कणाकणांत उमलू दे विज्ञान!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

िवज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा विलक्षण झपाटा पाहता भारताला या क्षेत्रात मागे राहणे परवडणारे नाही. विज्ञानाची रुची सर्वदूर निर्माण करण्यासाठी ठोस कार्यक्रमच हवा.

िवज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा विलक्षण झपाटा पाहता भारताला या क्षेत्रात मागे राहणे परवडणारे नाही. विज्ञानाची रुची सर्वदूर निर्माण करण्यासाठी ठोस कार्यक्रमच हवा.

विज्ञानच देशाच्या प्रगतीचे वाहक असेल, या विश्‍वासाने स्वातंत्र्योत्तर काळापासून विज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले होते. त्यामुळेच या क्षेत्रातील संस्थांना पाठबळ दिले गेले आणि त्यातील अनेक नावारूपालाही आल्या; परंतु देशात विज्ञानाची आवड सर्व थरांत झिरपण्यासाठी, समाजात या विषयाची ज्ञानलालसा निर्माण होण्यासाठी त्यांचा उपयोग किती झाला, असा प्रश्‍न विचारला तर निराशाच पदरी येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायन्स काँग्रेसच्या उद्‌घाटनाच्या भाषणात ‘सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’चा उल्लेख केला, त्याचे महत्त्व यासंदर्भात लक्षात येते. विज्ञान हा केवळ अभ्यासविषय नाही, तर ती एक वृत्ती बनायला हवी, तशी ती होण्यासाठी या विज्ञानसंस्था आणि सर्वसामान्य यांच्यातील दरी बुजायला हवी. दरवर्षीच्या सायन्स काँग्रेसच्या वेळी या मुद्द्यांची चर्चा सुरू होते व तिथेच विरते. मुळात एखाद्या जत्रेसारखे असलेले सायन्स काँग्रेसचे स्वरूप बदलण्यापासून त्याची सुरवात व्हायला हवी. आय.आय.टी., राष्ट्रीय प्रयोगशाळा, विद्यापीठे, आयसर अशा अनेक संस्था आज विज्ञानाच्या क्षेत्रात काम करताहेत; तिथे विविध क्षेत्रांतील अध्यापन-संशोधन सुरू आहे; वेगवेळ्या उपक्रमांतून सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोचविण्याचे उपक्रम सुरूही आहेत; परंतु तंत्रज्ञान ज्या वेगाने आपल्या जीवनाला अक्षरशः वेढून टाकत आहे, ते लक्षात घेता ते काम पुरेसे नाही. विज्ञानप्रसाराला एखाद्या व्यापक चळवळीचेच रूप यायला हवे. या कामात भाषा हा अडसर बनू नये, यासाठीही प्रयत्न करावे लागतील. विज्ञान अधिक आनंददायी करणारे, विज्ञानगंगा दूरपर्यंत पोचविणारे प्रेरित जनशिक्षक आता हवे आहेत. विज्ञानप्रसारातील भाषेचे अडसर ओलांडून वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधूनही विज्ञान पोचविता येऊ शकते. या विषयातील संज्ञा-संकल्पना खरे म्हणजे मातृभाषांमधूनही उत्तम रीतीने समजावून देता येऊ शकतात. तसा विचार करून अधिकाधिक साहित्य या भाषांमधून कसे प्रकाशित होईल, हेही पाहायला हवे. हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. केंब्रिज विद्यापीठातील एका संशोधनातही तो हाताळण्यात आला आणि स्थानिक भाषांमधूनही काही लोक चांगले काम करीत असून, त्यांचे काम अनुवाद करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध व्हायला हवे, असा निष्कर्ष मांडला आहे. भारतातील विज्ञान शिक्षण संस्था, शिक्षकवर्ग, धोरणकर्ते यांनी या पैलूचाही विचार करणे गरजेचे आहे.

नोटांबंदीच्या निर्णयानंतर ‘कॅशलेस सोसायटी’चा गजर सुरू झाला; परंतु या उद्दिष्टाच्या वाटेत डिजिटल लिटरसीच्या अभावाचा अडसर लक्षात आला. त्यामुळेच यात किती खडतर अडचणी येताहेत, हे आपण सध्या अनुभवतोच आहोत. पण केवळ अर्थव्यवहारच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतील जीवनशैलीला आता तंत्रज्ञानाचा स्पर्श होणार आहे, असे दिसते. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्‍स, डिजिटल मेटॅबॉलिझम, डेटा ॲनेलिसिस, डिजिटल उत्पादने, पूंज भौतिकी, इंटरनेट या सर्वच क्षेत्रांत इतकी वेगाने प्रगती होत आहे, की त्या वेगाशी मेळ राखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत.

शिक्षण, प्रशासन, अर्थव्यवहार अशा विविध क्षेत्रांत हे तंत्रज्ञान यापुढच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावेल. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य देश बनण्याचे उद्दिष्ट २०३० पर्यंत साध्य करायचे असेल, तर सर्वच विज्ञानसंस्थांना परस्परपूरक आणि समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. यासाठी सायबर आणि भौतिक प्रणालींनी हातात हात घालून काम करायला हवे. पंतप्रधानाचा भाषणात भर होता तो या दिशेवर. खरंतर कोणताही विषय विज्ञानाला वर्ज्य नाही. फक्त तो विज्ञानाच्या कसोटीवर उतरायला हवा. देशाची धुरा पुढे नेण्याचे काम आताची मुलेच करणार आहेत. त्यामुळे भारताच्या काना-कोपऱ्यातील प्रत्येक मुलापर्यंत विज्ञान पोचविण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे. विद्यार्थिकेंद्री विज्ञान व विकास असे उद्दिष्ट बाळगावे लागणार आहे. ऊर्जा, अन्नधान्य, पर्यावरण, संरक्षण, आरोग्य या क्षेत्रांतील आव्हानांचा सामना करण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांची भागीदारी महत्त्वपूर्ण आहे. वैज्ञानिक प्रकाशनांमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे. संशोधनाला चालना दिल्यास पहिल्या तिनांत भारत येऊ शकतो. गुणवत्तापूर्ण संशोधन झाल्यास सृजनात्मकता फुलेल. दुर्बल घटकांना बरोबर घेऊन जाणारा सर्वव्यापी विकास हे यासाठी आपल्या संशोधनाचे सूत्र हवे. विज्ञानातील विकासाशिवाय भौतिक विकासाचा वेग वाढणार नाही. वाढत्या अपेक्षांची पूर्तता विज्ञानाच्या माध्यमातूनच होऊ शकते. वैज्ञानिक संस्था, उद्योग, स्टार्ट अप, विद्यापीठे, आयआयटी यांनी एकत्रितपणे काम केले हा विकासपथ सहज पार केला जाऊ शकतो. विकासपथाचा पाया घालण्याचे काम सायन्स काँग्रेसने केले पाहिजे. विज्ञान का अध्यात्म या निष्फळ वादात तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या केवळ चर्चेत न अडकता शतकोत्तर वाटचालीत आता ठोस कार्यक्रम हाती घेऊन त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.

Web Title: editorial artical