गडचिरोलीतील महाकाव्य

गडचिरोलीतील महाकाव्य

गडचिरोलीला निघालो, तेव्हा माझे एक मित्र म्हणाले, ‘‘जरा सांभाळून बरं. धोकादायक परिसरात जात आहात!’’ सर्वसाधारणपणे गडचिरोली म्हटलं, की जे चित्र डोळ्यांपुढं उभं राहतं, ते नक्षलवादी हल्ले अन्‌ त्यांच्या पोलिसांबरोबरच्या चकमकी; पण त्याच गडचिरोलीच्या परिसरात डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग हे तीस-पस्तीस वर्षांपासून राहतात. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे तर आणखी कितीतरी दूर आत भामरागडच्या जंगलात त्याही आधीपासून राहतात. त्यांचे नंदादीपासारखे काम डोळे दिपवून टाकणारे आहे. ज्यांना आपल्या आयुष्याचं प्रयोजन सापडलं, त्यांनी आयुष्य कसं जगायचं, याचा मार्ग ठरविला आणि सगळ्या जगाकडं पाठ फिरवून निर्भयपणे ही माणसं आयुष्यभर ती वाट चालत राहिली.

समाजातील सर्वांत वंचित अन्‌ दुर्लक्षित घटक असलेल्या जंगलातील आदिवासींमध्ये जाऊन राहणे आणि त्यांचं आयुष्य सुसह्य करणं, त्यासाठी वाट्टेल तो धोका पत्करणं हे कमी साहसाचं नव्हे. समाजजीवनातील प्रश्‍न समजले आहेत; त्याविषयी प्रचंड असमाधानही आहे; पण करता काहीच येत नाही, अशा निष्क्रिय, वाचाळ विद्वानांची सध्या उणीव नाही. असे लोक स्वतःच्या मनातील अपराधगंड घालविण्यासाठी थातूरमातूर उपक्रम हाती घेतात. त्यातून आनंदवन, शोधग्राम, हेमलकसा ही काही जणांसाठी आधुनिक पर्यटनस्थळंही बनतात. या प्रकल्पावरील माहितीपट, चित्रपट बघून अशा स्वतःच्या कोशात सुरक्षित जीवन जगणाऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी तिकडे जात आहेत. यांना ना गांधीजी नावाच्या जादुगाराने विधायक कामांची जोड स्वातंत्र्यचळवळीस का व कशी दिली होती, याच्याशी काही देणे-घेणे असते; ना जंगली श्‍वापदेही प्रेम लावल्यास किती माणसाळतात याची जाणीव नसते.

डॉ. प्रकाश आमटे सकाळी पशुपक्ष्यांच्या भेटीस निघाले, तेव्हा सोबत बाबागाडीत  कुतूहलाने हसऱ्या डोळ्यांनी सर्वत्र बघणारी, त्यांची एक वर्षांची नात सान्वी होती. प्रत्येक प्राण्याच्या पिंजऱ्यात प्रकाश आमटे तिला नेतात. बिबट्यासोबत ती खेळते. अजगराच्या सहवासात निरागसपणे हसते; त्याला थोपटते. साप तिच्या अंगाखांद्यावर खेळतात. तेव्हा शहरी पर्यटकांपैकी एक उच्चशिक्षित महिला म्हणाली, ‘‘या सापांचे दात काढले असतील.’’ खरं म्हणजे प्रचंड संताप यावा, असे हे उद्‌गार. आमटे त्यांच्या सहकाऱ्याला हळू आवाजात म्हणाले, ‘‘या लोकांना हा काय गारुड्याचा खेळ वाटतो की काय? प्राण्यांना जीव लावला तर ते माणसांपेक्षाही अधिक विश्‍वास ठेवण्यास पात्र ठरतात, हे यांना कसं कळावं?’’ जिथे ‘रिल’ हीरो आणि ‘रिअल’ हीरो ओळखण्यात आपण गफलत करतो, तिथे मुके प्राणी, त्यांचे प्रेम अन्‌ बोलक्‍या माणसातील हिंस्त्र जनावर यांच्यातील भेद कसा कळावा?

माणसांनी घडवून आणलेल्या हिंसाचाराच्या वणव्यात गडचिरोली, सिरोंचा, भामरागड, आबूजमाडचे जंगल होरपळत असताना, हिंस्त्र प्राण्यांना माणसाळविणे अन्‌ पशूंच्या पातळीवर जीवन जगणाऱ्या आदिवासींना माणसांचे जगणे बहाल करण्यासाठी जे प्रयत्न तिथे चालू आहेत; ते एखाद्या महाकाव्याच्या निर्मितीपेक्षा किंचितही कमी महत्त्वाचे नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com