अभिमन्यूप्रमाणे चक्रव्यूहात फसलेला विद्यार्थी

डॉ. प्रज्ञा देशपांडे  (शिक्षणतज्ज्ञ)
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

जागतिक स्पर्धा, वेगवान परिवर्तने, नव्या युगाची आव्हाने आणि वर्षानुवर्षांच्या रूढींवर चाललेले शिक्षण याचा परिपाक म्हणजे आजची संक्रमणावस्था व संभ्रमण.

अभिमन्यू- कोवळा पण उत्साहसंपन्न वीर योद्धा. आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरा जातो. चक्रव्यूहात सगळ्या थोर, महान आणि जवळच्या नातेवाइकांविरुद्ध एकटा लढला. मदत करणारे मार्गदर्शक जवळ नव्हते. पराक्रमाची शर्थ केली त्याने. अनुभवाची कमतरता, अपूर्ण ज्ञान पण ध्येयासक्ती अफाट. बरीच झुंज दिली; पण शेवटी गारद झाला दुनियादारीच्या रगाड्यात.

हे सगळे आठवायचे कारण आजची शिक्षणव्यवस्था, ट्यूशनचे महाभारत अन्‌ आजचा अभिमन्यू विद्यार्थी. कोणे एके काळी सहायक, पूरक म्हणून सुरू झालेला ट्यूशनचा उपक्रम संपूर्ण व्यवस्थेला गिळंकृत करणारा अमरवेल ठरत आहे. प्रचंड संक्रमणाच्या काळाचा परिणाम सामाजिक,  राजकीय, सांकृतिक, कौटुंबिक क्षेत्रासोबत शिक्षणक्षेत्रावर होताना दिसतो आहे. त्यातच शिक्षणक्षेत्राचे अपयश दडले आहे, असे म्हणावे लागेल. ज्या क्षेत्राने समाजाला दिशा द्यावी तेच आज दिशाहीन वाटू लागले. ‘परोपदेशे पांडित्य’ सुचविणारे अनेक ‘सो कॉल्ड’ शिक्षणतज्ज्ञ, स्वनामधन्य मान्यवर आज या क्षेत्रात वाढले आहेत. या गलबल्यात एकाकी लढणारा व हरलेला अभिमन्यूच्या रूपातील आजचा विद्यार्थी.

साधारणपणे बारावीनंतर विविध पदवी-अभ्यासक्रम असतात. म्हणजे अकरावी आणि बारावी हा शैक्षणिक स्तर शालेय व पदवी शिक्षण यांना जोडणारा दुवा आहे. पण, फार वर्षांपासून या स्तराकडे गांभीर्याने बघितले गेले नाही. ना पेशा म्हणून स्वीकारलेल्या शिक्षकांकडून, ना पालकांकडून, ना संस्थाचालकांकडून, ना शिक्षण विभागाकडून आणि अख्ख्या यंत्रणेच्या मुळावर उठलेल्या ट्यूशनच्या धंद्याकडून. शिक्षक ही वृत्ती नसून पेशा आहे हेच एवढी वर्षे समाजमनात भिनले आहे. या कारणांमुळे सर्वाधिक नुकसान विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे होत आहे. पर्यायाने वर्तमान पालकांचे आर्थिक स्वरूपात प्रत्यक्ष नुकसान होत आहे.

आज या स्तरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था अभिमन्यूसारखी झाली आहे यात शंका नाही. ट्यूशन क्‍लास, कॉलेज, करिअर यांच्या चक्रव्यूहात तो पुरता अडकलाय. कित्येक वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे खच्चीकरण, अवमूल्यन, अवप्रतिष्ठा, उपेक्षा त्यांनी स्वत: तर केली आहेच शिवाय शासनातील भ्रष्ट घटक, संस्थाचालक, माजलेले ट्यूशन सम्राट तसेच अधिकार व कर्तव्य यांची गफलत झालेला समाज हेही या अधोगतीला कारणीभूत आहेत. जेवढे या चक्रव्यूहातून सुटण्याचा प्रयत्न करावा तितके त्याचे पाश अधिक घट्ट होत आहेत. आता या साखळीमधील प्रत्येक घटकाचा विचार करू.

शिक्षक - आज उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झालाय. शिकवायची इच्छा आहे; पण विद्यार्थी नाहीत. विद्यार्थी आहेत, तर शाळा-कॉलेजने लादलेल्या शिक्षणेतर कामांचा गुंता. ट्यूशनचे शिक्षक सांगतात कॉलेजच्या मास्तरला बारावीचेही येत नाही. ते काय फक्त बोर्डाच्या पेपरापुरते कामाचे. तसेही त्यांना तुम्हाला पास करावेच लागेल, काही ऐकू नका त्यांचे. खरे तर पदव्युत्तर पदवी व शिक्षणशास्त्र पदवी ही किमान अर्हता आहे या स्तरावर नोकरी मिळविण्याची. उलट ट्यूशनमधील शिक्षकांच्या पदव्या आणि अनुभव तपासायची गरज आहे. 

शासनातील भ्रष्ट घटक - तळे राखील तो पाणी चाखील या म्हणीची सत्यता पटवून देण्यासाठीच सरकारी कचेरीचा जन्म झाला की काय, असे सामान्यांना वाटते. तरी आजकाल तंत्रज्ञान व माहितीचा अधिकार आहे. पूर्वीसुद्धा चांगले लोक होते, आताही आहेत. पण, काही निवडक व नग मंडळींमुळे संपूर्ण यंत्रणेकडे संशयाने बघितले जाते. स्थानिक शाळा-कॉलेजची अद्ययावत माहिती स्थानिक शासन प्रणालीला पुरेपूर असते. वृत्तपत्रांमधून राळ उडाली किंवा वरून बडगा आला, तर थातूरमातूर कारवाई करीत ‘खाल्ल्या अन्नाला जागणे’ असे अनेक सुरस प्रकार या यंत्रणेत बघायला मिळतात. बरेचदा यांच्याच आशीर्वादाने स्थानिक ट्यूशन लॉबी तणासारखी फैलते. 

संस्थाचालक - स्वातंत्रोत्तर काळात शिक्षण देणे हे व्रत होते. आता हा ‘हॉट’ धंदा झाला आहे आणि ‘धंदे में सब जायज है!’ काही तुरळक शैक्षणिक संस्था सोडल्या, तर सामान्यांना या धंदेवाईक शैक्षणिक संस्थानिकांचा अनुभव येतोच येतो. सरकार कोणाचेही येऊद्या हे आपली दुकानदारी अभंग राखण्यात यश मिळवितात. ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती’ हे वाक्‍य जणू नसानसांतून भिनलेली ही जमात. शाळेतील शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यापर्यंत शासनाच्या खऱ्या योजना, शासनाची खरी भूमिका पोहोचूच देत नाहीत. सर्व लाभ वरच्यावर झेलून बाकी घटकांना कसाबसा जगवतो. 

ट्यूशन सम्राट - आज नव्या व्यवसायाची भरभराट झाली आहे ती म्हणजे ट्यूशन. एकेका बॅचमध्ये १०० ते २०० विद्यार्थी. दोन ते तीन लाख फी प्रत्येक विद्यार्थ्याकडून. ॲडमिशनच्या वेळी अर्धी फी आणि काही महिन्यांनी उरलेली. व्यवसायात पहिले माल व मग किंमत हे सूत्र असते. इथे सारे उलटेच. विद्यार्थ्यांचा निकाल नीट लागला नाही, तर नालायकीचे खापर त्याच्यावरच फोडले जाते. इतक्‍या मोठ्ठ्या समूहात सगळेच समजेल इतका प्रत्येक विद्यार्थी हुशार नसतो. शिवाय दोन वर्षे सतत आठ-आठ तास दडपणात अभ्यास करणे साऱ्यांनाच झेपत नाही. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कुवतीपेक्षा यांना आर्थिक कुवतच अपेक्षित असते. पूर्वी शाळा-कॉलेजच्या वेळेनंतर क्‍लासेस चालायचे. आता हेच ट्यूशनवाले शाळा-कॉलेजला वेठीस धरून त्यांच्या वेळेत क्‍लासेस ठेवतात.

पालक - पालक अत्युच्च शिक्षित असो वा अशिक्षित. पाल्यांच्या बाबतीत सगळे एकजात असहाय आणि अव्यवहारी होतात. इथेच शिक्षणक्षेत्राच्या ससेहोलपटीला सुरवात होते. माझा पाल्य ‘मोठ्ठा’ झाला पाहिजे म्हणजे भौतिक सुख संपत्तीयुक्त एवढेच त्यांचे स्वप्न असते. चारित्र्यनिर्माण-सुदृढ-राष्ट्रभक्त वगैरे नंतर पाहू हीच मानसिकता. शाळा-कॉलेजात समजत नाही मग लाव ट्यूशन. तेथेही समजत नाही मग ‘होम ट्यूटर’. तेही नाही तर पुन्हा दुसरे दुकान ओत पैसा आणि कर हुशार, ही मानसिकता. थोडा धीर थोडा शालेय व्यवस्थेवर विश्वास आणि त्यांच्याकडूनच शिक्षण करवून घेण्याचा दबाव पालकांनी टाकला, तर आजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळून व्यवस्था सुरळीत होईल. पण, सुरवात कोणी करावी? हा मोठाच प्रश्न आहे.