वादे वादे जायते तत्त्वबोधः। (पहाटपावलं)

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

शिंगे फुटण्याच्या वयातील मुले आणि पालक यांचा "प्रेमळ संवाद' अनेकदा, ""जेव्हा तेव्हा वाद घालणं बंद कर'' किंवा ""या विषयावर आता वाद नको, मी सांगेन तेच व्हायला हवे,'' अशा इशारेवजा दटावणीने संपतो. कामाच्या ठिकाणीही "वादाचा मुद्दा' आला, की काही जण मौन पत्करतात, तर काही "वाद उकरून काढण्याची' संधी शोधत असतात. सतत वाद घालणाऱ्या व्यक्ती काहीशा अप्रिय होतात. एकंदरीत असे दिसते, की वाद घालणे किंवा खरे तर वाद करणे याकडे आपण जरा नकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. वाद म्हणजे शाब्दिक लढाई किंवा भांडण असे आपल्याला वाटते आणि शांतता राखण्याच्या उद्दिष्टाने वाद टाळण्याकडे आपला कल होतो. पण शांतता म्हणजे निश्‍चलता किंवा निष्क्रियता नव्हे. वाद टाळणे म्हणजे विचारांचा, मनाचा खळाळता ओघ बांघ घालून अडवण्यासारखे आहे. साठलेल्या पाण्याचे डबके होते आणि त्यात जीवजंतूंची पैदास होते. त्याचप्रमाणे वाद घालणे थांबवले तर विचारांचा व पर्यायाने ज्ञानाचा प्रवाह खुंटतो आणि भावनिक आवेग, आवेश, पोकळ अभिनिवेश यांची चलती सुरू होते.

खरे तर भारतीय परंपरेत तत्त्वचर्चेची एक पद्धत म्हणून वादाला महत्त्व आहे. भारतीय तत्त्वज्ञ स्वतःचे मत किंवा सिद्धांत सांगताना आधी आपल्या वैचारिक विरोधकांचे मत मांडून, याची बुद्धिनिष्ठ चिकित्सा करत; आणि मग आपले मत मांडत. विरोधी मनांची गंभीरपणे दखल घेण्याची भारतीय विचारवंतांची ही वृत्ती वाद-पद्धतीतही दिसते. जुन्या काळी एखाद्या विषयावर चर्चा घडविण्यासाठी "वादसभा' भरवली जाई. एकाच विषयावर दोन विरुद्ध मते मान्य करणारे विद्वान वादी व प्रतिवादी म्हणून समोरासमोर येत. सभेचे कामकाज सभापती चालवीत. प्रथम वादी आपले मत मांडे आणि प्रतिवादी ते खोडून काढण्याचा प्रयत्न करी व आपले मत मांडे. या दोन्हींतील कुठले मत सरस हे ठरवण्याच्या प्रयत्नात प्रश्‍न-उत्तरे-प्रतिप्रश्‍न-उत्तरे अशा फैरी झडत आणि शेवटी सभापती निकाल जाहीर करत. कित्येकवेळा ज्या मताचा पराभव होई, ते मत मांडणारा काही काळानंतर अधिक अभ्यास करून पुन्हा वादासाठी तयार होई. या वादपद्धतीच्या नीतीनुसार चुकीचे पुरावे जाणीवपूर्वक देणे निषिद्ध असे, एवढेच नाही तर अजाणता तसे पुरावे दिले गेल्याचे लक्षात आले, तर ते मागे घेतले जात. प्रतिपक्षाचा आदर, आपल्या मताची अभ्यासपूर्वक मांडणी आणि चर्चेच्या विषयातले खरेखुरे तथ्य जाणून घेण्याची प्रामाणिक इच्छा, ही या वादपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. सत्याबद्दलची निखळ जिज्ञासा, तत्त्व जाणून घेण्याची तळमळ यातून वादपद्धतीची निर्मिती झाली असावी. मूलभूत सत्यांना गवसणी घालण्याची क्षमता एकट्या-दुकट्या बुद्धिवानाकडे नसते. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत अशी एक नम्र जाणीव या पद्धतीच्या मुळाशी आहे.

सध्या मात्र आपल्या भोवतीच्या शाब्दिक गलबल्यात ही नम्रता, प्रतिपक्षाचा आदर, सत्य जाणून घेण्याची इच्छा लोप पावताना दिसतात. वादाची जागा जल्पाने किंवा वितंडाने घेतली आहे. "जल्प' या वादप्रकारात येन केन प्रकारेण वाद जिंकणे हेच उद्दिष्ट असते, तर "वितंड' या प्रकारात वादासाठी वाद घातला जातो. या दोन्हींमध्ये "सत्य' महत्त्वाचे नसतेच. टाळायला हवे ते जल्प आणि वितंड! वाद तर व्हायलाच हवेत, त्याखेरीज तत्त्वबोध शक्‍य नाही.

Web Title: dipti gangavane writes about dialogue