डॉक्‍टरकी! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 23 मार्च 2017

तसे पाहू गेल्यास आम्ही अत्यंत निरुपद्रवी आणि अहिंसक वृत्तीचे आहो; पण सर्दी-पडसे झाले, की आमच्या डोळ्यात खून चढतो. हा दुर्धर आजार होता होता मेंदूचे कार्य बंद पडत्ये. नाक बंद राहातेच; पण आश्‍चर्य म्हणजे कानदेखील बंद होऊन ऐकू येईनासे होत्ये. नाक वाहाते असताना ते बंद कसे? असा एक मौलिक विचार मनात घिरट्या घालू लागतो. मन गरगरू लागत्ये. आपण एक अव्वल दर्जाचे खुळे आहो, आणि हे गुपित आता जगाला माहीत झाले आहे, अशी ठाम खात्री पटू लागत्ये. असे काही झाले, की आम्हाला कोपऱ्यावरील डॉ. शहाणे ह्यांच्याकडे जावेच लागत्ये. तसे आम्ही गेलो.

तसे पाहू गेल्यास आम्ही अत्यंत निरुपद्रवी आणि अहिंसक वृत्तीचे आहो; पण सर्दी-पडसे झाले, की आमच्या डोळ्यात खून चढतो. हा दुर्धर आजार होता होता मेंदूचे कार्य बंद पडत्ये. नाक बंद राहातेच; पण आश्‍चर्य म्हणजे कानदेखील बंद होऊन ऐकू येईनासे होत्ये. नाक वाहाते असताना ते बंद कसे? असा एक मौलिक विचार मनात घिरट्या घालू लागतो. मन गरगरू लागत्ये. आपण एक अव्वल दर्जाचे खुळे आहो, आणि हे गुपित आता जगाला माहीत झाले आहे, अशी ठाम खात्री पटू लागत्ये. असे काही झाले, की आम्हाला कोपऱ्यावरील डॉ. शहाणे ह्यांच्याकडे जावेच लागत्ये. तसे आम्ही गेलो.

डॉ. शहाणे ह्यांच्या दवाखान्यात सामसूम होती. कंपौंडर विश्‍वाची चिंता करीत फडताळाआड बसला होता. औषधे देण्याच्या (आणि पैसे घेण्याच्या) वीतभर खिडकीत आम्ही आमचे लालबुंद नाक घुसवले, आणि (खोल आवाजात) विचारले.

‘‘डॉगडर शहाडे आहेद का? नब्बर लावायचा आहे...’’ आम्ही. पडश्‍यादे आबचे दाक पुरते बद्‌द झाले होते, हे चाडाक्ष वाचकाच्च्या लक्षाद आले असेलच.

‘‘डॉक्‍टर भेटणार नाहीत! काय काम आहे?,’’ पलीकडून जोरकस आवाज आला. वीतभर खिडकीतील पंजा कळसूत्र कलाकारासारखा हलला. त्याच्या सवालात किंचितशी धमकी होती.

‘‘सर्दीचं औषध हवंय!’’ आम्ही.

‘‘कोणाला?’’ अज्ञात कंपौंडर. बाकी कंपौंडरला भर रस्त्यात ओळखू शकणाऱ्या पेशंटाला आपला शतप्रतिशत प्रणाम आहे. इतक्‍या माणसांचे नंबर लावणारा इसम इतक्‍या बिनचेहऱ्याचा असू शकतो, म्हंजे कमाल आहे.

‘‘कोणाला म्हंजे? दवाखान्यात आम्ही आलोय, म्हंजे आम्हालाच ना!!’’ आम्ही.

‘‘ओरडून बोलू नका!!’’ वीतभर खिडकीतल्या पंजाची हिंस्त्र हालचाल झाली.

‘‘सर्दीनं जीव अर्धा झालाय हो!!’’ कळवळून आम्ही.

‘‘तुमच्याबरोबर कुणी नातलग आलेत? नातलग असतील तर औषध मिळणार नाही!!’’ वीतभर खिडकीतल्या पंजातील एका बोटाने आम्हाला निक्षून बजावले. त्या बोटाच्या भयाने आम्ही आमचे लालबुंद नाक हातभर मागे घेतले.

‘‘तुमच्यासोबत कुणी नातलग आलेत?’’ वीतभर खिडकीतून दरडावून विचारण्यात आले.

‘‘आमच्या कुठल्याही नातलगाला धाड भरलेली नाही!’’ आम्ही खुलासा केला. आमच्या सुरात एक विषाद उमटला असावा.

‘‘मग ठीक आहे. तुमच्या खिश्‍यात शस्त्र वगैरे?’’ खिडकीतून पुन्हा चौकशी. आमच्याकडे शस्त्र? आहो, मोरीत उंदीर निघाला तरी आम्ही वाघ आल्यासारखे ओरडत बाहेर येतो. आमच्याकडे कुठले शस्त्र? नाही म्हणायला एक आगपेटी आहे. ती विड्या ओढायला...

‘‘आगपेटी काढून इथं ठेवा!’’ आतून आवाज. बाकी कंपौंडरलोकांचे आवाज भारदस्त असतात, हे आजवर आम्हाला ठाऊक नव्हते. 

आम्ही आगपेटी काढून ठेवली. 

‘‘पैसेही राहू द्या!’’ पुन्हा दर्डावणी. आम्ही पन्नासाची नोट ठेवली.

‘‘आणखी पन्नास!’’ तात्काळ डिमांड. आम्ही शेवटची पन्नासाची नोट ठेवली. आता आम्ही पुरते नि:शस्त्र (पक्षी : नागवलेले) होतो!

‘‘ह्या बाजूच्या धातुशोधक चौकटीतून आत या!’’ आम्ही चौकटीत शिरलो. टुंटुं पॅं असे विविध आवाज आले. खिश्‍यातील सायकलीची चावी बोंबलली होती. ती काढून ठेवली. 

...‘डॉ. शहाणे एम्बीबीएस (बॉम.)’ अशी पाटी असलेले दार ढकलून आम्ही आत गेलो. पाहातो तो काय! हेल्मेट घालून डॉक्‍टर शहाणे आक्रमक पवित्र्यात बसलेले. आम्हाला बघून त्यांनी सुटकेचा सुस्कारा टाकला.

‘‘तुम्ही होय! बोला, काय होतंय?’’ डॉ. शहाणे. त्यांना आम्ही पडश्‍याची तक्रार सांगितली.

‘‘हल्ली डॉक्‍टरांना ही काळजी घ्यायला लागते हो! तुम्ही उगीच घाबरू नका!!’’ आम्हाला धीर देत ते म्हणाले.

त्यावर आम्ही शतप्रतिशत उत्साहात म्हणालो, ‘‘छे, छे! घाबरायला आम्ही काय डॉक्‍टर आहोत? हाहा!!’’