धोक्याचं वरीस ओलांडताना...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

महासत्तेचे स्वप्न तर सर्वांच्याच मनात आहे; पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनीच राग-लोभ दूर ठेवून एकजुटीने नववर्ष घालवायला हवे.
 

महासत्तेचे स्वप्न तर सर्वांच्याच मनात आहे; पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनीच राग-लोभ दूर ठेवून एकजुटीने नववर्ष घालवायला हवे.
 

नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रत्येकाच्याच मनात काही तरी खास बात असते; पण सगळेच आपली ‘मन की बात’ उघड करून सांगतात असे नाही! मात्र, यंदा अवघ्या भारतवर्षाला उत्सुकता आहे, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’बद्दलच! नववर्षात खिशात भरभरून रोकड राहू दे, अशी इच्छा तर या देशातील साऱ्यांच्याच मनात असणार. मात्र, मोदी यांचे नववर्षाचे संकल्प काय असणार? सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी तेही त्या संबंधातच गांभीर्याने विचार करत असणार. नववर्ष हे आपल्यासाठी पुन्हा एकदा निवडणुकांचे वर्ष असणार आहे. महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, तर उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर तसेच गोवा या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. मात्र, या महाराष्ट्रदेशाचे लक्ष जसे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर केंद्रित झाले आहे, तसेच संपूर्ण देशाचे लक्ष हे उत्तर प्रदेशकडे लागले आहे. दस्तुरखुद्द मोदी तसेच भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशचा गड काबीज करण्यासाठी आतापासूनच अथक प्रयत्न करत आहे, तर तेथील सत्तारूढ समाजवादी पार्टीतील बेदिली इतकी टोकाला गेली आहे, की पिताश्री मुलायमसिंह यांनी आपले चिरंजीव व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाच पक्षातून निलंबित केले आहे. आता या यादवीचा फायदा उठवण्यासाठी ‘बहेनजी’ मायावती जिवाचे रान करताहेत. उत्तर प्रदेश कोण जिंकतो, यावर देशाचे राजकारण कोणते वळण घेणार, ते अवलंबून आहे!  पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिष्ठाच तेथे पणाला लागणार आहे. त्याशिवाय मोदी यांच्या मनातील ‘कॅशलेस इंडिया’च्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुका कशा पार पडतात, हीदेखील केवळ भारत वर्षासाठी नव्हे तर जगभरासाठी उत्सुकतेची बाब ठरणार आहे; कारण आपल्या देशातील निवडणुकांचे अर्थकारण अद्याप भल्याभल्यांना उलगडलेले नाही.

सरत्या वर्षाची सुरवात झाली तीच दोन जानेवारी रोजी पाकिस्तानपुरस्कृत अतिरेक्‍यांनी पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावर चढवलेल्या हल्ल्याने. तेव्हापासून या शेजारी देशाबाबत आपले संबंध हे कमालीचे तणावग्रस्त राहिले. मात्र, उरी येथील लष्कराच्या कॅम्पध्ये असेच अतिरेकी घुसल्यावर आपण केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’मुळे जगाला आपल्या लष्करी सामर्थ्याचा प्रत्यय आला आणि ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा ‘कोडवर्ड’च बनून गेला! मात्र, सरत्या वर्षात तरीही सतत कुरापती काढण्याचे सत्र पाकिस्तानने सुरूच ठेवले आहे. पाकिस्तानवर चढवलेल्या त्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर मोदी यांनी असाच हल्ला ‘काळ्या पैशा’वर चढवण्याचा निर्णय घेतला आणि दिवाळीचा उल्हास मावळण्याच्या आतच ‘हजार-पाचशे’च्या नोटा चलनातून बाद करून टाकल्या. अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी पंतप्रधानांनी स्वत:च घातलेली ५० दिवसांची मुदत संपल्यावर आता नववर्षात तरी ‘अच्छे दिन!’ येतील, याच आशेवर सारा देश सरत्या वर्षाला निरोप द्यायला सज्ज झाला आहे. या वर्षातील एक महत्त्वाची बाब म्हणजे समाजात उभी ठाकलेली दुराव्याची दरी. सरकारच्या कोणत्याही निर्णयाबाबत नाराजी व्यक्‍त करणाऱ्यास थेट देशद्रोही ठरवण्याचा प्रघातही याच वर्षात पडला आणि त्यामुळे ही दरी अधिकच रुंदावत गेली. त्यामुळेच वर्ष संपताना थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्याची दखल घ्यावी लागली आणि ‘असहमतीचा अधिकार अबाधित राहणे, निरोगी तसेच निकोप समाजाच्या वाढीसाठी आवश्‍यक आहे,’ असे त्यांना ठामपणे सांगणे भाग पडले. ‘विरोधी मत म्हणजे गुन्हा असे मानणे हे घातक आहे!’ या राष्ट्रपतींच्या उद्‌गारांची गांभीर्याने दखल घेतली गेली, तर जगातील ही सर्वांत मोठी लोकशाही अधिक सुदृढ होईल. महासत्तेचे स्वप्न तर सर्वांच्याच मनात आहे; पण ती ‘मन की बात’ प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनीच राग-लोभ दूर ठेवून एकजुटीने नववर्ष घालवायला हवे. नव्या वर्षाचा खरा संकल्प हाच असू शकतो!

Web Title: editorial artical