बाहुबली-3! (ढिंग टांग! )

Dhing tang
Dhing tang

"स्टोरी थोडी काम्प्लेक्‍स आहे, पण लय भारी आहे, साहेब!,'' डायरेक्‍टरनं शर्टाची बाही ओढत सांगितले. निर्मात्याने अंग चोरले. त्याचे लक्ष समोर थंड होत चाललेल्या चहाच्या कोपाकडे होते. डायरेक्‍टरने आधीच चहा मारलेला होता. गेला एक तास डायरेक्‍टरने त्याला खुर्चीत जखडून ठेवले आहे. तेवढ्यात त्याने तीन कोप चहा मारलान. लेकाच्याचे मानधन कापले पाहिजे!! 

"फोडक्‍यात फॉंगा!'' निर्माता म्हणाला. त्याचा जीव घुसमटला होता. 
"हिते कोणाला टायम आहे? दोन मिंटात उडवतो, साहेब!'' डायरेक्‍टरचा इगो दुखावला होता. हिते किती प्रोडुसर येतात. मान खाली घालून बसतात. डायरेक्‍टरचे म्हणणे निमूटपणाने ऐकून वर पैसे देऊन जातात. हा कोण लागून गेला? 
""बरं, बरं, आटपा लौकर. आम्हाला जायचंय!'' निर्माता अजीजीने म्हणाला. त्याला खरेच कुठेतरी जायचे असावे. 
""आम्ही पन कामच करतो ना साहेब! कामाशिवाय थोडंच पोटाला भेटनार आहे? पोट तर सर्व्यांना आहे...काय?'' डायरेक्‍टरने निर्मात्याचे नाक ओढले. निर्मात्याला शिंक येईल, अशी भीती वाटली. एखाद्या प्रसिद्ध गायकाने चक्रीतान घेताना जबड्याची हालचाल करावी, तशी त्याने केलीही. पण शिंक काही निघाली नाही. न निघालेली शिंक फार हळहळ निर्माण करते. जाऊ दे. 
""मुख्य म्हंजे ही बाहुबलीची ष्टोरी आहे, हे ध्यानात घ्या, साहेब!,'' डायरेक्‍टरने पार्श्‍वभूमी सांगितली. 
""बाहुबली? हे कसलं आडनाव? ह्या:!!,'' निर्मात्याने नाक मुरडले. कारण त्याचे नाक हुळहुळत होते. 
""बस का? भुजबळ चालतंय तुम्हा लोकांना आणि बाहुबलीनं काय घोडं मारलं?,'' डायरेक्‍टरने बिनतोड सवाल केला. 
""तुमचं म्हणणं खरं आहे. इफ भुजबळ इज ओके, बाहुबली आल्सो ओके!'' निर्माता शरण आला. पहिली राउंड डायरेक्‍टरने जिंकली होती. 
""अमरेंद्र बाहुबलीला कटप्पानं का मारलं? मान खाली करा!'' डायरेक्‍टर म्हणाला. 
""का मारलं?,'' मान खाली करून निर्माता म्हणाला. 
""आता का मारलं!! येवढं रामायन घडलं तरी आखरीला रामाची सीता कोन? अहो, शिवगामीदेवीनंच कटप्पाला ऑर्डर धिली की बाबा, अशानं असं हुतंय तर बाहुबलीचा गेम कर!! म्हनून मारलं. काय कळलं? मान वर करा!!'' डायरेक्‍टर म्हणाला. 
""पण शिवगामी त्याची आई होती ना?'' निर्माता काकुळतीला आला होता. 
""तीच तर ष्टोरी आहे ना!! शिवगामी आई, कटप्पा मामा, भल्लालदेव भाऊ, अमरेंद्र बाहुबलीचा पोरगा महेंद्र बाहुबली, झालंच तर-,'' डायरेक्‍टरने बोटे मोडायला सुरवात केली. 
""आणि ती शिवसेना कोण?,'' निर्माता कमालीचा निरागस असावा!! 
""शिवसेना नाय साहेब! देवसेना...शिवसेना कुटून काढली तुम्ही? मान वळवा हितं!,'' डायरेक्‍टर फिक्‍कन हसला. निर्मात्याची अक्‍कल काढणे हा डायरेक्‍टरचा पहिला धर्म असतो. अपमान करणं दुसरा!! 
""मरू दे. सगळाच घोळ आहे. तुम्ही लौकर आटपा, निघू द्या आम...ब्वॉक...फ्रीक...फॉक...छीक...खॉक खॉक..!,'' निर्मात्याच्या नाकातोंडात पाणी गेलं. त्याचा जीव कासावीस झाला. स्टोरी सेशन पुरतं पार पडण्याच्या आत त्याचा चेहरा बाहुबलीसारखा रक्‍ताने माखला होता. संधी मिळाली तर ह्या डायरेक्‍टरलाच हत्तीच्या पायी द्यावं, अशी हिंस्त्र कल्पना त्याच्या डोक्‍यात थोडावेळ घुमली. 
""राहू द्या. तुमच्या च्यानी नाय व्हायचं काही!,'' डायरेक्‍टरनं जिव्हारी घाव घातला. 
""आमचं राहू द्या. तुमचं आटपा आता. आम्हाला दुसरी अपाइंटमेंट आहे...'' निर्मात्यानं आता निकराचं धर्मयुद्ध पुकारलं. 
""आम्हाला पन आहेच ना...बघा, चार जण वेटिंग आहेत!,'' डायरेक्‍टरनं आपला बाणा सोडला नाही. 
""किती होतील?,'' निर्मात्यानं निर्वाणीचं विचारलं. 
""कटिंगचे साठ, दाढीचे तीस!,'' गळ्याभोवतीचा टावेल काढून घेत शांतपणे डायरेक्‍टर म्हणाला. 
दहा रुपये टीपसकट शंभराची पत्ती देऊन निर्माता वेगाने तेथून बाहेर पडला. तरीही त्याच्या चालीत बाहुबलीचा डौल होता, असे काही लोक म्हणत होते. असो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com