एक खाद्यानुभव! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 29 मार्च 2017

मुंबईत खाण्यापिण्याची अनेक ठिकाणे आहेत. पण गिरगावातली खाऊ गल्ली बंद पडली. भंडाऱ्याच्या खाणावळी आणि कोपऱ्याकोपऱ्यावरचे इराणी बंद पडले. उत्तम मत्स्याहार देणारे गिरगावातले खडप्यांचे ‘अनंताश्रम’ गोमंतकात शिफ्ट झाले. पण आम्ही आमचे व्रत सोडलेले नाही. उत्तम जेवण कोठे मिळते ह्याचा शोध आम्ही गेले काही दशके घेत आहोत. तो शोध परवा संपला. आमचे परममित्र खा. संजयाजी राऊत हे पट्टीचे खवय्ये आहेत. (नागू सयाजी वाडीच्या परिसरातील एकही वडापाववाला सोडलेला नाही.) त्यांनी बोलता बोलता सांगितले की बांदऱ्याला एका ठिकाणी चांगले जेवण अत्यंत कमी दरात मिळते. थाळी आणि ‘अ ला कार्ट’ असे दोन्ही वर्गात पदार्थ उपलब्ध आहेत.

मुंबईत खाण्यापिण्याची अनेक ठिकाणे आहेत. पण गिरगावातली खाऊ गल्ली बंद पडली. भंडाऱ्याच्या खाणावळी आणि कोपऱ्याकोपऱ्यावरचे इराणी बंद पडले. उत्तम मत्स्याहार देणारे गिरगावातले खडप्यांचे ‘अनंताश्रम’ गोमंतकात शिफ्ट झाले. पण आम्ही आमचे व्रत सोडलेले नाही. उत्तम जेवण कोठे मिळते ह्याचा शोध आम्ही गेले काही दशके घेत आहोत. तो शोध परवा संपला. आमचे परममित्र खा. संजयाजी राऊत हे पट्टीचे खवय्ये आहेत. (नागू सयाजी वाडीच्या परिसरातील एकही वडापाववाला सोडलेला नाही.) त्यांनी बोलता बोलता सांगितले की बांदऱ्याला एका ठिकाणी चांगले जेवण अत्यंत कमी दरात मिळते. थाळी आणि ‘अ ला कार्ट’ असे दोन्ही वर्गात पदार्थ उपलब्ध आहेत. एकदा जायला हरकत नाही. संजयाजी ह्यांनी ‘मातोश्री केटरर्स अँड हॉस्पिटॅलिटी’चे नाव सुचवले. आम्ही ‘झोमॅटो’वर रेटिंग चेक केले. आश्‍चर्य म्हणजे ‘झोमॅटो’वर ह्या हॉटेलची लिंकच नाही!! तरीही म्हटले जाऊन तरी बघू या...गेलो.

बांदऱ्याच्या सिग्नलला राइट घेऊन लगेच कलानगरच्या दिशेने लेफ्ट घेतला की अर्थात कलानगरच येते. (मग काय येणार?) लेफ्ट घेताना ट्रॅफिक पोलिस हटकेल. पण त्याला मूठ उगारून दाखवावी. तो सोडेल!! कलानगरशी आल्यावर उजव्या हाताला एक गल्ली लागते. गल्लीच्या तोंडाशी चिक्‍कार पोलिस वडापाव वगैरे खाताना दिसतील. त्यांच्याकडे न बघता सरळ आत गेले की डाव्या हाताला ‘मातोश्री’चा बोर्ड दिसतो. (तो नाहीए, पण आहेय, असे समजून वाचावा!) तिथे गेल्यावर उंचपुरा दरवान भिवई उडवून ‘काय काम आहे?’ असे विचारेल. उजव्या तळहाताचा पाचुंदा करून तो तीनदा ओठांवर आपटून दाखवला की तो निमूट आत घेईल. (ही परवलीची खूण आहे.) ‘मातोश्री’चे डेकोरेशन उत्तम आहे. प्रथमदर्शनीच एक वाघ दिसतो. दचकू नका. तो खरा नाही. कचकड्याचा आहे. आपले वनमंत्री सुधीर्जी मुनगंटीवार ह्यांनी तो हॉटेलमालकांना भेट दिला आहे. असो. इथे वेटिंग करावे लागते. टेबले खाली होण्यासाठी फार वेळ लागतो. सेवकवर्ग कमालीचा नम्र आणि सौजन्यपूर्ण आहे. ‘‘आत कुणी सोडलं तुम्हाला?’’ हा प्रेमळ प्रश्‍न सुरवातीला विचारला जातो. पण नंतर फारसे कुणी फिरकत नाही. 

दिल्लीचे नामचीन लोक येथे आवर्जून येतात व मराठी पदार्थांचा आस्वाद घेऊन परत जातात. कोल्हापूरच्या ‘बावड्या’च्यात मिसळ खायला जाणाऱ्या सेलेब्रिटींचे फोटो जसे भिंतीवर दिसू लागतात, तशीच पद्धत इथेही आहे. इथल्या भिंतीवरही महनीय व्यक्‍तींचे मालकांसोबत काढलेले फोटो आहेत. विशेष म्हंजे ह्या सर्व महनीय व्यक्‍ती कमळ पार्टीच्याच आहेत! किंबहुना कमळ पक्षाचे इतके लोक इथे जेवून गेले आहेत की ‘मातोश्री’ हे कमळ पक्षाचे क्‍यांटिनच आहे, असे कोणाला वाटेल!! पण तसे नाही. इथे इतरांना प्रवेश निषिद्ध नाही. महाराष्ट्राचा प्रत्येक मुख्यमंत्री येथे एकदा तरी येऊन गेला आहेच. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतानाच ‘मी ‘मातोश्री’वर जेवायला जाईन’ असे वाक्‍य म्हणावे लागते, म्हणे. एका छायाचित्रात एक मुख्यमंत्री तर वाढायला उभे असलेले दिसतात!!   

वडापाव ही इथली सिग्नेचर डिश!! गरमागरम तळलेला वडा, त्यासोबतची लाल चटणी आणि पाव अशी ही संमिश्र चीज कुठल्याही बर्गर किंवा पिझ्झाच्या तोंडात मारेल अशी आहे. इथला वडा थोडा तेलकट आहे, पण चव न्यारीच. इथले चिकन सूप बरे नाही, असे म्हणून एका ग्राहकाने घरून चिकन सूप आणले होते. परंतु, ‘बाहेरील पदार्थ आणण्यास सक्‍त मनाई आहे’ असा बोर्ड त्याला दाखवण्यात आला. जाऊ दे. आम्ही गेलो तेव्हा हॉटेलचा खानसामा बाहेर गेल्यामुळे हॉटेल बंद राहील अशी पाटी होती. अखेर आम्ही बेसिनसमोरील आरशात भांग पाडून परतलो. तेही जाऊ दे.
 

रेटिंग : ***** पाच स्टार.
काय खावे?: बटाटेवडे आणि कोलंबी भात.
काय खाऊ नये? : जोडे.
कसे जावे? : नेले तर जावे!
कसे परत यावे? : बेस्ट लक!