Dr Babasaheb Ambedkar Buddhism
Dr Babasaheb Ambedkar Buddhism sakal

आंबेडकरी चित्रकारांचा बुद्धाविष्कार

नागपूर येथे दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
Summary

बाबासाहेबांनी एका चित्रकाराकडून त्यांना अभिप्रेत असलेली बुद्धाची चित्र प्रतिमा तयार करून घेतली होती. त्यात बुद्ध उघड्या डोळ्यांचे आहेत. हे नुसते चित्र नव्हते, तर बुद्धांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन होता. आजच्या (ता.१४) आंबेडकर जयंतीनिमित्ताने बाबासाहेबांच्या द्रष्टेपणाविषयी.

नागपूर येथे दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आज आमचा नवा जन्म होत आहे म्हणत, बुद्धधम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे, असे बाबासाहेबांनी सांगितले. वर्णव्यवस्था, अस्पृश्यता लादणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग केला. पूर्वाश्रमीचा अस्पृश्य समाज बुद्धाशी जोडला गेला. बुद्ध धम्म पुन्हा देशाच्या केंद्रस्थानी आला. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथामधून बाबासाहेबांनी चिकित्सा करून बुद्ध आपल्याला सोपवला. बाबासाहेबांनी एका चित्रकाराकडून त्यांना अभिप्रेत असलेली बुद्धाची चित्र प्रतिमा तयार करून घेतली होती. त्यात बुद्ध उघड्या डोळ्यांचे आहेत. हे नुसते चित्र नव्हते, तर बुद्धांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन होता. हा उघड्या डोळ्यांचा बुद्ध म्हणजे आंबेडकरवादी दृश्यकलेच्या उगम होय. डॉ. यशवंत मनोहर यांचे मत या अनुषंगाने महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, ‘‘मला चालणारा बुद्ध हवा असे म्हणणारे बाबासाहेब बुद्धाला बुद्धाच्याच ‘सब्बं अनिच्चंच्या, चरथ भिक्खवे’च्या संकल्पनेशी जोडून घेतात. उघड्या डोळ्यांचा बुद्ध चितारून बाबासाहेब बुद्धालाच सम्यक दृष्टीच्या आणि सम्यक ज्ञानाच्या मर्माशी जोडतात. उघड्या डोळ्यांचा बुद्ध हे त्यांचे चित्र बावीस प्रतिज्ञांएवढेच विद्रोही आहे.

भारतीय संविधानाला दिलेल्या प्रज्ञानाएवढेच सर्जनशील आहे. बाबासाहेबांनी जन्माला घातलेले हे बुद्धाचे उघडे डोळेच आंबेडकरी चित्रचळवळीचा उगम आहे.’’ पुढे ते म्हणतात, ‘‘हे उघडे डोळेच आता आंबेडकरवादी चित्रकारांसाठी प्रेरणांची दीक्षाभूमी झाले आहेत.’’ अशा उघड्या डोळ्यांच्या बुद्धाची प्रतिमा कविता आणि चित्रांमध्ये विविध आशय विषय आणि अर्थछटामधून आविष्कृत होते. उदाहरण म्हणून ‘...आणि बुद्ध मरून पडला’ ही अर्जुन डांगळे यांची कथा किंवा दया पवार यांची कविता अधोरेखित करता येईल. पवार आपल्या कवितेत म्हणतात,

‘मी तुला पाहतो चालताबोलता

दीन-दुबळ्यांच्या दुःखावर फुंकर घालणारा

जीवघेण्या काळोखात हाथी मशाल घेत झोपडी झोपडीकडे जाणारा

संसर्गजन्य रोगासारख्या नरडीचा घोट घेणाऱ्या दुःखाचेm नवे अर्थ सांगणारा.’

‘दलितांच्या दुःखाची माऊली’, ‘युगप्रवर्तक बुद्ध’, ‘अनिश्वरवादी’ इत्यादी बुद्ध प्रतीके साहित्य आणि चित्रकलेत आली आहेत. त्या दृष्टीने डॉ. महेंद्र भवरे यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, ‘‘डॉ. आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारताना ध्यानस्थ बुद्धापेक्षा चालणाऱ्या बुद्धाची प्रतिमा पूज्य मानली आहे. कारण दृढ निश्चयाने दलितांनी प्रयत्नशील राहावे, स्वत:ला बदलावे, अंधश्रद्धा विसराव्यात व कर्तृत्वाने स्वत:ला सिद्ध करावे, असे त्यांना वाटत होते. म्हणून या कवितेतील प्रतीकीकरण हे चलत् बुद्धाच्या संदर्भात झाल्याचे प्रत्ययाला येते. बुद्धाच्या ध्यानस्थ, शिल्पित, निद्रिस्त रूपाऐवजी चलत् रूपातील कृती-उक्तीकडे कवीदृष्टीने पाहिले आहे. म्हणून वेगळ्या रूपातील बुद्धाचे प्रतीक साकार झाले आहे. बुद्धाकडे पाहण्याच्या परंपरागत वृत्तीपेक्षा आंबेडकरी जाणिवेची दृष्टी येथे प्रकट झाली आहे. त्यामुळे चलत् बुद्धाचे प्रतीक सिद्ध झाले आहे.’’

बुद्धिवादी दर्शन म्हणून बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दिल्याने कवितेबरोबर चित्रामध्येही अशीच बुद्ध प्रतिमा सिद्ध झाली आहे. काही कलाकृतीचा निर्देश या दृष्टीने करता येईल. बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर चित्रकार प्रमोद रामटेके यांनी ‘मुक्तीची अनुभूती’ त्यांच्या चित्रात मांडल्याचे दिसते. त्यांनी आपल्या चित्रात बुद्ध ध्यानस्थ बसलेले दाखवून त्यांच्या चारही बाजूला असलेला कोलाहल गडद रंगाच्या छटांमधून अधिकच अर्थगर्भ केला आहे. श्रीधर अंभोरे यांनी रेषांच्या माध्यमातून बुद्ध प्रतिमेचा आविष्कार केला आहे. अंभोरे बुद्धांशी संवाद करताना म्हणतात, ‘‘तुझ्या येण्याचा जन्मही चंद्राने पाहिला आणि जाण्याचे महापरिनिर्वाणही चंद्राने डोळे उघडून पाहिले, तेही प्रसन्नतेने. जन्मही आनंद आणि मृत्यूही आनंदच. दुःख घालवण्याचे औषध म्हणजे तुझे तत्त्वज्ञान. तू कुणी अवतारी पुरुष म्हणून मिरवले नाहीस. माणसांशी अंतर ठेवले नाहीस. मैत्रीचेच नाते ठेवले म्हणून तू माणसांचा, सर्व सजीवांचा झालास. तू सकस साधक परिवर्तनीय असे देत राहिलास, जे सर्व मानवाने पाहिले, अनुभवले. सकारात्मक देत असताना तू आयुष्यभर शस्त्राऐवजी फुले वाटत राहिलास म्हणून तुला वंदन.’’ जणू हा संवादी बुद्ध त्यांनी साकारला आहे.

क्रांतीच्या संस्कृतीचा ठेवा

श्रावस्ती मोगलन यांनी बुद्धाच्या व्यक्तिमत्त्व आणि दर्शनावर आपली चित्रमालिका तयार केली आहे. ‘शांतीप्रिय बुद्ध’, ‘करुणामय बुद्ध’ अशा अनेक बुद्धप्रतिमा त्यांनी साकारल्या. बळी खैरे यांनी ‘जर्नी ऑफ एन्लाईटमेंट’मध्ये चालत्या बोलत्या बुद्धाची प्रतिमा साकारली आहे. नंदकुमार जोगदंड यांनी काढलेल्या चित्रात बुद्धाच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’, ‘भारतीय संविधान’ हे दोन ग्रंथ दिले आहेत. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला आहे, तो चिकित्सा करूनच याकडे हे चित्र लक्ष वेधते. राजानंद सुरवडकर यांनी ‘मशाल घेतलेला बुद्ध’, ‘पृथ्वीला शिवणारा बुद्ध’ साकारला आहे. चित्रकार राजनांद म्हणतात, ‘मी बुद्धाला बाबासाहेबांच्या दृष्टीने पाहतो, मला चालणारा बुद्ध अभिप्रेत आहे’. जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ताज हॉटेलवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला, तेव्हा पृथ्वीला शिवणाऱ्या बुद्धाची प्रतिमा साकारली आहे. मी स्वत: ‘महासाथीत रस्त्यावर चालत जाणारे कामगार आणि उघड्या डोळ्यांचा बुद्ध’ अशी प्रतिमा साकारली आहे. महासाथीत कामगार वर्गावर अरिष्ट कोसळले हे सर्व बुद्ध अस्वस्थ होऊन पाहतो आहे, त्याची अगतिक, कारुणिक, संवेदनशील प्रतिमा साकारली आहे. बुद्धिप्रामाण्य, तर्कशुद्धता, विज्ञाननिष्ठा, मानवतावाद, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, वैश्विक बंधुता या चिरंतन मानवी मूल्यांचा प्रवर्तक अशी बुद्धाची ओळख डॉ. आंबेडकरांनी दलित वर्गाला करून दिली आहे. बुद्ध तत्त्वज्ञानातील मानवतावादी मूल्य प्रतीक स्वरूपात दलित कवितेच्या ओळींमध्ये आढळतात. पिंपळवृक्ष, पिंपळपान, बोधिवृक्ष, धम्मचक्र, काशाय वस्त्र अशा प्रतीकांद्वारे क्रांतीच्या संस्कृतीचा ठेवा उभा केला आहे.

भारतामध्ये वर्णव्यवस्थेने कलेचा विकास होऊ दिला नाही. डॉ. बाबासाहेबांनी हे नोंदवले आहे. ते म्हणतात, ‘‘आपल्याकडील व्यापारी किंवा धनिकवर्ग यांच्यामध्ये रसिकतेची दृष्टी असत नाही. हा त्यांचा दोष नाही; चातुर्वर्ण्याचा आहे. चातुर्वर्ण्यात जे वर्णभेद पाडले आहेत, त्यात कोणी काय करावं, याचा खुलासा आहे. ब्राह्मणांनी संस्कृती आणि कला यांचे संवर्धन करावे, वैश्य लोकांनी पैसा कमवावा असे हे धार्मिक समजले जाणारे नियम असल्यामुळे प्रत्येक जण झापडं लावून जीवनाकडे पाहत असतो. त्यामुळे त्यांच्यातील रसिकता मेली आहे. आपल्याकडील श्रीमंत माणसं पाहा, त्यांना पैशाची अनुकूलता असली तरी आपल्या क्षेत्राबाहेरील ते कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. आमच्याकडच्या धनिकांच्या घरात एखादेही सुंदर चित्र आढळणार नाही; पण युरोपात तसे नाही. प्रत्येक जण आपापले व्यवसाय सांभाळूनही निरनिराळ्या कलांकडे दक्षतेने पाहतात. आपल्याकडे कलेविषयी जी अनास्था दिसून येते त्याचे कारण चातुर्वर्ण्य आहे. चातुर्वर्ण्यामुळे हिंदू धर्मातील लोकांच्या रसिकतेचेही अपहरण झाले आहे.’’ आंबेडकरी कलावंतांनी ही कलेतील स्थितीशीलता ब्रेक केली असून, उघड्या डोळ्याची बुद्ध प्रतिमा क्रांतिदर्शक आविष्कारली आहे, हा भारतीय चित्रकलेचा नवा प्रवाह म्हणून नोंदविला जाणार आहे. शोषणविरहित समाजाच्या निर्मितीसाठी ही चित्रप्रतिमा निर्माण झाली आहे हे नक्की. (लेखक चित्रकार-कवी असून, मुंबई विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत.)

- डॉ. सुनील अभिमान अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com