सौदीतील सत्तासंघर्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

सौदी अरेबियातील अकरा राजपुत्र आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे अटकसत्र हा भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग आहे, असे सांगण्यात येत असले, तरी सत्तासंघर्ष हेच त्याचे मूळ आहे

सौदी अरेबियाचे राजपुत्र अलवलीद बिन तलाल यांची गणना जगातील पन्नास अब्जाधीशांमध्ये होते. अनेक बड्या उद्योगांमध्ये हिस्सा असलेल्या या राजपुत्राला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गजाआड व्हावे लागल्यानंतर "बिहाइंड एव्हरी फॉर्च्युन देअर इज अ क्राइम' या "गॉडफादर' कादंबरीच्या शीर्षभागीच उद्‌धृत केलेले प्रख्यात फ्रेंच कादंबरीकार बाल्झॅक यांचे वचन आठवल्याशिवाय राहात नाही. सौदी अरेबियातील नाट्यपूर्ण घडामोडींमध्ये गादीचे अधिकृत वारसदार मोहंमद बिन सलमान यांनी सत्तेवरील पकड मजबूत करण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून अकरा राजपुत्र, ज्येष्ठ लष्करी अधिकारी, तसेच काही मुलकी अधिकारी यांना शनिवारी मध्यरात्रीनंतर अटक केली आणि त्याची परिणती अर्थातच तेलाचे गेले काही महिने कमालीचे घसरलेले भाव वाढण्यात झाली.

युवराज सलमान यांनी ही मोहीम हाती घेण्याआधी काही तासच, राजे सलमान बिन अब्दुल्ला अझिज यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नेमलेल्या एका समितीचे प्रमुखपद युवराजांकडे सोपवले होते. वरकरणी राजपुत्र अलवलीद तलाल आणि अन्य राजपुत्रांची अटक हा याच मोहिमेचा भाग असल्याचे दाखवण्यात ते यशस्वी झाले आहेत आणि सौदी अरेबियातील सरकारधार्जिण्या माध्यमसमूहांनी हा "पारदर्शक राज्यकारभाराचा' भाग असल्याचा धोशाही लावला आहे. तरीही या अटकसत्रामागील सत्तासंघर्ष लपून राहिलेला नाही; कारण या अटकसत्रापूर्वीच राजे सलमान यांनी राजपुत्र मितेब यांच्याकडून "नॅशनल गार्ड'ची सूत्रे काढून घेतली होती! सौदी अरेबिया, तसेच अन्य अरब देशांमध्ये सत्तासंघर्ष नवा नाही. मात्र, या अटकसत्रात अलवलीद तलाल यांचा समावेश असल्यानेच जगात मोठी खळबळ माजणे साहजिकच होते. तलाल यांची अमाप संपत्ती आणि "ऍपल', "ट्विटर', "सिटी ग्रुप' आदी बड्या कंपन्यांमध्ये त्यांनी केलेली गलेलठ्ठ गुंतवणूक आणि जगभरातील बडे व्यावसायिक, राजकारणी आदींशी असलेले त्यांचे निकटचे संबंध याची पार्श्‍वभूमी त्यांच्या अटकेला आहे. 1991 ते 95 या काळात त्यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांचाच डबघाईला आलेला व्यवसाय सावरण्यासाठी त्यांचे एक अलिशान जहाज दोन कोटी डॉलरना विकत घेऊन साह्य केले होते, एवढी एकच बाब अलवलीद तलाल यांचा एकूण संपर्क आणि आवाका लक्षात घेण्यास पुरेशी आहे.
युवराज मोहंमद बिन सलमान यांनी घडवून आणलेल्या या हालचालींना मोठी पार्श्‍वभूमी आहे. जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांच्या निधनानंतर सलमान बिन अब्दुल्ला अझिज यांनी 2015च्या जानेवारीत राजसत्तेची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पुढच्या तीन महिन्यांतच राजे सलमान यांनी मोठ्या नाट्यमय पद्धतीने आपला वारसदार बदलला. वारसदाराच्या शर्यतीत राजे अझिज यांचा मुलगा मोहंमद बिन सलमान होता; पण त्याला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आणि वारसदार म्हणून गृहमंत्री मोहम्मद बिन नायफ यांच्या नावाची घोषणा केली होती. तेव्हापासून सत्तासंघर्ष सुरू होता. त्यानंतर राजे सलमान यांचा विचार बदलला आणि आताच्या घडामोडींनंतर तर मोहंमद बिन सलमान यांच्याच हाती सारी सूत्रे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या साऱ्या राजकारणामागे अर्थातच तेलाचे गेल्या वर्ष- दोन वर्षांत घसरलेले भाव कारणीभूत आहेत आणि त्यामुळेच जागतिक पातळीवर या घटनांचा मोठा परिणाम होणे अटळ आहे. रविवारनंतर वाढलेल्या तेलाच्या भावामुळे हे स्पष्ट झाले आहे. पश्‍चिम आशियात सतत सुरू असलेल्या संघर्षास शिया-सुन्नी वादाची न टाळता येणारी झालरही यामागे आहे. या संघर्षात इराणचे प्रभुत्व वाढत चालल्याने सौदी अरेबियाची आणि विशेषतः राजे सलमान यांची अस्वस्थता वाढत होती. त्यामुळेच त्यांनी याच वर्षाच्या प्रारंभी मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई, जपान व चीनचा दौरा करून सौदीच्या आर्थिक आणि राजकीय स्थैर्याला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. जपान आणि चीनशी अब्जावधी डॉलरचे करार आणि व्यापार करार हे या दौऱ्याचे खास हेतू होते. त्यानंतर परिस्थितीत काहीसा बदल झाला आणि अखेर त्याची परिणती या अटकसत्रात झाली आहे.

या साऱ्या घडामोडींनंतर "युवराज' मोहंमद बिन सलमान यांचा सत्ताग्रहणाचा मार्गही निर्वेध झाला आहे. राजे सलमान आता 81 वर्षांचे आहेत आणि त्यामुळेच पुढच्या दीड महिन्यात वा नववर्षात ते राजेपदाची जबाबदारी पुत्राकडे सोपवतील असे दिसते. अर्थात, सौदी अरेबियाच्या उत्पन्नाचा एकमेव आणि अत्यंत श्रीमंती स्रोत असलेल्या तेलाचे भाव स्थिर राखणे, हे त्यांचे पहिले उद्दिष्ट असेल. सौदीतील सर्वांत मोठी तेल कंपनी "सौदी अरमॅको' आपले शेअर विक्रीस काढण्याच्या विचारात आहे. त्याचबरोबर सौदीचा केवळ क्रूड तेलाच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवहाराला वेगळे आयाम देण्याचाही त्यांचा विचार आहे. या साऱ्या बाबी लक्षात घेतल्या तर पुढचा किमान काही काळ क्रूड तेलाच्या व्यवहारात मंदी येऊ शकते. त्यामुळेच सौदीतील या अटकसत्राचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम अपरिहार्य आहेत. भले, हे अटकसत्र भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग म्हणून घडवून आणलेले असो; सत्तासंघर्ष हेच त्याचे मूळ आहे, यात शंका नाही.