शक्‍यतांचे जग

universe
universe

स्वप्ने आपण सगळेच बघतो. झोपेत तर बघतोच, पण जागेपणी, उघड्या डोळ्यांनीही बघतो. स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघितले किंवा मिटल्या डोळ्यांनी; तरी स्वप्न म्हणजे एकअर्थी जे वास्तव नाही, खरे नाही, आभासी आहे ते! झोपेत स्वप्ने "पडतात' म्हणजेच त्याच्यावर जागृत मनाचा फारसा ताबा नसतो. जागेपणी मात्र आपण स्वप्ने "बघतो.' स्वप्नरंजन "करतो' कुठली स्वप्ने बघायची ही निवड आपली असते. जागेपणातली स्वप्ने म्हणूनच वर्तमानापेक्षा खूप जास्त चांगला भविष्यकाळ रंगवतात. पण आपण स्वप्ने "बघतो' म्हणजे नक्की काय करतो? आपल्या भोवतालची परिस्थिती जशी आहे, तशी नसती तर, असा विचार करतो, एवढेच नव्हे तर ती कशी असावी याची कल्पना करतो. कल्पनाशक्तीच्या खत-पाण्यावर स्वप्नांच्या वेली बहरत असतात.

असे म्हणतात, ""जो न देखे रवी, सो देखे कवी.' सूर्याच्याही नजरेस पडू न शकणारे जग कवीच्या डोळ्यांत भरते ते कल्पनाशक्तीच्या जोरावर! पण कल्पनाशक्ती ही फक्त कवींची मिरासदारी नाही. ती सर्व मानवजातीला मिळालेली अद्‌भुत देणगी आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये माणसाने केलेली प्रगती "कल्पनेपलीकडची आहे' असे म्हणण्याचा प्रघात आहे, पण खरे म्हणजे ही प्रगती कल्पनेच्या भराऱ्या घेण्याच्या माणसाच्या सामर्थ्याच्या आधारेच झाली आहे. आपल्या नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणात जाणीवपूर्वक बदल माणूस घडवून आणवू शकतो. कारण वास्तवापेक्षा वेगळी परिस्थिती तो कल्पू शकतो. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर माणसाची कल्पनाशक्ती, तो वास्तव जगात जगत असतानाच, त्याला शक्‍यतांच्या जगात घेऊन जाते. कल्पनाशक्ती असणे म्हणजे "काय आहे' यापासून "काय असू शकते' इथपर्यंत प्रवास करण्याची क्षमता असणे. चॉकलेटच्या बंगल्याची कल्पना करणारी बच्चे कंपनी, उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने बघणारे युवक-युवती, स्वस्थ-सुखी निवृत्त आयुष्याचा विचार करणारे प्रौढ आणि मरण कल्पनेचे अस्वस्थ होणारे वृद्ध, सगळ्यामध्येच ती क्षमता असते. समाजसुधारक, क्रांतिकारक, कलाकार, वैज्ञानिक, संशोधक या सगळ्यांची कल्पनाशक्ती असाधारण असते. त्यामुळेच ते सामान्यांच्या ध्यानीमनीही येऊ शकणार नाहीत, अशा शक्‍यतांचा विचार करतात आणि आपापल्या क्षेत्रात त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात.

कल्पनेचे पंख नसते, तर माणूस वस्तुस्थितीशी जखडला गेला असता. जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी त्याने काही ना काही निर्मिले असते; पण त्याची निर्मिती केवळ साचेबद्ध यांत्रिक झाली असती. कल्पनेच्या परीसस्पर्शाने माणसाची निर्मिती झळाळून उठली, बहुविध झाली. शक्‍यतांचे जग हे अनंत-अपार आहे. त्यातील ज्या शक्‍यता प्रत्यक्षात येतात, त्यांना वास्तव म्हटले जाते. वास्तव कधीच शक्‍यतांच्या मर्यादा पार करू शकत नाही; पण विशिष्ट शक्‍यता वास्तवात उतरवण्याची प्रेरणा आणि जिद्द यांमधून माणूस त्याच्या जगाचे वास्तव घडवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com