलीतील भूत बाहेर आले. पण बाबा शहा बंगाली विद्येतील जाणकार होते. त्यांनी लागलीच एक कमळकळी पुढे धरून अमोघ असा नमोमंत्र उच्चारला. "मी येतंय, मी येतंय!' असे ओरडत भूत कमळकळीत गडप झाले.

कमळाचा कळा राजा देवेंद्रसेनाच्या हाती देत बाबा शहा म्हणाले : "आता ह्या आत्म्याचा भुंगा झाला असून तो कमळपाशात अडकला आहे. चिंता मत करो! सिर्फ अपना मंत्र म्हणो!!''
राजा देवेंद्रसेन घरी परतला. कमळाचे फूल नमोफ्रेमीला वाहिले. आणि त्यांनी मंत्र म्हटला : "आवशीक खाव! आवशीक खाव!!''

Web Title: dhing tang by british nandy amit shah